हृदयाशी संबंधित तातडीच्या समस्या ओळखण्यात काही मिनिटांचाही विलंब जीवघेणा ठरू शकतो. अनेकदा हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट (Cardiac Arrest) यांची लक्षणे सारखी वाटतात; पण या दोन्ही स्थितींमध्ये जीव वाचवण्याच्या बाबतीत पूर्णपणे वेगवेगळ्या शक्यता असतात. हृदयविकाराच्या झटक्यासाठी तत्काळ औषध अस्तित्वात आहे का? हे जाणून घेण्यासाठी मनिपाल हॉस्पिटल, कोलकाता येथील हृदय शस्त्रक्रिया विभागाचे संचालक डॉ. कुमार सरकार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हृदयावर येणारा दाब कमी करण्यासाठी ‘अ‍ॅस्पिरिन’ घेण्याची शिफारस केली. परंतु, त्यांनी हेही स्पष्ट केले की, हृदयविकाराचा झटक्याची तीव्रता समजून घेणं आणि पहिल्या काही तासांत ती स्थिती म्हणजे हृदयविकाराचा झटका आहे की हृदयक्रिया बंद पडणे (Cardiac arrest) हे ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

“पहिले काही तास — विशेषतः पहिले चार तास — हे जीव वाचवण्यासाठी आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे लक्षणे त्वरित ओळखणे, त्वरित निदान करणे आणि त्वरित कृती करणे हे महत्त्वाचे आहे” असे डॉ. सरकार यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

हृदयविकाराचा झटका की कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट : अ‍ॅस्पिरिन कधी घ्यावी?

डॉ. सरकार यांनी हृदयविकाराचा झटका आणि कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्टमधील फरक स्पष्ट केला. हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाला होणारा रक्तपुरवठा बंद होणे; परंतु हृदय त्यावेळी धडधडतच असते. कार्डिअॅक अ‍ॅरेस्ट म्हणजे हृदयाचे कार्य पूर्णपणे थांबणे.

“कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट हा या स्थितीचा गंभीर टप्पा आहे,” असे त्यांनी सांगितले.

कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट ही गंभीर, प्री-टर्मिनल स्थिती आहे आणि १०० पैकी ९९ वेळा आपल्याला हृदयविकाराचा झटक्याच्या टप्प्यातच हस्तक्षेप करावा लागतो. व्यक्तीला त्या स्थितीतून वाचवण्यासाठी त्याला आधीच वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले जाणे आवश्यक आहे,” असे डॉ. सरकार यांनी स्पष्ट केले.

म्हणून फक्त हृदयविकाराचा झटका, जो तुलनेने कमी गंभीर आहे, तो अ‍ॅस्पिरिनने उलटवला जाऊ शकतो आणि त्यावर उपचार केला जाऊ शकतो.

“पण हे लक्षात ठेवा की, हृदयविकाराचा झटका आल्यानंतरच्या पहिल्या चार तासांत सर्व तातडीच्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे डॉ. सरकार यांनी सांगितले.

त्वरित काय करावे?

डॉ. सरकार यांनी सांगितलेले तातडीचे उपाय खालीलप्रमाणे :

अ‍ॅस्पिरिन घ्या : मात्र, किती प्रमाणात घ्यावी हे माहीत असणे महत्त्वाचे आहे. डॉ. सरकार यांच्या मते, १५०–३०० मिलिग्राम अ‍ॅस्पिरिन घेणे योग्य आहे (भारतामध्ये सामान्यतः ७५ मिलिग्रॅम आणि १५० मिलिग्रॅमचे प्रकार उपलब्ध आहेत).
किमान दोन १५० मिलिग्रॅमच्या गोळ्या किंवा ७५ मिलिग्रॅमच्या तीन गोळ्या घ्या; जर तुमच्याकडे त्या उपलब्ध असतील.

त्वरित बसवा किंवा झोपू द्या : चालणे किंवा उभे राहणे टाळा. कारण- हृदयविकाराचा झटक्याच्या वेळी रक्तदाब कमी होऊ शकतो.

तातडीने मदतीसाठी कॉल करा : थोड्या वेळाने बरे वाटेल, असे वाटून थांबू नका. तातडीने जवळच्या रुग्णालय, नर्सिंग होम किंवा इमर्जन्सी सेंटरकडे जा.

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे

डॉ. सरकार यांच्या मते, हृदयविकाराचा झटका (मायोकार्डियल इन्फार्क्शन) जेव्हा येतो तेव्हा हृदयाच्या एखाद्या भागाचा रक्तपुरवठा बंद होतो आणि हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते. त्या वेळची सर्वसाधारण लक्षणे : तीव्र छातीत दुखते, घाम येणे.

“अनेक लोक सुरुवातीची ही लक्षणे म्हणजे अपचन किंवा गॅसची समस्या समजतात. पहिल्या १०–१५ मिनिटांत ते फक्त अन्न नीट न पचल्यासारखे वाटू शकते; पण जर ही अस्वस्थता कायम राहिली, घाम येऊ लागला, तर तत्काळ कृती करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.