What Happens When You Stop Eating Rice : अनेकांना जेवणात भात खाण्याची इतकी सवय असते की, एक दिवस ते भाताशिवाय राहिले, तर त्यांना जेवल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे भारतात अनेकांच्या आहारात भात हा एक मुख्य पदार्थ आहे. अगदी बासमतीपासून ते चमेलीपर्यंतच्या तांदळाच्या प्रकारांपासून बनवला जाणारा भात हा कार्बोहायड्रेट्सचा एक प्रमुख स्रोत आहे, जो शरीराला जलद ऊर्जा प्रदान करतो आणि त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. पण अनेकांचा असा समज आहे की, भात खाल्ल्याने पोट सुटते, वजन वाढते. त्यामुळे फिट राहण्याचा प्रयत्न करणारे लोक काही महिने भात खाणे पूर्णपणे बंद करण्याचा विचार करतात. पण, खरेच अशा प्रकारे एक महिना भात खाणे बंद केल्यास शरीरावर कोणते परिणाम दिसू शकतात, हे आपण आहारतज्ज्ञांकडून जाणून घेऊ…

जेव्हा तुम्ही महिनाभर भात खाणे बंद करता तेव्हा त्याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो हे सांगणे तसे कठीण आहे. कारण- भात तुमच्यासाठी चांगला आहे की वाईट हे तुमच्या शरीरावरच अवलंबून असते. म्हणून भाताऐवजी काय खाऊन तुम्ही शरीरास योग्य पोषण दिले पाहिजे याचा विचार करणे गरजेचे आहे.

महिनाभर भात न खाल्ल्यास काय परिणाम होतात?

न्यूट्रोडायनॅमिक्सच्या संस्थापक व आहारतज्ज्ञ अदिती प्रभू यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले, “आपण रोजच्या आहारात खात असलेला भात हा पॉलिश केलेला पांढरा भात असतो, ज्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते आणि पोषक घटक खूप कमी प्रमाणात असतात.

आहारतज्ज्ञ अदिती प्रभू पुढे सांगतात की, महिनाभर भात न खाण्याच्या चॅलेंजला तुम्ही सुरुवात करता तेव्हा सुरुवातीला शरीराच्या ऊर्जा पातळीवर परिणाम होऊ शकतो आणि त्यावेळी भूक वाढू शकते; परंतु त्याचा चयापचय क्रियेवर कोणताही परिणाम होत नाही. सुरुवातीच्या काही दिवसांत हे फरक जाणवू शकतात. पण- एकदा सवय झाल्यानंतर ऊर्जा पातळी आणि चयापचय क्रिया स्थित होते, पोट नीट भरल्यासारखे वाटते. पण, त्यासाठी आहारात भात नसला तरी त्याऐवजी कार्बोहायड्रेट्स, प्रथिने व आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ असणे गरजेचे आहे.

महिनाभर भात न खाल्ल्याने शरीरात पोषक घटकांची कमतरता जाणवते?

प्रभू सांगतात की, बहुतेक लोक पॉलिश केलेले पांढरे तांदूळ खातात, जे प्रामुख्याने साध्या कार्बोहायड्रेट्स, कमी फायबर व ब जीवनसत्त्वयांसारख्या काही पोषक घटकांचा स्रोत आहेत. म्हणून अशा प्रकारचा भात न खाल्ल्यास शरीरात कोणत्याही प्रकारची कमतरता निर्माण होत नाही.

जर कोणी पॉलिश न केलेले किंवा थोडे पॉलिश केलेले तांदूळ खात असेल, तर त्यांना त्यातून फायबर, लोह, मॅग्नेशियम असे अनेक आवश्यक पोषक घटक मिळतात. पण, व्हिटॅमिन बी आणि काही सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेकडे लक्ष देण्याची गरज असते. भाताऐवजी इतर कोणत्या धान्याचा आहारात समावेश करीत असालस तरी त्यातूनही या पोषक घटकांची कमतरता सहज भरून काढता येते, असेही प्रभू यांनी स्पष्ट केले.

भाताऐवजी कोणते पदार्थ खाणे शरीरासाठी फायदेशीर?

प्रभू सांगतात की, जर कोणी भात खाणे पूर्णपणे बंद करीत असेल, तर त्यांच्यासाठी कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, आरोग्यदायी चरबी आणि पोषक घटकांनी परिपूर्ण असे अनेक पर्याय आहेत. तुम्ही आहारात भाताऐवजी या पर्यायांचा वापर करू शकता.

भाताऐवजी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

१) नाचणी, बाजरी, कोडो, पोरसो इ.
२) क्विनोआ, बकव्हीट व राजगिरा
३) गहू, बार्ली, ओट्स
४) पिष्टमय भाज्यांमध्ये बटाटे, रताळे व कसावा यांचा समावेश करू शकता.