Perfect Brush For Healthy Teeth: हिरड्या दुखतायत? हिरड्यांमधून रक्त येतंय? थंड किंवा गोड खाल्लं की दाटला झिणझिण्या येतात? तोंडाला दुर्गंधीचा त्रास वाढलाय? या सगळ्या किंवा अगदी एखाद्या प्रश्नाचं उत्तर हो असलं तरी यामागचं कारण आज आपण समजून घेणार आहोत. तज्ज्ञांच्या मते अनेकदा आपली दात घासण्याची पद्धतच दात व तोंडाच्या अन्य समस्यांचे कारण ठरू शकते तर काहीवेळा तुम्ही कोणत्या प्रकारचा टूथब्रश दातांसाठी वापरता हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे असते. युट्युबर राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये डॉ. संदेश मयेकर यांनी दात घासताना सामान्यतः होणाऱ्या चुकांविषयी सांगितले आहे. डॉ मयेकर हे दातांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या दंतचिकित्सा प्रकारचे भारतातील जनक म्हणून ओळखले जातात.

डॉ. मयेकर सांगतात की, योग्य ब्रश निवडणे आवश्यक आहे, तोंडाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी, दातांमधून अन्नाचे कण काढून टाकण्यासाठी ब्रशचे ब्रिस्टलस लहान असल्यास मदत होते. दातांमध्ये पोकळी होण्याचा त्रास टाळण्यासाठी प्रौढांनी लहान मुलांसाठी बनवलेले ब्रश वापरणे फायद्याचे ठरू शकते. याशिवाय टूथब्रशचे ब्रिस्टलस हे सरळ असायला हवेत कारण वाकडे तिकडे किंवा वाकलेले ब्रिस्टलस हे अन्नाचे कण दातांमधून काढू शकत नाहीत. त्यामुळे शक्यतो असे टूथब्रश वेळच्या वेळी फेकून देणे व दुसरे ब्रश वापरणे गरजेचे असते.

प्रौढांनी ‘बेबी टूथब्रश’ वापरण्याचे फायदे

डॉ. अंजना सत्यजित, दंतचिकित्सा विभागाच्या प्रमुख, आर्टेमिस हॉस्पिटल्स, गुरुग्राम यांनी इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना, डॉ. मयेकर यांच्या सूचनेला अनुमोदन देत खालील फायदे अधोरेखित केले आहेत.

डॉ.अंजना सांगतात की, लहान मुलांच्या टूथब्रशचे डोके सामान्यतः लहान असते, ज्यामुळे अक्कल दाढ व दाढेच्या अगदी पाठीमागचे दात यासारख्या भागात ब्रश पोहोचायला मदत होते. तसेच लहान मुलांच्या टूथब्रशचे ब्रिस्टलस मऊ असतात ज्यामुळे हिरड्यांना दुखापत होण्याचे प्रमाण कमी होते. मात्र हे ही लक्षात घ्यायला हवे की अनेकदा दातांवर प्लॅकचा जाड थर असल्यास हा ब्रश वापरताना थोडा जास्त वेळ लागू शकतो. आपल्याला दात आणखी बारकाईने स्वच्छ करावे लागू शकतात.

टूथब्रशचे ब्रिस्टल सरळच का असायला हवेत?

टूथब्रशमधील ब्रिस्टल्स सरळ असल्याने दात घासताना इंटरडेंटल स्पेसेस (दातांच्या मधील बारीक फट) आणि हिरड्यांच्या स्वच्छतेत मदत होऊ शकते. डॉ सत्यजित सुद्धा सांगतात की सरळ ब्रिस्टल्समुळे दातांमधून प्लॅक व अन्नाचे कण पटकन काढून टाकता येतात. यामुळे दात किडणे, हिरड्यांचे आजार आणि श्वासाची दुर्गंधी कमी होऊ शकते. सरळ ब्रिस्टल्स असल्यास ब्रश करताना समान दाब सर्व दातांवर पडतो. यामुळे हिरड्यांना दुखापत न करता स्वच्छता करता येते. वाकलेले ब्रिस्टल्स हे हिरड्या नीट स्वच्छ करू शकत नाहीत.

टूथब्रशच्या डोक्याचा आकार तोंडाच्या वेगवेगळ्या भागांना स्वच्छ करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो का?

टूथब्रशच्या डोक्याचा आकार त्याच्या तोंडाच्या वेगवेगळ्या भागांना स्वच्छ करण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम करतो. मागील दाढ आणि अक्कलदाढ स्वच्छ करण्यात तर याची मुख्य भूमिका असते. त्याशिवाय ज्यांच्या दातांची रचना सरळ नसते. दाढेत एकाला जोडून दुसरा लहान दात असतो त्यांच्यासाठी तर याचा खूप फायदा होऊ शकतो. मोठ्या डोक्याचे टूथब्रश या भागात पोहोचतच नाहीत.

याशिवाय दातांच्या स्वच्छतेसाठी खालील गोष्टी आपण करू शकता..

डेंटल फ्लॉसिंग: दातांच्या मधोमध आणि हिरड्याच्या रेषेतून, टूथब्रश प्रभावीपणे पोहोचू शकत नाही अशा भागांमधून प्लेक आणि अन्नाचे कण काढून टाकण्यासाठी दररोज फ्लॉसिंग करावे. यासाठी नीट फ्लॉस आणून मगच फ्लॉसिंग करावे, कपडे शिवण्याचा धाग्यांनी हिरड्यांना दुखापत होऊ शकते. दाब सुद्धा कमी असावा.

माउथवॉश वापरा: अँटीबॅक्टरीयल किंवा फ्लोराईड-आधारित माऊथवॉश वापरावे, ब्रश आणि फ्लॉसिंगनंतर बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी व सर्वात मुख्य म्हणजे तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी याची मदत होते.

हे ही वाचा<<तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?

तुमची जीभ स्वच्छ करा: स्क्रॅपरने किंवा टूथब्रशने तुमची जीभ स्वच्छ करायला विसरू नका ज्यामुळे श्वासात दुर्गंधी आणणारे बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत होते.

आपल्या आरोग्याची जशी आपण काळजी घेता तशीच दातांची काळजी घ्यावी. यासाठी दंतचिकित्सकांची सुद्धा मदत घ्यावी.