Active life for healthy ageing वय वाढणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण वय वाढलं की शारीरिक बदलांसोबत काही मानसिक, भावनिक आणि वैचारिक बदलदेखील होतात. यामुळे दैनंदिन कामं करताना थकवा जाणवणं, आत्मविश्वास कमी होणं किंवा एकट वाटणं अशी लक्षण दिसतात. त्यामुळे निरोगी वृद्धत्व हे फक्त शारीरिक स्वास्थ्यापुरत मर्यादित नसून, मानसिक आरोग्य, सक्रिय सामाजिक जीवन आणि अर्थपूर्ण भावनिक स्वास्थ्य यांची सांगड आहे.
मानसिक पैलू: भीती आणि निराशा
अनेकदा वृद्ध व्यक्ती या ‘भीती’ आणि ‘निराशा’ या भावनांनी ग्रस्त असतात. पडण्याची भीती, आजारपणाची काळजी किंवा इतरांवर अवलंबून राहण्याची भावना यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. अशातच घरात पुरेशी माणसे नसतील तर त्यांच्यात एकटेपणाची भावना सुद्धा येते. त्यांचा स्वतःच्या क्षमतांवरचा विश्वास कमी होतो. यामुळे नकळत शारीरिक हालचाल हालचाल कमी होते आणि शरीर आणखी अशक्त होतं.
नियमित व्यायाम व संतुलित हालचाल
संशोधन असं सांगते की, नियमित व्यायाम आणि संतुलित हालचाली केल्याने मानसिक आरोग्य सुधारतं. व्यायामांमुळे मेंदूत डोपामाईन आणि सेरोटोनिनसारखी रसायने तयार होतात, जी मन प्रसन्न ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे फिजिओथिरेपीत श्वसनाचे व्यायाम, सौम्य स्ट्रेचिंग आणि संतुलन वाढवणारे व्यायाम दिले जातात.
सामाजिक पैलू: नाती टिकवा, सामाजिक सहभाग वाढवा
वृद्धत्वात सामाजिक सहभाग कमी झाला की एकटेपणा वाढतो. अनेक वेळा घरातील कामं कमी होतात, नोकरीतून निवृत्ती झालेली व्यक्ती असते आणि नाती केवळ औपचारिक राहतात किंवा जवळची माणसं कामानिमित्त किंवा नोकरी निमित्त बाहेरगावी किंवा परदेशी असतात. पण संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, मित्र-परिवाराशी संपर्क ठेवणं मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
फिजिओथेरेपीमध्ये केवळ व्यायाम नाही, तर दैनंदिन जीवनशैली बदलण्याचा सल्लाही दिला जातो. जसे की छोट्या गटांमध्ये चालण्याचा सराव, योग वर्गात सहभागी होणं किंवा नातवंडांसोबत खेळण्यासाठी वेळ ठेवणं. त्यामुळे वृद्ध व्यक्ती समाजाशी जोडलेली राहते आणि आत्मविश्वास परत मिळवते.
शारीरिक पैलू: हालचाल हेच औषध
मन आणि समाज यांसोबत शरीरही महत्वाचं आहे. नियमित हालचालीमुळे स्नायू मजबूत राहतात, हाडं ठिसूळ होण्यापासून वाचतात, आणि संतुलन सुधारल्यामुळे पडण्याचा धोका कमी होतो. त्याच वेळी योग्य व्यायामामुळे झोप सुधारते, पचन व्यवस्थित राहते आणि मानसिक सक्रियता वाढते. फिजिओथेरेपिस्ट प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार वैयक्तिक व्यायाम आखून देतात. त्यात चालणे, सौम्य स्ट्रेचिंग , श्वसनाचे व्यायाम, संतुलन वाढवणारे व्यायाम आणि घरातील सुरक्षिततेसंबंधी मार्गदर्शन दिलं जातं.
मन, शरीर आणि समाज यांचा समन्वय: काही महत्त्वाच्या गोष्टी
- मन शांत ठेवण्यासाठी श्वसन आणि ध्यानाचे व्यायाम करा
- आत्मविश्वास वाढवणारे, संतुलन आणि स्नायूंची कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम करा
- नातेवाईक व मित्रांसोबत नियमित संवाद राखा
- सामाजिक उपक्रमांमधे उदा. योग, चालण्याचे गट किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हा
- घरातील वातावरणात योग्य ते बदल करून वृद्ध व्यक्तींसाठी घर अधिक सुरक्षित करा घर: घरात पुरेसा प्रकाश ठेवणं, योग्य ठिकाणी ग्रॅब बार्स लावणं,योग्य पादत्राणे याकडे लक्ष देणं
निरोगी वृद्धत्व हे एका गोष्टीवर अवलंबून नाही. मन आणि शरीर यांचा समतोल राखणं, तसेच समाजाशी जोडलेलं राहणं हा वृद्धत्वाचा खरा आधार आहे. नियमित हालचाली, मानसिक स्थिरता आणि सामाजिक सहभाग यांच्या मदतीने वृद्ध व्यक्ती स्वावलंबी राहू शकतात आणि जीवनाचा आनंद टिकवू शकतात.
“शांत मन, सक्षम शरीर आणि सुदृढ नातेसंबंध: हाच निरोगी वृद्धत्वाचा मार्ग!”