Tight Clothes Affect Body & Health : फॅशनच्या नावाखाली हल्ली अनेक जण घट्ट कपडे परिधान करणे पसंत करतात. यात स्किन फिट जीन्सपासून ते टॉपपर्यंत घट्ट कपड्यांचा एक नवा ट्रेंड सध्या बाजारात पाहायला मिळतोय. अगदी पुरुष असो वा स्त्री; प्रत्येक जणच घट्ट कपडे घालताना दिसतोय. या कपड्यांमध्ये तुम्ही सुंदर दिसू शकता. पण, यामुळे आरोग्याबाबत अनेक समस्यादेखील उद्भवू शकतात. त्यामुळे ‘फिटिंग’ कपड्यांच्या नादात तुम्ही स्वत:च्या शरीराचे जास्त नुकसान करीत आहात हे लक्षात ठेवा. याचबाबत दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना तज्ज्ञ डॉक्टरांनी काही महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिनमधील प्रमुख सल्लागार डॉ. नरेंद्र सिंघला याबाबत म्हणाले की, घट्ट कपडे परिधान केल्याने शरीरावर अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतात. ते नेमके काय ते जाणून घेऊ…
जेव्हा आपण खूप घट्ट कपडे घालतो तेव्हा शरीर अनेक प्रकारे त्याचे दुष्परिणाम दर्शवीत असते.
१) त्वचेची जळजळ : घट्ट कपडे घातल्याने त्वचेवर घर्षण निर्माण होते. ज्यामुळे त्वचा जळजळणे, लालसरपणा आणि पुरळदेखील येऊ शकते. कारण- घट्ट कपडे वारंवार त्वचेवर घासले जातात, ज्यामुळे या समस्या अधिक प्रमाणात वाढू शकतात.
२) नसांचे आकुंचन : घट्ट कपड्यांनी नसांचे आकुंचन होते. त्यामुळे शरीर सुन्न होणे, मुंग्या येणे किंवा वेदनादेखील होऊ शकतात. तुम्ही वारंवार घट्ट कपडे घालत असाल, तर कालांतराने नसांवर सतत येणाऱ्या दाबामुळे समस्या वाढू शकतात.
३) श्वास घेण्यास मर्यादा : घट्ट कपड्यांमुळे विशेषतः छाती किंवा पोटावर दाब येतो. त्यामुळे हालचाल करण्यास आणि मोकळा श्वास घेण्यास त्रास होतो. इतकेच नाही, तर शारीरिक थकवा आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते.
४) रक्ताभिसरणात बिघाड : अत्यंत घट्ट कपडे घातल्याने पाय किंवा कंबरेभोवतीचा रक्तप्रवाह रोखला जाऊ शकतो. रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे सूज येऊ शकते किंवा व्हेरिकोज व्हेन्स किंवा अत्यंत गंभीर आजार होऊ शकतात, इतकेच नाही तर रक्ताच्या गुठळ्या होऊन परिस्थिती बिघडू शकते.
घट्ट कपडे घालण्याचे अल्पकालीन परिणाम उपचार करण्यायोग्य असले तरी त्याचे दीर्घकालीन वापराचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात. डॉ. सिंघला यांनी कालांतराने विकसित होणाऱ्या अनेक गंभीर समस्यांबाबत माहिती दिली आहे.
१) गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या: घट्ट कपड्यांमुळे पोटाभोवती सतत दाब राहिल्याने अॅसिड रिफ्लक्स, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) आणि गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (GERD) यांसारखे आजार होऊ शकतात. घट्ट कपड्यांमुळे पोटावर दाब येतो. अशा वेळी पोटातील आम्ल वरच्या दिशेने ढकलले जाते आणि अस्वस्थता जाणवते.
२) संसर्गाचा धोका : घट्ट कपड्यांमुळे कमरेजवळ आणि मांड्यांजवळ घामामुळे ओलावा राहतो. विशेषत: महिलांना ही समस्या जाणवते. या ओलाव्यामुळे त्वचेसंबंधित विविध प्रकारच्या संसर्गाचा त्रास होऊ शकतो. जसे की, यीस्ट संसर्ग. अंडरवेअर किंवा सिंथेटिक कपड्यांमुळे त्वचेसंबंधीत संसर्गाचा धोका वाढतो. कारण- त्यामुळे त्वचेभोवतीची मोकळी हवा रोखली जाते.
३) मज्जातंतूंत वेदना : घट्ट कपड्यांमुळे सतत मज्जातंतूंवर दाब आल्याने शरीरात एक प्रकारे बधिरपणा, मुंग्या येणे किंवा वेदनादेखील होऊ शकतात. घट्ट कपडे घालणे बंद केल्यानंतरही तुम्हाला बराच काळ या समस्या जाणवू शकतात.
४) व्हेरिकोज व्हेन्सचा धोका : घट्ट कपड्यांमुळे दीर्घकाळ रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास व्हेरिकोज व्हेन्सचा धोका वाढू शकतो. कालांतराने शरीरात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात, ज्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की, डीप व्हेन थ्रोम्बोसिस.
५) मस्कुलोस्केलेटल स्ट्रेन : कालांतराने घट्ट कपडे घालल्याने तुमची स्थिती बदलू शकते. उदाहरणार्थ, टाइट बेल्ट किंवा कमरेच्या पट्ट्याचा तुमच्या पाठीच्या खालच्या भागावर जास्त ताण येऊ शकतो आणि त्यामुळे स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात. तुम्ही दीर्घकाळापर्यंत चुकीच्या सवयी फॉलो करीत राहिल्याने मान, पाठ व सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.
६) श्वसनाच्या समस्या : घट्ट कपड्यांमुळे श्वास घेण्यास त्रास तर होईल; पण कालांतराने श्वसनसंस्थेवरही परिणाम होऊ शकतो. जे लोक वारंवार घट्ट कपडे घालतात, त्यांना श्वसनाच्या दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात; विशेषतः जर त्यांना आधीच दम्यासारखे आजार असतील.
७) त्वचेचे आजार : घट्ट कपड्यांमुळे त्वचेवर दीर्घकाळ जळजळ झाल्यामुळे एक्झिमा किंवा त्वचारोग यांसारखे जुनाट आजार होऊ शकतात. जर ही स्थिती कायम राहिली, तर त्यामुळे त्वचेचे संक्रमणदेखील होऊ शकते.