Benefits Of Eating Soaked Black Raisins : ड्रायफ्रुटसमधील ‘मनुका’ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीच्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या गोड पदार्थांमध्येदेखील आपण आवर्जून मनुका घालतो. दिसायला छोटा, पण शरीरासाठी भरपूर लाभदायक मनुक्याचे पाणीसुद्धा तितकेच फायदेशीर ठरते. दररोज सकाळी भिजवलेले काळ्या मनुकाचे पाणी प्यायल्याने तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात, कारण काळ्या मनुक्याचे पाणी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते; ज्यामुळे एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी हा एक बेस्ट पर्याय ठरू शकतो.

तर याबद्दल तज्ज्ञांची सहमती घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने नोएडातील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील आहारशास्त्रप्रमुख आहारतज्ज्ञ सुहानी सेठ अग्रवाल यांच्याशी चर्चा केली आणि मनुक्याचे पाणी आपल्यासाठी फायदेशीर का आहे याबद्दल जाणून घेतले.

काळ्या मनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे

१. पचन सुधारते – काळ्या मनुक्यात फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे तुम्हाला पचनास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतात. काळ्या मनुक्याचे भिजवलेले पाणी प्यायल्याने शरीरात फायबर चांगले शोषले जातात; ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि पचनसंस्थासुद्धा हेल्दी राहते.

२. ऊर्जा वाढण्यास मदत – मनुका साखर आणि कार्बोहायड्रेट्सचे नैसर्गिक स्रोत आहे; ज्यामुळे सकाळी शरीराला ऊर्जा देण्यास आणि तुमच्या चयापचयला सुरुवात करण्यास मदत करतात. याचबरोबर दिवसभर ऊर्जेची पातळी राखण्यास विशेषतः उपयुक्त ठरू शकतात.

३. लोह – भिजवलेल्या काळ्या मनुकाचे पाणी रक्त निरोगी ठेवण्यासाठी आणि अशक्तपणा येऊ न देण्यासाठी आवश्यक असलेल्या लोहाचे एक उत्तम स्रोत आहे. नियमितपणे या पाण्याचे सेवन केल्यास थकवा कमी होण्यास मदत होते; ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी असलेल्या व्यक्तींसाठी पाणी विशेषतः फायदेशीर ठरू शकते.

४. अँटिऑक्सिडंट्स – काळ्या मनुकामध्ये पॉलीफेनॉलसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण, जळजळ यांच्याशी लढण्यास मदत करतात. यामुळे एकूण आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो आणि वय वाढतानाही शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

५. त्वचेच्या आरोग्याला आधार – काळ्या मनुकामध्ये आढळणारी जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स निरोगी व चमकदार त्वचेला हातभार लावू शकतात. हे घटक शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि कोलेजन तयार होण्यास मदत करतात; ज्यामुळे त्वचा ताणते (Elastic), ओलावाही टिकून राहतो आणि त्वचा निरोगी दिसते.

६. शरीर विषमुक्त राहते – भिजवलेल्या काळ्या मनुकाच्या पाण्यात शरीर विषमुक्त करण्याचे गुणधर्म असतात असे मानले जाते, यामुळे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास, मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यास आणि यकृत स्वच्छ करण्यास मदत होते; ज्यामुळे एकूण आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत भिजवलेल्या काळ्या मनुक्याच्या पाण्याचा समावेश करणे म्हणजे तुमच्या आरोग्याला दीर्घकाळासाठी मजबूत करण्याचा एक सोपा मार्ग आहे. सगळ्यात बेस्ट म्हणजे रात्रभर ८ ते १० काळे मनुके एक ग्लास पाण्यात भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा.