गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिक जीवनशैलीमुळे सर्वच स्तरांमधील लोकांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले दिसून येतात. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा असे अनेक आजार सर्वच वयोगटांतील लोकांमध्ये वाढलेले दिसत आहेत. आजकालची धावपळीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी यांमुळे हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. माणसाच्या अशा बऱ्याच चुकीच्या सवयी असतात, ज्या हृदयाच्या रोगास कारणीभूत ठरतात. आपण जर का आपल्या चुकीच्या सवयी सोडल्या आणि आपल्या हृदयाला बळकट बनवलं तर या हृदयविकाराच्या झटका येण्याच्या धोक्याला बऱ्यापैकी कमी करू शकतो हे खरं आहे. पण, ‘टप्प्याटप्प्याने उपवास’ (इंटरमिटेंट फास्टिंग) केल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? याच विषयावर डॉ. व्ही. मोहन यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

अलीकडील दीर्घकालीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, ‘टप्प्याटप्प्याने उपवास’ (इंटरमिटेंट फास्टिंग) केल्याने अशा प्रकारच्या आहार योजनेमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांमुळे मृत्यूचा धोका ९१ टक्के वाढू शकतो. आजकाल इंटरमिटेंट फास्टिंग हा ट्रेंड सुरू आहे. इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय, तर अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी उपवास ठेवणे. त्यामध्ये आठवड्याचे पाच दिवस सामान्य आहार घेतात आणि उरलेले दोन दिवस उपवास करतात किंवा आठ तासांच्या कालावधीत जेवण घेऊन दररोज उपवास करतात. दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण रात्री आठच्या आधी घेतात आणि नाश्ता वगळतात.

(हे ही वाचा : महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप )

पण, खरंच उपवास केल्याने मृत्यूचा धोका वाढू शकतो का? तज्ज्ञ सांगतात, “इंटरमिटेंट फास्टिंग करण्याबद्दलची आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे सर्व जेवण खरोखरच कमी वेळेत घेत असाल, तर त्यामुळे पचनसंस्थेवर थोडा ताण येऊ शकतो; कारण एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात अन्न खाण्याची सवय नसते आणि तुमची उपासमार होत असल्याने, रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढण्याची शक्यता असते. ‘अधूनमधून उपवास’ करणे परिणामकारक असले तरी प्रत्येकासाठी तो सर्वोत्तम पर्याय असू शकत नाही. दीर्घकाळ उपाशी राहण्यापेक्षा, योग्य वेळेत आणि प्रमाणात निरोगी पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर आहे. वजन कमी करण्याचा हा चांगला पर्याय असू शकतो.”

खरं तर इंटरमिटेंट फास्टिंग करणारे अनेक लोक सकाळी नाश्ता करू शकत नाहीत. तसेच त्यांचे दुपारचे जेवणही होत नाही. मात्र, या दरम्यान ते चहा-बिस्कीट वगैरे खातात. मग संध्याकाळी खूप भूक लागली की कँटिनमधून काहीतरी मागवले जाते आणि रात्रीचे जेवण एकदम भरपेट घेतले जाते. दुसऱ्या दिवशीही हेच चक्र, यामुळे शरीराचे नुकसानच होते.

सर्वांनीच इंटरमिटेंट फास्टिंग करू नये. जास्त कॅलरीची आवश्यकता असणार्‍या २५ वर्षांखालील तरुण आणि गर्भवती महिलांनी अशा प्रकारचा उपवास अजिबातच करू नये. तसेच, मधुमेह असणार्‍यांनी आणि हृदयविकार असलेल्यांनीही उपवास करू नये. तुम्ही तुमच्या खानपानाच्या आराखड्यात आणि तुमच्या शरीराच्या स्थितीत कोणताही बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे फार गरजेचे आहे.