Kidney stone risk for workers: सध्या प्रत्येक घरातील किमान २ व्यक्ती तरी बाहेर कामानिमित्त असतात. शिवाय काही कंपन्यांमध्ये शिफ्ट ड्युटी असतात. जशी मॉर्निंग शिफ्ट असते, तशीच रात्रीची शिफ्टही. या दोन्ही अगदी उलट आहेत. मात्र, तुम्ही रात्रीची शिफ्ट करत असाल आणि तब्येतीची काळजी घेतली नाही तर मात्र तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. कारम रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना किडनी स्टोनचा म्हणजेच मूतखड्याचा धोका जास्त असतो. बुधवारी मेयो क्लिनिक प्रोसिंडिंग्ज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हे संशोधन संशोधकांनी मांडले आहे.

केवळ रात्रीची शिफ्टच नाही, तर इतरही शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना किडनी स्टोनचा धोका १५ ते २२ टक्के जास्त असतो. प्रामुख्याने जर ते तरूण असतील किंवा डेस्क जॉब करत असतील तर त्यांना ही समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये हा धोका सर्वाधिक म्हणजेच २२ टक्के होता असे या अभ्यासात आढळले आहे.

“या निष्कर्षांवरून असे दिसून येते की, शिफ्ट वर्क हे किडनी स्टोनच्या त्रासासाठी एक महत्त्वपूर्ण कारण आहे. ही समस्या रोखण्यासाठी निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याची गरजही या अभ्यासात अधोरेखित करण्यात आली आहे.

मित्रपिंडातील खडे हे कठीण पदार्थ असतात. ते मूत्रातील रसायनांमुळे अवयवाच्या आत तयार होतात. National Kidney Foundationच्या माहितीप्रमाणे, या खड्यांमुळे मूत्रपिंडाच्या आत आणि लघवी करताना शरीराबाहेर पडताना वेदना होऊ शकतात. वेदना तीव्र असल्यास रूग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे हे खडे काढावे लागतात. या अभ्यासात असेही आढळले की, जे लोक नेहमीच्या ९ ते ५च्या शिफ्टबाहेर कोणत्याही प्रकारच्या शिफ्टमध्ये काम करतात, त्यांना किडनी स्टोनचा धोका १५ टक्क्यांनी वाढतो. जे लोक कायम अशा शिफ्टमध्ये काम करतात, त्यांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम न करणाऱ्यांच्या तुलनेत १९ टक्क्यांनी हा धोका वाढतो.

मूतखड्याला कारणीभूत घटक

संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे, धूम्रपान, अपुरी झोप, शारीरिक हालचालींचा अभाव, हाय बॉडी मास इंडेक्स आणि कमी द्रवपदार्थांचे सेवन हे सर्व किडनी स्टोनच्या वाढीस कारणीभूत आहे. मात्र याला आणखी एक कारण म्हणजे सर्केडियन रिदम म्हणजेच बदलत्या शिफ्ट वर्कचा एखाद्या व्यक्तीच्या झोपेतून उठण्याच्या चक्रावर होणार परिणाम. त्यामुळे तुम्ही जरी रात्रीची शिफ्ट करत असाल तरी तुमची झोप पूर्ण होते की नाही याकडे लक्ष द्या. तसंच भरपूर पाणी प्या आणि निरोगी आहार घ्या.