Keto diet: सध्या वजन कमी करण्यासाठी कमी कार्ब्स, जास्त चरबीयुक्त केटो आहार अधिक लोकप्रिय झाला आहे. या आहारात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अत्यंत कमी आणि निरोगी चरबीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शरीराला केटोसिस नावाच्या स्थितीचा सामना करावा लागतो. या अवस्थेत शरीर ग्लुकोजऐवजी ऊर्जेसाठी चरबी जाळण्यास सुरूवात करते. मासे, अंडी, एवोकाडो, काजू आणि कमी कॅलरी असलेल्या भाज्या हे केटो आहाराचे मुख्य घटक आहेत. असं असताना अलिकडच्या एका अभ्यासात या आहाराबद्दल काही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आल्या आहेत.
१९ सप्टेंबर २०२५ रोजी जर्नल ऑफ सायन्स अॅडव्हान्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी केटो डाएटच्या दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास केला. या अभ्यासात उंदरांचा समावेश होता. संशोधकांनी वजन, रक्तातील लिपिड पातळी, यकृताचे आरोग्य आणि रक्तातील साखरेचे नियमन यावर त्याचे परिणाम तपासले.
संशोधनातून असे दिसून आले की, केटो आहार वजन वाढण्यापासून रोखण्यास मदत करू शकतो. केटो आहार घेतलेल्या उंदरांचे वजन इतर आहार घेतलेल्या उंदरांपेक्षा कमी वाढले. यामुळे असे दिसून आले की, कमी कार्बोहायड्रेट्स आहार वजन नियंत्रणासाठी प्रभावी असू शकतो. अभ्यासातून असेही दिसून आले की, केटो आहाराचे दीर्घकाळ पालन केल्याने चयापचय आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
यकृत आणि ह्रदयाचा धोका
अभ्यासानुसार, केटो आहार घेणाऱ्या उंदरांच्या रक्तात ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण लक्षणीयरित्या जास्त होते. त्यांच्या यकृतामध्ये चरबीदेखील जमा होते. त्यामुळे फॅटी लिव्हर रोग आणि ह्रदयरोगाचा धोका वाढू शकतो. शिवाय उंदरांची रक्तातील साखर नियंत्रित करण्याची क्षमता बिघडली होती. जेवणानंतर त्यांना ग्लुकोजची पातळी सामान्य करण्यात अडचण येत होती, ती मधुमेहाचा धोका दर्शवू शकते.
आहारात बदल केल्यास सुधारणा शक्य
या उंदरांना केटोजेनिक आहारातून कमी चरबीयुक्त आहाराकडे वळवण्यात आले, तेव्हा त्यांच्यात ग्लुकोज सहनशीलता किंवा साखर नियंत्रित करण्याची क्षमता लक्षणीयरित्या सुधारली. निरोगी आहाराचा अवलंब करून केटोजेनिक आहाराचे काही दुष्परिणाम उलट करता येतात.
मनुष्यासाठीचा इशारा
हा अभ्यास उंदरांवर करण्यात आला असला तरी, संशोधकांचे म्हणणे आहे की हे परिणाम मानवांवर पूर्णपणे लागू करण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. असं असूनही ते सावध करतात की जास्त चरबीयुक्त आहाराचे दीर्घकाळ पालन केल्याने मानवांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तातील साखर नियंत्रणावर गंभीर परिणाम होऊ शकतात.