History of Sexual Health and sex: सेक्स म्हणजे प्राणिजगतात निर्माण झालेली सर्वंकष त्रिबंध (शारीरिक, मानसिक, भावनिक बंध) तत्त्वशक्ती आहे हे ध्यानात घ्यायला हवे. मानवात ती सर्वात जास्त उत्क्रांत झाली आहे; म्हणूनच आपण जरी जगात येतो एकटे, जातो एकटे तरी राहतो मात्र या त्रिबंध नात्यातच, हे विसरता कामा नये. म्हणून सेक्सला नाकारून जगणे हे या तिन्ही स्तरांवर समस्या निर्माण करणारे ठरते.

समाजात सेक्सकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळी दूषित असल्याने हा विषय ‘टॅबू’, त्याज्य, असाच झाला आहे. अनेक पती-पत्नींमध्ये हा विषयच मुळी बोलला जात नाही. म्हणूनच कालांतराने हा विषय काही दाम्पत्यांच्या आयुष्यातून अस्तंगत होऊ लागतो. तसे घडायला लागल्यावर मग त्याचे चटके दाम्पत्य जीवनात जाणवायला लागतात. संपूर्ण नाते वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासले जाते. पण त्या सगळ्यांच्या मुळाशी दुर्लक्षित कामजीवन आहे, हे विसरता कामा नये.

‘सेक्स’ ही निसर्गाने निर्माण केलेली श्रृंगारिक तत्त्वशक्ती आहे. ही श्रृंगारिक तत्त्वशक्ती (इरॉटिक ड्राइव, इरॉस) निसर्गाने वासना (पॅशन), आकर्षण (अ‍ॅट्रॅक्शन) व भावबंध, नातेनिष्ठा (अ‍ॅटॅचमेंट) अशा त्रिमितीमध्ये उत्क्रांत करीत नेली आहे. यालाच आपण श्रृंगारिक प्रेम म्हणतो. वासना शारीरिक संबंधासाठी, आकर्षण प्रजननासाठी व भावबंध, नातेनिष्ठा हे पालकत्वासाठी अशा हेतूंनी निर्माण झाले आहे. गंमत म्हणजे यासाठीच्या मेंदूसंस्थासुद्धा वेगवेगळ्या निर्माण केल्या आहेत.

वासनेसाठी मेंदूगर्भातील ‘हायपोथॅलॅमस’ भाग व त्याची लैंगिक पूर्वपीठिका (प्रायिमग) टेस्टोस्टेरॉन या सेक्स हॉर्मोनवर व उत्तेजकता डोपामाइन या रसायनावर अवलंबून असते. लैंगिक पूर्वपीठिका (प्रायिमग) टेस्टोस्टेरॉनमुळे व्यक्ती (स्त्री व पुरुष) वयात येतानाच पौगंडावस्थेत तयार होते. एकदा हे झाले की, कामभावनेचे घड्याळ स्त्री व पुरुष दोघांमधेही मेंदू जिवंत असेपर्यंत काम करीत राहते. म्हणजेच वयोवृद्ध व्यक्तीलाही कामभावना असणे किंवा होणे हे अत्यंत नैसर्गिकच आहे. (‘अवघे पाऊणशे वयमान’ किंवा ‘चिनी कम’ या परिस्थितींचे आश्चर्य वाटायचे कारण नाही!)

आकर्षणासाठी मेंदूतील आनंद-केंद्रे (रिवॉर्ड सिस्टीम : मेडियल इन्शुला, ग्लोबस पॅलीडस, कॉडेट न्यूक्लिअस, व्हिटीए इ.) व डोपामाइन, जास्त ऑक्सिटोसीन, कमी सेरोटोनीन रसायने ही जबाबदार असतात. ऑक्सिटोसीन हे कामचैतन्य सळसळवणारे रसायन तर सेरोटोनीन हे त्याला कमी करीत असते. म्हणून शास्त्रज्ञांच्या मते जेवढे ऑक्सिटोसीनची मेंदूतील निर्मिती जेवढी जास्त व त्याच्या जोडीला सेरोटोनीनची कमी असेल तेवढी ती व्यक्तीला अन्य व्यक्तीविषयी वाटणाऱ्या प्रेमाकर्षणाचा संभव, चान्स जास्त असतो. ज्या ज्या औषधांनी मेंदूतील सेरोटोनीनचे प्रमाण वाढत असते अशांमुळे त्या व्यक्तीला अन्य व्यक्तीविषयी वाटणाऱ्या आकर्षणावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे या विषयातील संशोधकांना आढळले आहे. (म्हणून वैद्यकीय व्यावसायिकांनी अशा औषधांचा वापर करताना जागरूक असले पाहिजे.)

भावबंध, नातेनिष्ठा हे मेंदूतील व्हेंट्रल पॅलीडम भाग व व्हाजोप्रेसीन या रसायनाच्या प्रमाणावर अवलंबून असते. व्हाजोप्रेसीनचे व्हेंट्रल पॅलीडम भागात जेवढे जास्त ग्रहणबिंदू (रिसेप्टर्स) तेवढ्या जास्त प्रमाणात जोडीदाराबद्दलची एकनिष्ठता असते, असे शास्त्रज्ञांना आढळले आहे. आधुनिक संशोधनांमध्ये हे लक्षात आले आहे की, व्हाजोप्रेसीन हे नातेनिष्ठा- रसायन आहे. प्रेअरी व्होल व माउंटेन व्होल या प्राण्यांवरील सखोल संशोधनात असे आढळून आले आहे की, व्हाजोप्रेसीनचे ग्रहणबिंदू खूप प्रमाणात असणारे प्रेअरी व्होल हे जन्मभर आपल्या साथीदाराबरोबर एकनिष्ठ असतात, तर व्हाजोप्रेसीनचे ग्रहणबिंदू खूप कमी प्रमाणात असणारे त्यांचेच जातभाई माउंटेन व्होल हे सर्वकाळ निष्ठाहीन असतात.

निसर्गात प्रेअरी व्होलसारखे एकनिष्ठ प्राणीही अत्यंत विरळाच असेही आढळले आहे. अर्थात ‘मनुष्यप्राणी’ही ‘प्रेअरी व्होल’वर्गात मोडणारा नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही! समाजव्यवस्थेमुळे ‘मनुष्यप्राण्या’त ही नातेनिष्ठा आणावी लागते हे खरे, पण मुळात ‘मनुष्यप्राणी’ हा कामभावात भरकटणारा प्राणी आहे, हे शास्त्रीय सत्यही लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून कित्येकदा पुरुषाचा ‘स्ट्राँग पॉइंट’ त्याची बायको असली तरी ‘वीक पॉइंट’ दुसरी स्त्री का असू शकते, हे ध्यानात येईल. परंतु मनाला वाटणे व सामाजिक नैतिकता (सोशल मोरॅलिटी) या दोन्हींमध्ये कुठे ना कुठे तरी रेघ मारावीच लागते हेही समजून घेतले पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थोडक्यात, ‘सेक्स’ हे निसर्गाने गंभीरपणे निर्माण केले आहे. त्याची उत्क्रांतीही गंभीरपणे घडलेली आहे म्हणून त्याला गंभीरतेनेच घेतले पाहिजे, शिकले पाहिजे. म्हणजेच श्रृंगारिकतेची प्रत्येक मिती ही वैशिष्ट्यपूर्ण असून निसर्गाने त्या तिन्हींची उत्तम गुंफण केली आहे. त्यामुळे मानवातील कामजीवनात या तिन्हींचा विचार करणे आवश्यक असते. हे समजून घेतले तर सर्वसामान्यांनाही तसेच या विषयात रस घेणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांनाही या ज्ञानाचा वापर करणे सोपे जाईल.
याचा नीट विचार करून ‘सेक्स’ म्हणजे केवळ लिंग-योनी संबंध वा वीर्यविसर्जनाची क्रिया नसून प्राणीजगतात निर्माण झालेली सर्वंकष त्रिबंध (शारीरिक, मानसिक, भावनिक बंध) तत्त्वशक्ती आहे हे ध्यानात येईल. मानवात ती सर्वात जास्त उत्क्रांत झाली आहे. म्हणून आपण जरी जगात येतो एकटे, जातो एकटे तरी राहतो मात्र या त्रिबंध नात्यातच, हे विसरता कामा नये. म्हणून सेक्सला नाकारून जगणे हे या तिन्ही स्तरांवर समस्या निर्माण करणारे ठरते. दाम्पत्याचे कामजीवन म्हणूनच वेळेत अस्तंगत होता होता वाचवले पाहिजे. आणि यासाठी त्या पती-पत्नी दोघांनाही कामजीवनाची जागरूकता असणे आवश्यक आहे.