Benefits of Fenugreek and Milk: प्राचीन आयुर्वेदिक ज्ञानात अशा अनेक घरगुती उपायांचा उल्लेख आहे, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. असाच एक सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे तुपात भाजलेले मेथी दाणे आणि दूध यांचं सेवन. ही संयुगं घरगुती असली तरी त्याचे आरोग्यदायी फायदे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. तज्ज्ञ सांगतात की मेथी दुधाच्या सेवनाने आपल्याला अनेक आजारांवर मात करण्यात फायदा होतो. डायटिशियन कनिका मल्होत्रा यांनी याविषयी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

दूध आणि मेथी एकत्र घेतल्याने काय होते?

डायटिशियन कनिका मल्होत्रा यांच्या मते, कडू मेथीदाणे आणि दूध यांचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. मेथीमध्ये प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम, फॉलिक अ‍ॅसिड, फायबर आणि व्हिटॅमिन A, C, B यांसारखी अनेक पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. तुपात भाजलेले मेथी दाणे आणि दूध हे मिश्रण पचन सुधारण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत अनेक फायदे देतं. मेथी दाणे तुपात भाजल्यावर त्यातील पोषणमूल्ये अधिक वाढतात आणि ते सहज पचतात. त्यामध्ये भरपूर फायबर्स असतात, जे पचन सुधारतात आणि रक्तातील साखर हळूवार शोषली जाऊन नियंत्रणात राहते.

तुपातील हेल्दी फॅट्स हे शरीरात अन्नातील पोषक तत्त्वांचे शोषण वाढवतात, त्यामुळे मेथीचे औषधी गुणधर्म अधिक परिणामकारक होतात. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात, कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयाचं आरोग्य राखतात.

पावसाळ्यात सर्दी, ताप, कफ, खोकला, दमा यासारख्या त्रासांपासून आराम मिळवण्यासाठी मेथी पावडर आणि दूधाचे सेवन फायदेशीर ठरते. मेथीत असणारे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म श्वसन संस्थेचे संरक्षण करतात, तर दूध शरीराला उष्णता आणि बळ देते. हे घरगुती उपाय नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणी टाळावे?

  • गर्भवती महिलांनी याचे अतिसेवन टाळावे, कारण यामुळे वाईट परिणामदेखील होऊ शकतात
  • डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय हे सेवन करू नये, कारण साखर खूप कमी होण्याचा धोका असतो.

किती प्रमाणात घ्यावे?

कनिका मल्होत्रा सांगतात की, दररोज १ ते २ चमचे (५-१० ग्रॅम) तुपात भाजलेले मेथी दाणे आणि त्यासोबत १ कप (सुमारे २४० मि.ली.) दूध घेणे योग्य ठरेल. यापेक्षा जास्त घेतल्यास अपचन, मळमळ किंवा गॅस होण्याची शक्यता असते. वाढते वजन, नियंत्रणात न येणारी साखर, पचनाच्या समस्या या सगळ्यांवर हा घरगुती उपाय रामबाण ठरू शकतो, पण वापर करताना काळजीही तेवढीच महत्त्वाची असल्याचे त्या सांगतात.