Benefits Of Having An Early Dinner : सिनेमातील अभिनेता असो किंवा मालिकाविश्वातील एखादा हिरो त्यांच्या ड्रेसिंग स्टाईल, त्यांच्याकडे कोणत्या गाड्या आहेत, ते कोणते डाएट प्लॅन फॉलो करतात याकडे आपल्या सगळ्यांचेच लक्ष असते. तर आज आपण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या ६५ वर्षीय अक्किनेनी नागार्जुनने सांगितलेल्या एका आरोग्यदायी टिपबद्दल जाणून घेणार आहोत.
याबाबत अभिनेता अक्किनेनी नागार्जुन यांनी, “लोकांना वाटत असेल की, मी जेवण टाळतो. मी दररोज नियमितपणे जेवतो. एवढेच नाही, तर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मी जेवतो आणि या जेवणात सॅलड, भात, चिकन, मासे यांचासुद्धा समावेश असतो. ही एक आयुष्यभर निरोगी राहण्याची जीवनशैली आहे. मी नियमितपणे व्यायामसुद्धा करतो”. ३५ वर्षांहून अधिक काळ नागार्जुन असाच दिनक्रम फॉलो करीत आहे. २०२४ मध्ये ‘आरआरआर’चे संगीतकार एम. एम. किरावानी यांच्याशी बोलताना नागार्जुन यांनी दिनक्रम उलगडला होता.
सेलिब्रिटींची हटके सवय नाही; तर विज्ञानाचा ठोस पुरावा (Early Dinner Benefits)
नागार्जुन यांच्या या सवयीवरून शरीरासाठी याचा काय फायदा होतो ते समजून घेण्यासाठी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली. ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ गुलनाज शेख म्हणाल्या की, तुम्ही काय खाता हे महत्त्वाचे असले तरी तुम्ही कधी खाता हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. नागार्जुनने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जेवणाचा दिलेला सल्ला म्हणजे ती केवळ सेलिब्रिटींची हटके सवय नाही; तर त्याला ठोस विज्ञानाचा पुरावादेखील आहे.
लवकर जेवल्याने तुमच्या शरीराला झोपण्यापूर्वी जेवण पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. जेव्हा तुम्ही उशिरा जेवता तेव्हा तुमच्या शरीराला अनेक कामे करावी लागतात, जसे की, एकीकडे शरीर विश्रांती घेण्याचा प्रयत्न करते; तर दुसरीकडे अन्न पचवावे लागते. त्यामुळे आम्लता, पोटफुगी, झोपेचा त्रास आणि कालांतराने वजन वाढणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, असे आहारतज्ज्ञ गुलनाज शेख म्हणाल्या आहेत.
लवकर जेवल्याने तुमच्या शरीराचा मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय (अन्न पचवण्याची आणि त्याचे ऊर्जेत रूपांतर करण्याची प्रक्रिया) देखील वाढते. शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता किंवा शरीर दिवसाच्या सुरुवातीला साखर चांगल्या प्रकारे वापरते. पण, उशिरा जेवल्यास ही साखर रक्तात जास्त वेळ राहते, ज्यामुळे डायबेटीस किंवा डायबेटीसची शक्यता असलेल्या लोकांना होऊ शकणारा संभाव्य धोका वाढतो.”
पचनाच्या दृष्टीने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जेवल्याने शरीराला योग्यरीत्या कार्य करण्यास मदत होते. मग त्यामुळे शरीर व्यवस्थितपणे अन्न पचवू शकते. कारण- त्यानंतर शरीर हळूहळू विश्रांतीच्या स्थितीत जाण्यास सुरुवात करते. त्यामुळे तुम्हाला हलके वाटते, ऊर्जेची पातळी कायम राहते आणि दुसऱ्या दिवशी लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
संध्याकाळी लवकर जेवणे आपल्या नैसर्गिक सर्कॅडियनशी (Circadian Rhythm) सुसंगत आहे. रात्री शरीर अन्न पचवण्यासाठी नसून, दुरुस्ती व विश्रांतीसाठी काम करते. म्हणूनच रात्री झोपण्याआधी लवकर जेवून शरीराला अन्न पचवायला थोडा वेळ दिला पाहिजे. तर, शरीराला त्याचे मूळ काम व्यवस्थित करता येईल. पण, याचा अर्थ असा होत नाही की, प्रत्येकाने ७ वाजताच जेवले पाहिजे. पण, झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधी जेवणे ही एक चांगली सवय आहे, असे आहारतज्ज्ञ गुलनाज शेख म्हणाल्या आहेत.