मधुमेह असलेल्या लोकांना जांभूळ खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो, ज्याला आपण ब्लॅक प्लम (black plum) किंवा इंडियन ब्लॅकबेरी (Indian blackberry) सुद्धा म्हणतो, कारण जांभूळ रक्तातील साखर लवकर वाढवत नाही. पण तुम्हाला माहितीये का जांभूळ यकृताच्या आरोग्यासाठीसुद्धा एक चांगला पर्याय आहे. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसने दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलच्या एंडोक्रायनोलॉजीच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. रीचा चतुर्वेदी यांच्याशी बातचीत केली.
जांभूळ यकृताच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे?
जांभळामध्ये अँथोसायनिन्स आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे यकृत स्वच्छ ठेवण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास किंवा पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. ते यकृताची जळजळ तसेच एन्झाइम्सची पातळी कमी करतात आणि खराब झालेल्या यकृतातील पेशी पुन्हा तयार करण्यास मदत करतात. जांभळाच्या नियमित सेवनाने यकृतामध्ये फॅट्स तयार होणे कमी होऊ शकते. विशेषतः ज्या लोकांची खूप जास्त कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली आहे किंवा ज्यांना लठ्ठपणा आहे, त्यांना जांभूळ खाणे फायदेशीर ठरू शकते. जांभूळ पित्त नियंत्रित करण्यास मदत करते, पोटाशी संबंधित आजार कमी करते, तसेच पचनसंस्था निरोगी ठेवते, यामुळे अप्रत्यक्षपणे यकृत निरोगी राहते.
जांभूळ रक्तातील साखर कशी नियंत्रित करते?
आपले शरीर स्टार्चचे रुपांतर साखरेत कसे करते याचे नियमन करणारे कंपाउंड या जांभळामध्ये असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणखी स्थिर राहते. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जांभूळ शरीराला इन्सुलिनचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यास मदत करू शकते.
जास्तीत जास्त फायद्यासाठी जांभूळ कसे खावे?
जांभूळ कच्चे आणि फ्रेश खाणे सर्वात चांगले आहे. सुरुवातीला जांभूळ चांगले धुवून घ्या. त्यानंतर त्यातील बिया काढून टाका आणि स्नॅक्स म्हणून त्याचे सेवन करा. वाळलेल्या जांभळाच्या बियांची पावडर बनवून पाण्याबरोबर सेवन करू शकता. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही सकाळी एक चमचा जांभुळाच्या बियांची पावडर पाण्याबरोबर घेऊ शकता. साखर न टाकता जांभळाचा ताजा बनवलेला रससुद्धा फायदेशीर आहे. या रसाचे सकाळी सेवन करू शकता. दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा याचे सेवन करू नका.
तुम्ही दिवसातून किती जांभूळ खाऊ शकता?
दररोज ८-१० जांभूळ म्हणजे एखादी वाटी जांभूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मधुमेही पहिल्यांदा जांभूळ खात असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण तपासावे आणि त्यानुसार जांभळाचे कमी सेवन करावे. १०० ग्रॅम म्हणजे अर्धा कप पेक्षा जास्त जांभूळ खाऊ नये. संतुलित जेवणाचा भाग म्हणून जांभूळ खावे. जांभूळ उपाशी पोटी खाऊ नये, तसेच याचे अति सेवनसुद्धा करू नये.
जांभळाच्या बियांचा वापर
जांभळाच्या बिया फळांसारख्या कच्च्या खाल्ल्या जात नाही, पण त्याची पावडर तयार करून सेवन करणे फायदेशीर ठरू शकते; कारण त्यात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करणारे कंपाउंड असतात. तुम्ही या बिया सूर्यप्रकाशात वाळवू शकता आणि पावडर तयार करू शकता. ही पावडर दररोज एक चमचा पाण्यात किंवा ताकात मिसळून सेवन करा, पण त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. विशेषत: जर तुम्हाला मधुमेह असेल तर याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे.
कोणती फळे जांभळाबरोबर एकत्र खाऊ नयेत?
जांभूळ इतर फळांबरोबर एकत्र खाऊ नये. जांभळाबरोबर एकत्र खाणे टाळावे अशी काही फळे आहेत:
लिंबूवर्गीय फळे (जसे की संत्री, लिंबू): ही फळे अॅसिडयुक्त असतात आणि जांभळाच्या तुरट गुणधर्मावर परिणाम करू शकतात, ज्यामुळे अॅसिडिटी किंवा अपचन होऊ शकते.
केळी किंवा चिकू : जांभळाबरोबर ही फळे एकत्र खाल्ल्यास पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
साखरयुक्त फळे (जसे की आंबे, द्राक्षे) : हे मिश्रण मधुमेहाचा आजार असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकते, यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.
तसेच दूध किंवा दह्यासारख्या दुग्धजन्य पदार्थांबरोबर जांभूळ खाणे टाळा, कारण यामुळे पचनक्रिया बिघडू शकते.