Which Food Is Best For Thyroid : आजकाल महिलांमध्ये थायरॉईड ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येतेय. थायरॉईड हा जीवनशैलीशी संबंधित आजार आहे, ज्यामुळे जगभरातील अनेक लोक त्रस्त आहेत. अनेक जण यासाठी महागडी औषधंही घेतात. पण, कदाचित तुम्ही औषधांशिवायही थायरॉईड नैसर्गिकरीत्या नियंत्रणात ठेवू शकता. थायरॉईड ही तुमच्या मानेतील एक लहान, फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. पण, त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो. चयापचय आणि ऊर्जेची पातळी नियंत्रित करण्यापासून ते हृदय गती, मूड व अगदी मासिक पाळीला आधार देण्यापर्यंत, थायरॉईड ग्रंथी एकूणच आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा ही ग्रंथी योग्यरीत्या कार्य करत नाही. तेव्हा थकवा, वजन वाढणे, थंडी व केस गळणे यांसारख्या विविध लक्षणांचा सामना करावा लागू शकतो.

थायरॉईड आजारावर विशेषतः हायपोथायरॉईडीझम किंवा हायपरथायरॉईडीझमवर उपचार करण्यासाठी औषधे आवश्यक असतात. पण, काही पदार्थ थायरॉईडच्या आरोग्यास मदत करू शकतात आणि तुमच्या वैद्यकीय उपचारांना ते पूरक ठरू शकतात.

तर कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि कोणत्या बाबतीत तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे? याबद्दल अधिक समजून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली.

फरीदाबाद येथील क्लाउडनाइन हॉस्पिटलमधील कन्सल्टंट व गायनॅकॉलॉजिस्ट डॉक्टर शैली शर्मा यांनी सांगितले की, थायरॉईडच्या कार्याला नैसर्गिकरीत्या आधार देणारे चार पदार्थ असतात. काही पदार्थ थायरॉईडचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी मदत करतात. कारण- त्यात शरीराला उपयुक्त असे पौष्टिक घटक असतात.

सीवुड (Seaweed)

सीवुड म्हणजेच समुद्रात उगवणारे एक प्रकारचे शैवाल आहे. ज्याला नोरी, केल्प व वाकामे असेही म्हणतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात आयोडीन असते. आयोडीन थायरॉईड हार्मोन्स तयार कारण्यासाठी खूप गरजेचे असते. जर शरीरात आयोडीन कमी झाले, तर थायरॉईडचे काम कमी होऊ शकते आणि त्यामुळे गाठ येऊ शकते. ज्यांना आधीच थायरॉईडचा त्रास आहे, त्यांनी आयोडीनचे खूप कमी प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. नाही तर ते शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते.

ब्राझील नट्स (Brazil nuts)

थायरॉईडचा त्रास कमी करण्यासाठी ब्राझील नट्स मदत करू शकतात, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियम असते. सेलेनियम हे एक ट्रेस मिनरल आहे, जे थायरॉईड हार्मोन्सच्या सक्रियतेत महत्त्वाची भूमिका बजावतात आणि थायरॉईड ग्रंथीला ऑक्सिडेटिव्ह ताण, जळजळ होऊ नये यासाठी संरक्षण देतात. त्यामुळे दररोज फक्त एक किंवा दोन ब्राझील नट्सदेखील तुमच्या शरीराच्या सेलेनियमच्या गरजा पूर्ण करू शकतात.

अंडी (Eggs)

थायरॉईड-अनुकूल आहारात अंडीसुद्धा उपयोगी आहेत, ज्यामध्ये आयोडीन, सेलेनियम, उच्च गुणवत्तेची प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात, जे एकूण चयापचयाला समर्थन देतात. आहारात संपूर्ण अंडे खाल्याने थायरॉईड हार्मोन्सच्या नियमनासाठी महत्त्वपूर्ण बिल्डिंग ब्लॉक्स पुरवण्यास मदत होऊ शकते.

दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थ (Yoghurt and other dairy products)

दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थ आयोडीनने समृद्ध आणि व्हिटॅमिन डीचा एक चांगला स्रोतदेखील असतात. व्हिटॅमिन डीची कमी पातळी हाशिमोटोच्या थायरॉइडायटिससारख्या ऑटोइम्युन थायरॉइड विकारांशी संबंधित आहे. तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा मर्यादित प्रमाणात समावेश केल्याने थायरॉइडच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक घटकांचा संतुलित स्रोत मिळण्यास मदत होऊ शकते.

थायरॉईडच्या कार्यात अडथळा आणणारे पदार्थ कोणते?

१. विशेषतः ज्यांना आधीपासून थायरॉईड आहे, त्यांच्या थायरॉईडच्या कार्यात ब्रोकोली, कोबी व केल यांसारख्या क्रूसिफेरस भाज्या अडथळा आणू शकतात. त्या भाज्यांमध्ये गॉइट्रोजेन नावाचा पदार्थ असतो, जे थायरॉईडच्या आयोडीन शोषण्याच्या क्षमतेत व्यत्यय आणू शकतात. जरी या भाज्या पोषक घटकांनी समृद्ध आणि निरोगी असल्या तरीही आयोडीनची कमतरता किंवा हायपोथायरॉईडीझम असलेल्या लोकांनी त्यांचा गॉइट्रोजेनिक प्रभाव कमी करण्यासाठी या भाज्या माध्यम प्रमाणात शिजवून त्यांचे सेवन केले पाहिजे, असे डॉक्टर शर्मा म्हणाले आहेत.

२. सोया-आधारित उत्पादने, जसे की टोफू, सोया दूध, थायरॉईड संप्रेरक बदलण्याच्या औषधांच्या शोषणात व्यत्यय आणू शकतात. थायरॉईड औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या डोसच्या काही तासांच्या आत सोयाचे सेवन करणे टाळावे.

३. त्याचबरोबर ग्लुटेन (गहू, बार्ली, राय यांमध्ये ग्लुटेन आढळते) विशेषतः ज्यांना ऑटोइम्युन थायरॉईडचा त्रास आहे जसे की, हाशिमोटोच्या थायरॉईडायटिस त्यांच्यासाठी ग्लुटेन त्रासदायक ठरू शकते. जर ग्लुटेनची अ‍ॅलर्जी किंवा सिलिआक आजार असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं ग्लुटेनमुक्त आहार घेणं फायद्याचं ठरू शकतं, असे डॉक्टर डॉक्टर शर्मा म्हणतात.