Nitin Gadkari Sugar Spike, How To Control Blood Sugar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (३ जुलै) मंत्री परिषद (सीओएम) पार पडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आरोग्याच्या कारणाने बैठकीतून निघून यावं लागलं. गडकरींना मधुमेहाचा त्रास आहे. अचानक साखर वाढल्याने ते बैठकीतून बाहेर पडले अशी माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आपण आज अचानक वाढणाऱ्या शुगरवर नियंत्रणासाठी तज्ज्ञांचा सल्ला जाणून घेणार आहोत. डॉ सीमा गुलाटी, सेंटर फॉर न्यूट्रिशन रिसर्च, नॅशनल डायबिटीज, ओबेसिटी आणि कोलेस्ट्रॉल फाउंडेशन (NDOC) आणि डॉ अनूप मिश्रा, अध्यक्ष, फोर्टिस सीडीओसी हॉस्पिटल फॉर डायबिटीज अँड अलाईड सायन्सेस यांनी लिहिलेल्या एका अभ्यासात जेवणानंतर अचानक वाढणारी साखर नियंत्रणात कशी ठेवता येईल याविषयी मार्गदर्शन केले आहे. तसेच या उपायामुळे तुम्ही डायबिटीजचा त्रास रिव्हर्स करू शकता म्हणजेच हळूहळू पूर्णतः कमी करू शकता असेही सांगण्यात आले आहे.
जर तुम्ही दिवसाच्या तीन प्रमुख जेवणांच्या ३० मिनिटे आधी २० ग्रॅम बदामाचे सेवन करण्यास सुरुवात केली, तर दिवसभरातील ६० ग्रॅम बदाम हे तुमच्या पोस्ट-प्रांडियल रक्तातील ग्लुकोजच्या वाढीला २० टक्क्यांनी कमी करू शकतात. मोनो-अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड (MUFA), फायबर आणि प्रथिने यांच्यामुळे बदामाचे सेवन जेवणापूर्वी करणे फायदेशीर ठरू शकते.
जेवणापूर्वी बदामाच्या सेवनाचा त्वरित परिणाम अभ्यासणारा पहिला रिसर्च पेपर, युरोपियन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झाला आहे तर क्लिनिकल न्यूट्रिशन ESPEN मध्ये दीर्घकालीन परिणामाचे मूल्यांकन करण्यात आल्याचे, डॉ गुलाटी यांनी सांगितले आहे.
उपाशी राहिल्याने वाढणाऱ्या शुगरची चिंता करताना अनेकजण जेवणानंतर होणारी साखरेची वाढ दुर्लक्षित करतात. मुळात हा टाईप 2 मधुमेहाच्या सुरुवातीचा पहिला संकेत आहे. जेवणापूर्वी तुम्ही बदामाचे सेवन सुरु केल्यास टाइप 2 मधुमेह वाढण्याची शक्यताच कमी होऊ शकते. परिणामी मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत टाळता येऊ शकते.
अभ्यासाच्या वेळी बदामाच्या सेवनानंतर लगेचच पोस्ट-प्रांडियल स्तरावर झालेल्या परिणामांचे निरीक्षण करण्यात आले. यासाठी ओटीपोटावर ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम (CGMS) वापरून दिवसातून २८० वेळा रक्तातील ग्लुकोज मोजण्यात आले होते. दिवसभर प्रत्येक जेवणानंतर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे मोजमाप नोंदवून ठेवण्यात आले. दीर्घकालीन अभ्यासासाठी, संशोधकांनी तीन महिने रुग्णांचा मागोवा घेतला होता. यावेळी संबंधित व्यक्तींमध्ये HbA1c पातळी आणि पोस्ट-प्रांडियल ग्लुकोजसह लिपिड्समध्ये घट दिसून आली होती.
हे ही वाचा<< हळद, मेथी, लिंबू, लसूण.. पावसाळ्यात का खायला हवेत हे पदार्थ? तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
आहारात बदाम समाविष्ट केल्याने टाइप 2 मधुमेह असलेल्या भारतीयांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होऊन सामान्य आरोग्य सुधारू शकते. एक मूठभर किंवा २८ ग्रॅम बदाम किंवा अंदाजे २३ बदाम हे आरोग्याची पातळी राखण्यास फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये मीठ किंवा अन्य मसाले घालू नयेत.