Benefits Of Having Walnuts On Empty Stomach: मेंदूसारखाच दिसणारा आणि मेंदू तल्लख करण्यासाठी ओळखला जाणारा आक्रोड खाल्ल्याने खरोखरच स्मरणशक्ती वाढू शकते का? वर्षानुवर्षे आपल्या आई- आजी आणि अनेकांनी आपल्याला अक्रोडाचे असंख्य फायदे सांगितले असतील. अक्रोडमधील ओमेगा ३ फॅटी ऍसिड, अँटी ऑक्सिडंट्स आणि दाहक विरोधी गुणधर्म हे शरीराला अनेक फायदे मिळवून देऊ शकतात. पण अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये अक्रोडाच्या काही फायद्यांविषयी ठोस दावे करण्यात आले आहेत. पोषणतज्ज्ञ पूजा पालरीवाला यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी अक्रोडाचे सेवन केल्यास तुमच्या मेंदू व स्मरणशक्तीचे कार्य सुधारू शकते. यासाठी आपण रोजच्या सकाळच्या रुटीनमध्ये अक्रोडाला विशेष स्थान द्यायला हवे.” पण खरोखरच अक्रोड खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती वाढते का? तुमच्या मेंदूवर अक्रोड नेमका काय परिणाम करत असतो? आज या प्रश्नांची उत्तरे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

डॉ सुधीर कुमार, सल्लागार न्यूरोलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल, हैदराबाद यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “मानवांवर केलेल्या काही अभ्यासात, अक्रोडाचे सेवन केल्याने आकलनशक्ती, स्मरणशक्ती, लक्ष आणि एकाग्रता सुधारते असे दिसून आले आहे. अक्रोड हे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका कमी करण्यासाठी ओळखले जाते. अक्रोडाचे सेवन केल्याने रोजची कामे करताना येणारे बौद्धिक, मानसिक अडथळे ते अगदी स्मृतिभ्रंश होण्याचा वेग सुद्धा कमी होतो. अक्रोडाचे सेवन मूड सुधारण्यासाठी आणि नैराश्याचा धोका कमी करण्यासाठी सुद्धा मदत करू शकते. अक्रोडाचे ५ ते ८ तुकडे दररोज खाणे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.”

डॉ. कुमार यांच्या मते, चांगल्या पोषणासाठी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले अक्रोड सकाळी खावे. पण जर एखाद्याला संध्याकाळी अक्रोड खाणे पसंत असेल तरीही काही हरकत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या भाजलेले अक्रोड चवदार असले तरी त्यातील पोषक घटक कमी असतात, त्यामुळे भाजण्याऐवजी भिजवलेलेच अक्रोड खाणे उत्तम.

अक्रोड खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

डॉ रोहिणी पाटील, पोषणतज्ज्ञ आणि न्यूट्रसी लाइफस्टाइलच्या संस्थापक यांनी अक्रोड खाताना लक्षात ठेवाव्या अशा काही गोष्टी मात्र आवर्जून शेअर केल्या आहेत.

जर तुम्ही रिकाम्या पोटी अक्रोड खात असाल तर त्याचे फायदे अधिक योग्य पद्धतीने शरीराला लाभण्याची शक्यता असते.

अक्रोडाचे अनेक फायदे आहेत, पण ते कमी प्रमाणात खाणे महत्वाचे आहे कारण त्यात कॅलरी व फॅट्स जास्त असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते.

चांगल्या पोषणासाठी चांगल्या दर्जाचे अक्रोड निवडा. रसायने आणि कीटकनाशकांचा धोका कमी करण्यासाठी, सेंद्रिय अक्रोड खरेदी करू शकता.

हे ही वाचा<< हृदयविकाराच्या झटक्याचा धोका ऍस्पिरिनची गोळी कमी करते का? तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर, “उच्च रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉल..”

अक्रोड हे तुमच्या पोषक तत्वांनी युक्त आहारात एक आरोग्यदायी जोड असू शकते, पण स्मरणशक्ती आणि मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी यावर अवलंबून निश्चितच राहू नये. यासाठी पोषक तत्वांनी भरपूर अन्नपदार्थ व संतुलित आहार आवश्यक आहे.