Edible Oil Health Problem : खाद्यतेलाच्या सेवनाचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांविषयी नेहमी चर्चा रंगताना दिसते. अशावेळी कापूस, सोयाबीन, सूर्यफूल अशा विविध बियांपासून तयार होणाऱ्या तेलावर लक्ष केंद्रित केले जाते, कारण यकृताच्या आरोग्यावर केवळ साखर आणि अल्कोहोलमुळे जितका घातक परिणाम होतो, तितकाच परिणाम बियांपासून तयार होणाऱ्या तेलाच्या सेवनाने होतो. त्यामुळे Indianexpress.com ने आरोग्यत़ज्ज्ञांकडून बियांपासून तयार होणाऱ्या तेलाचा नेमका काय परिणाम होतो आणि कशी काळजी घेतली पाहिजे, याविषयी माहिती घेतली आहे.

बंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्सच्या हेड ऑफ सर्व्हिसेस एडविना राज म्हणाल्या की, सूर्यफूल, करडई, कापूस यांच्या बियांपासून तयार होणाऱ्या तेलांमध्ये लिनोलिक अॅसिड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओमेगा-६ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते, जे शरीरास आवश्यक असते. परंतु, जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरात जळजळ वाढू शकते.

त्यामुळे शरीरात आणि आतड्यांमध्ये जळजळ कमी करण्यासाठी ओमेगा ३ आणि ६ चे योग्य प्रमाण राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. एडविना राज यांच्या मते, बियांपासून तयार होणाऱ्या तेलाचा वारंवार वापर केल्यास शरीरात जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण वाढू शकतो, ज्यामुळे कालांतराने यकृताचे नुकसान होण्याची शक्यता असते.

किमशेल्थ त्रिवेंद्रम येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाच्या सल्लागार डॉ. सिमना एल यांनीही यावर सहमती दर्शवत सांगितले की, बियांपासून तयार होणाऱ्या तेलांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने यकृतामध्ये जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण येऊ शकतो, ज्यामुळे यकृताचे नुकसान होत आजारी पडण्याची शक्यता असते. सर्व बियांचे तेल समान नसते. जवसाचे तेल आणि चिया बियाण्याचे तेल ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध असते, ज्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि ते यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

बियाण्यांचे तेल शरीरासाठी साखर किंवा अल्कोहोलपेक्षा वाईट?

ओमेगा ६ चे प्रमाण जास्त असलेले बियांचे तेल, प्रक्रिया केलेले अन्नाचे जास्त प्रमाणात सेवन, रिफाइंड धान्ये, गो़ड पदार्थ तसेच अल्कोहोलयुक्त पेये यकृताच्या आरोग्यासाठी निश्चितच हानीकारक असतात, ज्यामुळे इन्सुलिन रेजिस्टेंस आणि यकृतामध्ये चरबी जमा होण्याचा धोका वाढतो; अशाने यकृताशी संबंधित समस्या वाढत जातात. तळलेले आणि बेक्ड केलेल्या पदार्थांमध्ये आढळणारे ट्रान्स फॅट्स यकृतामध्ये जळजळीचे कारण ठरतात, यामुळे यकृताच्या आरोग्याचे नुकसान होते, असे डॉ. सिमना एल म्हणाल्या.

डॉ. सिमना एल यांच्या मते, बियांचे तेल हे यकृतासाठी सर्वात वाईट पदार्थ आहे असे म्हणता येणार नाही, कारण एकूणच आहार पद्धती आणि जीवनशैलीच्या निवडी गोष्टींचा परिणाम यकृताच्या आरोग्यावर होत असतो. जरी ते हानिकारक नाही असे आपण म्हणत असलो तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास समस्या निश्चितच वाढू शकतात.

बियाणांपासून तयार होणाऱ्या तेलाऐवजी कोणते तेल वापरले पाहिजे?

डॉ. सिमना यांनी नमूद केले की, बियांपासून तयार होणाऱ्या तेलाची प्रक्रिया आणि उत्पादन पद्धतींचा विचार करणेदेखील महत्त्वाचे आहे, कारण यातील काही तेल अधिक शुद्ध किंवा प्रक्रिया केलेले असू शकते. यकृताच्या आरोग्याबद्दल काळजी घेण्याची गरज असलेल्या लोकांनी उच्च-गुणवत्तेचे, कमीत कमी प्रक्रिया केलेले बियाणे तेल निवडणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी एडविना राज यांनी तेल वारंवार गरम करून वापरू नका असा इशारा दिला आहे. तसेच तुम्ही एकाच प्रकारच्या तेलाऐवजी स्वयंपाक बनवताना राईस ब्रॅन ऑइल, ऑलिव्ह ऑइल, खोबरेल तेल आणि तूप यांसारख्या तेलांचे मिश्रण कमी प्रमाणात वापरू शकता, अशा प्रकारच्या तेलाचे मिश्रण आरोग्याशी तडजोड न करता विविध स्वयंपाक पद्धतींमध्ये वापरले जाऊ शकते, अगदी तळण्यापासून ते बेकिंगपर्यंत हे तेल वापरता येऊ शकते, असे एडविना राज यांनी सांगितले आहे.