Weight Loss Benefits And Risks : करण कुंद्रा हा हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय चेहरा आहे. त्याने मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करून हिंदी मालिकाविश्वात काम करीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तर, अलीकडेच करण कुंद्राने दिलेल्या एका मुलाखतीत एका महिन्यात १२ किलो वजन कसे कमी केले याबद्दल सांगितले होते; त्याने फॅड डाएट किंवा शॉर्टकटकडे न वळता, सर्वांत सोपे उपाय फॉलो केले होते. पण, तुमच्यासाठी ही पद्धत आरोग्यदायी आहे का याबद्दलही तितकाच बारकाईनं विचार करायला हवा.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, त्याने फक्त एका महिन्यात पारंपरिक पद्धतींनी १२ किलो वजन कमी केले, असे सांगितले. जुन्या चालीरीतींकडे वळून त्याने तूप खाल्ले आणि उपवासही केला. वजन कमी केल्यामुळे फक्त शारीरिक बदलच होत नाहीत, तर तुमच्या ऊर्जेत, तुमच्या व्यक्तिमत्त्वात, अगदी जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनही बदलतो. तसेच काहीसे या अभिनेत्याच्या बाबतीतही घडले. “काहीही कायमचे टिकत नाही, मग ती प्रसिद्धी असो, पैसा असो किंवा यश. फक्त टिकून राहते ते आरोग्य”. पालक वयस्कर होत जातात आणि हळूहळू कुटुंबही वाढत जाते. त्यामुळे पहिले प्राधान्य हे आरोग्यच असले पाहिजे, असेही तो मुलाखतीत आवर्जून म्हणाला.

तर, पारंपरिक पद्धत वापरून वजन कमी करणे सुरक्षित आहे का?

याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने सल्लागार आहारतज्ज्ञ व मधुमेह शिक्षक कनिक्का मल्होत्रा ​​यांच्याशी चर्चा केली. त्या म्हणाल्या की, एका महिन्यात १२ किलो वजन कमी करणे म्हणजे दर आठवड्याला जवळपास तीन किलो वजन कमी करणे होय. पण, शास्त्रीयदृष्ट्या वजन कमी करण्याचा सुरक्षित वेग म्हणजे आठवड्याला फक्त ०.५ ते १ किलो वजन कमी करणे. म्हणूनच १२ किलो एका महिन्यात कमी करणे ही खूप वेगानं वजन कमी करण्याची पद्धत आहे आणि शरीरासाठी धोकादायकसुद्धा आहे . त्याचप्रमाणे उपवास आणि तूप यांसारख्या पारंपरिक मार्गांनीदेखील जलद वजन कमी केल्याने पित्ताशयातील खडे व शरीरात पौष्टिक कमतरता निर्माण होऊ शकते आणि विशेषतः मूत्रपिंड आणि हृदयावर ताण येऊ शकतो.

उपवासाचे वैज्ञानिकदृष्ट्या फायदे असले तरीही उपवास करणे नेहमीच सुरक्षित नसते; विशेषतः मधुमेह, हृदयरोग किंवा दीर्घकालीन आजारी रुग्णांच्या बाबतीत तरी… तुपाचा आहारात थोड्या प्रमाणात समावेश केल्यास तो संतुलित आहाराचा एक भाग ठरू शकतो. पण, जास्त तूप किंवा इतर सॅच्युरेटेड फॅट खाल्ल्यास रक्तातील फॅट्स (लिपिड्स) बिघडू शकतात आणि ज्यांना हृदयाचे आजार होण्याची शक्यता जास्त आहे अशा लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका आणखी वाढू शकतो. म्हणून जास्त वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या देखरेखीची आवश्यकता असते, असे कनिक्का मल्होत्रा म्हणाल्या आहेत.

वजन कमी करताना आहारात संस्कृती आणि परंपरेनुसार बदल करणे महत्त्वाचे आहे का?

आहारशास्त्रात डायट कल्चरलायझेशन (म्हणजे आहारात संस्कृती आणि परंपरेनुसार बदल) आणि जिनेटिक इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे (व्यक्तीच्या जीन्सनुसार आहारात बदल) याला जास्त महत्व दिले जाते. जीन्सच्या मेटाबॉलिझमवर म्हणजे अन्न पचवण्यावर, अन्नाची सहनशीलता, दीर्घकालीन आजार होण्याची शक्यता यांवर थेट परिणाम होतो. त्यामुळे आहाराचा आराखडा, कोणते फॅट्स घ्यावेत आणि उपाशीपोटी किती फॅट्स घ्यावे, उपवासाची पद्धत या गोष्टी ठरवताना हे सर्व फरक लक्षात घेणे गरजेचे आहे, असे कनिक्का मल्होत्रा म्हणाल्या आहेत.

वजन नियंत्रणासाठी सर्वांत योग्य मार्ग (Weight Loss Tip)

संस्कृतीनुसार असलेला आहार लोकांना पाळायला सोपा जातो. त्यामुळे मानसिक समाधान मिळते. आणि दीर्घकाळात वजन कमी करण्यामध्ये यश मिळू शकते. पण, भारतीय लोकसंख्येमध्ये सामान्यतः आढळणारे धोके, ज्यामध्ये इन्सुलिन रेसिस्टन्स (साखर नीट न पचणे), हृदयरोग असणाऱ्यांनी वजन कमी करताना वैज्ञानिक सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरक्षित, प्रभावी व टिकून राहणारे वजन नियंत्रणासाठी सर्वांत योग्य मार्ग म्हणजे असा मिश्रित दृष्टिकोन जो आपल्या संस्कृतीचा आदर करतो आणि त्याचबरोबर वैज्ञानिक पुरावे व व्यक्तीनुसार आहाराच्या गरजा लक्षात घेतो, असे कनिक्का मल्होत्रा म्हणाल्या आहेत.