सध्या दिवाळी सुरू आहे. दिवाळी म्हटली की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच फटाके उडवताना दिसून येतात. परंतु, फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषणासह वायुप्रदूषणसुद्धा होते आणि त्यामुळे वातावरण दूषित होताना दिसून येते. सार्वजानिक आरोग्यावरही फटाक्यांचा विपरीत परिणाम दिसून येतो. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, आजारी लोक किंवा गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
दिवाळीत फटाक्यांमुळे वाढत्या वायुप्रदूषणाचा त्रास गर्भवती महिलांना खूप जास्त होऊ शकतो. अशात महिलांनी या काळात कोणती काळजी घ्यावी, याविषयीची अधिक माहिती नवी दिल्ली आणि वृंदावन येथील आयव्हीएफ (IVF) सेंटरच्या मेडिकलच्या संचालक व आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. शोभा गुप्ता यांनी दिली आहे.

प्रदूषण का धोकादायक?

डॉ. शोभा गुप्ता सांगतात, “फटाक्यातून बाहेर पडणाऱ्या खराब धुरामुळे गर्भवती महिलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे बाळाचे वजन कमी होणे, लवकर प्रसूती होणे, तसेच गर्भातील बाळाच्या फुप्फुसांना धोका उदभवू शकतो.”
डॉ. गुप्ता पुढे सांगतात, “जेव्हा गर्भवती महिला श्वास घेतात तेव्हा फटाक्यांमुळे तयार झालेले हवेतील विषारी वायू सहजपणे त्यांच्या रक्तात प्रवेश करतात आणि त्याचा थेट परिणाम गर्भावर होतो हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.

आपल्याला माहीत आहे की, फटाक्यांतून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये चुकूनही श्वास घेऊ नये. बाळाचे अवयव हे सहाव्या ते बाराव्या आठवड्यांदरम्यान तयार होण्यास सुरुवात होते. त्यामुळे फटाक्यांतून बाहेर पडणाऱ्या खराब धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणापासून गर्भवती महिलांनी दूर राहणे गरजेचे आहे.”
त्याशिवाय दिवाळीनंतर स्किन अॅलर्जीचीअनेक प्रकरणे समोर येतात. डॉ. गुप्ता सांगतात, “वाढत्या वायुप्रदूषणामुळे त्वचेला खाज सुटणे, त्वचेचे आजार व डोळ्यांमध्ये जळजळ दिसून येते.”

हेही वाचा : तुम्हाला मधुमेह आहे, पण गोड खायला आवडते का? वाचा, तज्ज्ञांनी सांगितलेल्या खास डाएट टिप्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. गुप्ता यांनी दिवाळीत गर्भवती महिलांच्या सुरक्षित आरोग्यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत.

  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गर्भवती महिलांनी नेहमी फ्लॅट शूज आणि त्यांना सोईस्कर असे कपडे घालावेत. कॉटनचे कपडे हा खूप चांगला पर्याय आहे. सिंथेटिक कपडे चुकूनही घालू नयेत. कारण- त्यामुळे लगेच आग अंगावर येऊ शकते.
  • गर्भवती महिलांनी पाऊस, रॉकेट किंवा चकरी फटाके पेटवताना दूर राहावे. अनेकदा गर्भवती महिला फटाके उडवत नाहीत; पण हौसेमुळे फूलबाजा पेटवतात. अशा वेळी त्यांनी खूप काळजी घेणे गरजेचे आहे.
  • फटाक्यांच्या मोठ्या आवाजापासून दूर राहावे. ध्वनिप्रदूषणामुळे आई आणि गर्भ दोघांनाही खूप त्रास होऊ शकतो.
  • गर्भवती महिलांनी कोणतीही जड वस्तू उचलू नये. दिवाळीदरम्यान घरी आराम करावा. घराबाहेर पडणे टाळावे. प्रदूषण टाळावे आणि भरपूर झोप घ्यावी.