Papaya Benefits : आपल्या आहारात जास्तीत जास्त फळांचा समावेश करणे, आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. चवीला गोड असलेली पपई सर्वांना खायला आवडते. पपई फक्त स्वादिष्टच नाही तर आरोग्याासाठी तितकीच फायदेशीर आहे. यातील पोषक घटक आपल्या शरीराला अनेक फायदे देतात. पण, पपई उपाशी पोटी खावी का? द इंडियन एक्स्प्रेसनी मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ चैताली राणे यांच्या हवाल्याने याविषयी माहिती सांगितली आहे.

पपईचे फायदे

पपईचे असंख्य फायदे आहेत. यामध्ये पपेन नावाचे एन्झाइम असते, जे पचन क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. पपईमध्ये कॅरोटेनॉइड्स, अल्कालॉइड्स, मोनोटेरपेनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स असतात. याशिवाय पपई हा जीवनसत्त्वे आणि खनिजांचा खूप चांगला स्रोत आहे. पपईचे सेवन केल्याने रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत होते, याशिवाय हृदयाशी संबंधित आजार, स्ट्रोकचा धोका कमी होतो.

हेही वाचा : गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

उपाशी पोटी पपई खाण्याचे फायदे

उपाशी पोटी पपई खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. जाणून घ्या, आपल्या आरोग्यासाठी ते कसे फायदेशीर ठरू शकतात.

पचन क्रिया सुधारते

पपईमध्ये एन्झाइम पपेन असते, यामुळे जेवण्यापूर्वी पपई खाल्ल्यास आपली त्वचा चमकते. हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात. डिटॉक्सिफाय म्हणजे शरीरातून टाकाऊ पदार्थ काढणे होय. याशिवाय पपईतील पपेन पचन क्रिया सुधारते, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

ॲसिडिटीपासून आराम मिळतो

जर तुम्हाला वारंवार ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर पपई खाऊ शकता. पपईमुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. पपईच्या सेवनाने हायपर ॲसिडिटीसुद्धा कमी होऊ शकते.

वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते

पपईमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी आहे. वजन नियंत्रित ठेवण्यास पपई अधिक फायदेशीर ठरू शकते. उपाशी पोटी पपईचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. याशिवाय इन्सुलिनची मात्रासुद्धा सुधारते, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते.

अँटिऑक्सिडंट्स

पपईमध्ये कॅफीक ॲसिड, मायरिसेटिन आणि व्हिटॅमिन सी, ए आणि ई यांसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या घटकांबरोबर लढतात आणि आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.

पपईचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, पण गर्भवती महिलांनी याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन पपईचे सेवन करणे टाळावे, असे आहारतज्ज्ञ चैताली राणे सांगतात.
तुमच्या सकाळच्या आहारात पपईचा समावेश करा; विशेषत: उपाशी पोटी पपईचे सेवन करा, याचे तुम्हाला चांगले फायदे दिसून येतील. यापुढे तुम्ही जर नाश्त्यामध्ये पोषक आहार घेण्याचा विचार करत असाल तर पपई एक चांगला पर्याय आहे.