Teeth Whitening Home Remedies : छोट्या पडद्यावरील मालिकांमधून अनेक अभिनेत्रींनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यातील एक निया शर्मा आहे. “एक हजारो में मेरी बेहना हैं”, “नागीन” मध्ये काम करून अभिनेत्री घराघरात पोहचली. त्याचबरोबर अभिनेत्री तिच्या बोल्ड, बिंधास्त लूकसाठी सुद्धा प्रसिद्ध असते. अलीकडेच या अभिनेत्रीने इस्टाग्रामवर व्हायरल होणारी, दात पांढरे करण्यासाठीचा घरगुती उपाय व्हिडीओद्वारे शेअर केला. व्हिडीओमध्ये तिने “रक्त वगैरे आलं तर मी सांगेन तुम्हाला” असं म्हणत बेकिंग सोडा, मीठ, खोबरेल तेल आणि टूथपेस्टचे मिश्रण तयार केले आणि दात घासून दाखवले, यामुळे दातांवरील पिवळे डाग दूर होतील असा दावा देखील तिने केला आहे.
ऑनलाईन अशाप्रकारचे उपाय खूप लवकर व्हायरल होतात. पण, हे उपाय दातांसाठी सुरक्षित आहेत का किंवा याचे दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतील याबद्दल देखील जाणून घेणे महत्वाचे आहे. कारण – बेकिंग सोडा आणि मीठ यासारखे घटक त्यांच्या खडबडीत पोत असणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखले जातात. त्याचप्रमाणे नारळ तेल नैसर्गिक क्लिंजर म्हणून काम करते. त्यामुळे या सगळ्या पदार्थांचे मिश्रण दात पांढरे शुभ्र करण्यासाठी खरोखरचं काम करणार का? यामुळे तोंडाच्या आरोग्याचे नुकसान तर होणार नाही ना? याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली.
बेकिंग सोडा, मीठ, नारळ तेल आणि टूथपेस्ट यांचे मिश्रण खरोखर दात पांढरे शुभ्र करण्यास मदत करू शकते का?
तर क्राउन हब डेंटल येथील प्रोस्थोडोन्टिस्ट, बीडीएस, एमडीएस, डॉक्टर नियती अरोरा यांनी सांगितले की, बेकिंग सोडा हा घरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. यामुळे दात तात्पुरते पांढरे होतात. पण, यामुळे दातांवरचे एनॅमल (enamel) म्हणजेच दातांच्या बाहेरचा संरक्षक थर हळूहळू झिजून जातो. त्याचप्रमाणे मिठाचा पोत देखील खडबडीत असतो जो दातांच्या बाह्य पृष्ठभागाला स्वच्छ करण्यास मदत करतो. तसेच हिरड्यांवर जर तुम्ही तेलाने मालिश केलं तर सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात.
बेकिंग सोडा आणि मीठ नियमित वापरण्याचे धोके –
डॉक्टर अरोरा म्हणतात की, बेकिंग सोडा आणि मिठात दाणेदार कण असतात. हे कण दातांच्या बाहेरच्या पृष्ठभागाचे डाग घासून काढतात. त्यामुळे दात पांढरे दिसतात. पण, वारंवार वापरल्यास दातांचे रक्षण करणारे थर एनॅमल कमी होऊ शकते आणि दातांची झीज होऊ शकते. हा थर दातांना फक्त स्वच्छ ठेवत नाही, तर संवेदनशीलतेपासूनही (sensitivity) वाचवतो. पण, हा थर कमी झाला तर दात थेट गरम-थंड पदार्थ खाल्ल्यास दुखायला लागतात. इनॅमल हा दातांचा सर्वात पांढरा असणारा भाग आणि त्याखाली डेंटिन नावाचा पिवळसर थर असतो. जसजसे इनॅमल खराब होते तसतसे डेंटिनचा पिवळा रंग बाहेर येऊ लागतो; ज्यामुळे कालांतराने दात कायमचे पिवळे दिसू लागतात; असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
डॉक्टर अरोरा सुचवतात की, हायड्रोजन पेरोक्साइड असलेली उत्पादने तुमच्या दातांच्या पृष्ठभागावरील पिवळे, तपकिरी डाग ऑक्सिडायझ करून तुमचे दात पांढरे करतात. डेंटिस्टकडे तुम्ही गेल्यास दंतचिकित्सक दात पांढरे करण्यासाठी पेरोक्साइड प्रोडक्ट योग्य प्रमाणात वापरतात. कारण – हायड्रोजन पेरोक्साइडच्या प्रभावापासून तुमच्या जीभ आणि हिरड्यांचे संरक्षण होते. दात पांढरे करण्यासाठी बाजारात जेंटलर उत्पादने उपलब्ध असतात. पण, त्याचा परिणाम लगेच दिसत नाही. बेकिंग सोडाच्या बाबतीत वर चर्चा केल्याप्रमाणे त्यांच्या अनियंत्रित वापराचेही असेच दुष्परिणाम होऊ शकतात ; असा सल्ला निष्कर्ष डॉक्टर अरोरा यांनी दिला आहे.