Navratri 2025: नवरात्र हा उत्सव शक्तीला समर्पित उत्सव आहे. यावेळी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या नऊ दिवसांत उपवास आणि पूजा केल्याने आत्म्याचं शुद्धीकरण होतं आणि मानसिक शक्ती वाढते असं मानलं जातं. या काळात उपवास केल्याने व्यक्तीला त्यांच्या इच्छा आणि तृष्णा नियंत्रित करण्यास मदत होते, त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते. उपवासाच्या काळात फळे, दूध, दही साबुदाणा, बदाम, शेंगदाणे अशा हलके आणि सात्विक पदार्थांचे सेवन केले जाते. हे पदार्थ शरीराला विषमुक्त करण्यास मदत करतात. फळे आणि दुधातील जीवनसत्त्वे, खनिजे पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. या काळात धान्य आणि तेलकट पदार्थ टाळल्याने पचन सुधारते, वजन नियंत्रित होते. नवरात्रात उपवास केल्याने मानसिक आरोग्य सुधारते.

नवरात्र हा केवळ धार्मिक सण नाही, तर आध्यात्मिक साधना आणि शारीरिक शुद्धीकरणाचा एक अद्भूत संगम आहे. नवरात्रोत्सवानिमित्त प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी स्पष्ट केले की लोक नवरात्रीला उपवास आणि विषमुक्तीचा काळ मानतात. मात्र, ते त्यापेक्षा खूपच शक्तिशाली आहे. नवरात्रात उपवास केल्याने केवळ शरीरच नाही, तर पचनही सुधारते आणि ताण कमी होतो.

नवरात्रीच्या काळात पुरेसे पोषण देणारे, अशक्तपणा दूर करणारे आणि शरीर निरोगी ठेवणारे चार पदार्थ खाण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. काही पदार्थ निरोगी चरबी, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी१२ने समृद्ध असतात. ते आपल्या शरीराला मुबलक शक्ती देतात. हे पदार्थ उपवासाच्या काळात आपल्या शरीराला अशक्तपणापासून मुक्त करतात. उपवासाच्या काळात कोणते चार पदार्थ खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात ते जाणून घेऊया…

राजगिरा

नवरात्रीत राजगिरा खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. ते लाडू, थालीपीठ, रोटी किंवा चिक्की म्हणून खाऊ शकता. राजगिरामधील मुख्य पोषक तत्व लोह आहे. लोह शरीरात हिमोग्लोबिनची पातळी राखते, अशक्तपणा रोखते आणि शरीराला पुरेशी ऊर्जा प्रदान करते. नियमित सेवनाने केसांचे आरोग्य सुधारते, त्वचा चमकदार होते आणि शारीरिक शक्ती टिकते. उपवास करताना लोहयुक्त आहार घेणे आवश्यक आहे.

काजू

नवरात्रीत काजू खाणे फायदेशीर आहे. काजू हे मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत आहे. जर रात्री तुमचे पाय दुखत असतील, गॅस होत असेल किंवा झोपेचा अभाव असेल तर काजू खाणे फायदेशीर ठरू शकते. यातील मॅग्नेशियमचे प्रमाण नसांना आराम देते आणि झोपेच्या समस्यांपासून सुटका करते. काजू खाल्ल्याने ऊर्जादेखील वाढते आणि शरीर निरोगी राहते. उपवास करताना थोड्या प्रमाणात काजू शरीराला आवश्यक खनिजे मिळतात आणि पचनक्रिया मजबूत होते.

केळी खाणे महत्त्वाचे

उपवास करत असताना केळी खाणे आवश्यक आहे. कारण त्यात व्हिटॅमिन बी६ भरपूर प्रमाणात असते. यातील पोषकतत्वे तुमचा मूड सकारात्मक ठेवतात आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन बी६ स्तनाच्या वेदनांपासून देखील आराम देते. मासिक पाळीपूर्वी ज्या महिलांना हा त्रास होतो, त्यांच्यासाठी केळी खाणे फायदेशीर आहे. केळ्यांमध्ये प्रीबायोटिक गुणधर्म भरपूर असतात. ते निरोगी पचनसंस्था राखण्यास मदत करतात आणि आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवतात. केळी खाल्ल्याने पचन सुधारते, ऊर्जा मिळते आणि मन आनंदी राहते.

डाळी आणि अंकुरलेले धान्य (शेंगा)

नवरात्रीच्या काळात अंकुरलेल्या डाळी आणि धान्य खाण्याची परंपरा दक्षिण भारतात आहे. हरभरा, चवळी, राजमा आणि इतर डाळी भिजवून, अंकुरित करून भाजी म्हणून शिजवल्या जातात. हे पदार्थ प्रथिने आणि अमीनो आम्लांचे उत्तम स्त्रोत आहेत. त्यांचे सेवन हाडे मजबूत करते आणि मेंदूचे आरोग्य वाढवते. ते ऊर्जादेखील टिकवून ठेवतात आणि जास्त काळ पोट भरलेलं ठेवतात. उपवास करताना त्यांचा समावेश केल्याने पौष्टिक कमतरता टाळण्यास मदत होते आणि शरीर सक्रिय राहते.