Ganesh Utsav 2025 Special Gulkand, Mango & Dry Fruit Modak Recipes : भाद्रपद महिन्यात गणपती- गौरी सणानिमित्ताने प्रसाद करताना विविध पदार्थांची रेलचेल असते. त्यात खास करून उकडीचे मोदक, पुरण शिजवून तयार केल्या जाणाऱ्या पातोळ्या, पुरणाचे दिंड, कोथिंबीर वडी, भाजणीचे वडे या पारंपरिक पदार्थांचा समावेश असतो. उत्सवातील विविध पदार्थ आणि आहारवैविध्याचा विचार करत असतानाच संवाद सुरू झाला… “मी काय म्हणत होते; यावर्षी फॉर या चेंज चॉकलेट मोदक करूया ?”
“चॉकलेट मोदक म्हणजे? चॉकोलेट कोटिंग करायचं की, स्टफिंग म्हणून चॉकलेट वापरायचं ?”
“म्हणजे कोकोआ क्रीम अॅड करायचं सारणात!”

मी वळून पाहिलं तर दोन वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये मोदकावरून संवाद सुरु होता. त्या दोघीना त्यांच्या संभाषणात माझ्या कानाने भाग घेतलाय हे लक्षात आलं. माझ्या डोळ्यात आणि देहबोलीत “नाही! नाही! नाही!” अधोरेखित झालेलं मला लक्षात आलं. माझ्यातल्या आहारतज्ज्ञानं माझ्यातल्या प्रयोगशील मेंदूला वेगळंच चित्र दाखवलं!

Ganesh Chaturthi 2025 Health Benefits Of Ukadiche Eating Modak
Ganesh Chaturthi 2025 Health Benefits Of Ukadiche Eating Modak

केळीच्या पानात पांढऱ्या शुभ्र मोदकांची जागा विविध रंगी मोदकांनी घेतल्याचं जाणवलं. काही वर्षांपूर्वी २ मोदक चव म्हणून खाल्ले होते, तेच आता ट्रेण्ड म्हणून २१ झालेत असं दिसू लागलं. उकडीचे मोदक प्रेमाने करू पाहणारी आजी , आनंदाने मोदकाचं पीठ तपासून पाहणारी आई, सात्त्विक चेहऱ्याने उकडीचे मोदक वळणाऱ्या सासूबाई सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हलक्या आठ्या आल्यात… असं वाटू लागलं . आणि या सगळ्या मानसिक कोंडाळ्यात मला विविध मोदकांमधलं पोषणतत्त्वं खुणावू लागली होती.

त्यामुळे समस्त “ह्या SSS मोदक असावेत तर उकडीचेच!” या सर्वमान्य ठाम मताचा आदर करत मी २०२५ साली व्हायरल झालेल्या मोदकाच्या सगळ्या रूपांची शहनिशा करायचं ठरवलं!

मोदकाच्या या विविध रंगी -विविध ढंगी रूपाच्या पोषणमूल्यांबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊ .

१. गुलकंद/ गुलाब मोदक

या मोदकाचे दोन प्रकार – मोदकाचं सारण बनवताना त्यात गुलकंद वापरला जातो आणि पीठ मात्र तांदळाचं वापरलं जातं आणि दुसरं म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात शिजवून त्या फिकट गुलाबी रंगाच्या पाण्यातच ते वाफवून घेतलं जातं. आणि सारणामध्ये देखील गुलकंद वापरला जातो. उकडीच्या मोदकांप्रमाणेच हे मोदक वाफवून तयार केले जातात. गूळ, ओलं, खोबरं याच्यासोबत गुलकंद असं तिहेरी उर्जायुक्त सारण असणारे हे मोदक चवीला अंमळ जास्त गोड आणि दिसायला विशेष गोजिरवाणे दिसतात. यातील कर्बोदकांचं प्रमाण उकडीच्या मोदकाच्या ५०% जास्त असतं.

२. मलई मोदक

मोदकाचं पीठ वाफवून घेताना त्यात दूध एकत्र केलं जातं. आणि याच्या सारणात साय आणि अनेकदा थोडा खवा सुद्धा वापरला जातो. सारणामध्ये शक्यतो ओलं खोबरं, साखर आणि गूळ हे दोन्ही घटक वापरले जातात. यात स्निग्धांश आणि कर्बोदके दोन्हीचं प्रमाण जास्त असतं. मलई मोदक चवीला अतिगोड आणि मिठाईच्या काहीसा जवळ जाणारा असतो. नेहमीच्या जेवणासोबत खायला कॅलरीज, कर्बोदके आणि स्निग्धांश या सगळ्याच बाबतीत मलई मोदक काहीसा अतिरेकी ठरू शकतो.

३. चॉकलेट मोदक

मोदकाचं पीठ करताना त्यात कोकाआ पावडर आणि सारणात चॉकलेटे किसून किंवा चॉकलेट सिरप एकत्र केले जाते. सारण तयार करताना त्यात गुळाऐवजी साखर वापरली जाते . चॉकलेटचा नैसर्गिक कडवटपणा कमी होऊन गोडवा वाढविण्यासाठी हा मोदक जवळपास ६०% हून अधिक कर्बोदकांनी भरलेला असतो. याच चॉकलेट मोदकाचा आणखी एक प्रकार म्हणजे तांदूळ वाफविण्याऐवजी माव्यामध्ये चॉकलेट घालून त्याचा मिठाईसदृश मोदक तयार केला जातो .

भरपूर तेल, मावा, साखर अशी सगळी सामग्री एकत्र करून त्यापासून मोदक तयार केले जातात. हे मोदक नेहमीच्या डेअरी मिल्क आणि मिठाईचा फ्यूजन म्हणून सर्रास वापरलं जात. या मोदकांमध्ये स्निग्धांश जास्त असतातच मात्र याच सोबत कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आणि साठवणीच्या स्निधांशच प्रमाण भरपूर असतं .

४. ड्रायफ्रूट मोदक :

ड्रायफ्रूट मोदक दोन प्रकारे केले जातात

(१) उकडीच्या मोदकाचं सारण तयार करताना बदाम पावडर, पिस्ता, मनुके आणि खजूर ,चारोळी हे सगळं आणि सोबत प्रमाणात गूळ किंवा साखर आणि किसलेलं खोबर एकत्र केलं जातं. आणि तांदळाच्या पिठाच्या कणकेसोबत मोदक तयार केला जातो. हा स्निग्धांशानी भरपूर असणारा मोदक जेवणाच्या ७५% इतकी ऊर्जा देऊ शकतो.

(२) विविध प्रकारचा सुकामेवा, खवा आणि दूध यांच्या मिश्रणाने हे मोदक तयार केले जातात. सहसा आकाराने लहानखुरे आणि चवीला दर्जेदार असणारे हे मोदक झटपट तयार होणारे आणि ऊर्जा, स्निग्धांश या दोन्ही बाबतीत भरपूर आहेत.

५. आंबा मोदक

या मोदकांमध्ये तांदळाच्या पीठामध्ये आंब्याचा रस एकत्र करून कणीक तयार केली जाते. फळांच्या राजाची श्रीमंती जपण्याबरोबरच या मोदकाच्या सारणामध्ये बदाम, गूळ, ओलं खोबरं यापासून सारण तयार केलं जातं. पिवळ्या धम्मक रंगाचे हे मोदक साखरेचा डबलडोस आणि ऊर्जेने भरपूर असतात.

६. फळांचा अर्क असणारे मोदक

संत्री ,आंबा, स्ट्रॉबेरी यांचा रस वापरून तयार केले जाणारे हे मोदक शक्यतो मावा, खवा, दूध यांच्या मिश्रणाने तयार केले जातात. यात ओलं खोबरं वापरण्यापेक्षा थेट लहानसे मोदक केले जातात.

७. तळणीचे मोदक

गूळ खोबरं यांचं सारण आणि गव्हाचं पीठ वापरून केलेल्या पाऱ्या असं स्वरूप असणारे हे मोदक थेट तुपात किंवा तेलात तळले जातात. ऊर्जेने भरपूर असणारे हे मोदक महाराष्ट्र आणि कर्नाटकात विशेष प्रसिद्ध आहेत.

८. बेसन मोदक

बेसन तुपात शिजवून घेऊन त्यात खोबऱ्या ऐवजी गूळ आणि सुकामेवा एकत्र करून हे मोदक तयार केले जातात. साधारण बेसन लाडवाचं हे मोदकरूप त्यातील प्रथिनांमुळे विशेष प्रसिद्ध आहेत. मात्र या मोदकांमध्ये प्रथिनांचं प्रमाण नगण्य असून स्निग्धांश आणि कर्बोदकांचे प्राण उकडीच्या मोदकाहून ३०% इतकं जास्त असतं.

हे सगळं वाचल्यानंतर या ट्रेण्डी मोदक स्पर्धेत उकडीच्या मोदकांसोबत तुमच्या घरात कोणाचं आगमन झालंय हे मला नक्की कळवा!