‘फळांचा राजा’ आंबा हे उन्हाळ्यातील सर्वांच्या आवडीचे फळ. उन्हाळा सुरू झाल्यापासून ते पावसाळ्यापर्यंत अनेक प्रकारचे आंबे बाजारात उपलब्ध असतात. मार्च महिना सुरू झाल्यापासून लोक रसाळ, मधाळ अशा आंब्यांची वाट पाहत असतात. पण, चवीपलीकडे आंब्यांमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण, अनेकांना उन्हाळ्यात सकाळ, संध्याकाळ आंबा खाण्याची इच्छा होते. अशा स्थितीत जर रोज नाश्त्यामध्ये आंब्याचा समावेश केला तर त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो, याचा कधी विचार केला आहे का? याच प्रश्नावर हैदराबादचे यशोदा रुग्णालयाचे सल्लागार जनरल फिजिशियन डॉ. करण उद्देश तनुगुला यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

उन्हाळ्यात आंब्याचे सेवन करण्यापूर्वी त्याच्या संभाव्य फायदे आणि तोट्यांबद्दल जाणून घेऊ…

१) पोषक तत्वांचा खजिना

आंब्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक आहे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासह त्वचा निरोगी राहते. याशिवाय ते शरीरात कोलेजनचे प्रमाण वाढवण्याचे काम करते.

डॉ. तनुगुला यांच्या मते, आंबा व्हिटॅमिन ‘अ’नेदेखील समृद्ध असतात, ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते, त्वचा निरोगी राहते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. याव्यतिरिक्त आंब्यात फोलेट (व्हिटॅमिन बी9) असते, जे पेशींच्या वाढीसाठी आणि विशेषतः गर्भधारणेदरम्यान महत्त्वपूर्ण असते.

२) पोटॅशियमचे पावरहाऊस

आंबा हा पोटॅशियमचा मुख्य स्त्रोत मानला जातो, ज्यामुळे शरीरातील द्रवाचे संतुलन, मज्जातंतूचे कार्य आणि स्नायू आकुंचन नियंत्रित करण्यास मदत करते. यावर डॉ. तनुगुला म्हणाले की, त्यात मँगिफेरिनसारखे पॉलीफेनॉलमुळे मजबूत अँटिऑक्सिडंट गुणधर्मदेखील आहेत, जे तुमच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.

३) आतड्यांसाठी फायदेशीर

आंबा आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत आहे, यावर डॉ. तनुगुला म्हणाले की, आंब्याच्या सेवनामुळे पचनास मदत होऊ शकते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच हृदयरोग आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो.

आंब्याचे दिवसातून किती वेळा सेवन करु शकतो?

आंबा पौष्टिक घटकांचा एक मुख्य स्त्रोत मानला जातो. पण, त्यातील साखरेचे प्रमाण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. प्रति १०० ग्रॅम आंब्यात अंदाजे १४ ग्रॅम नैसर्गिक साखर असते. यावर डॉ. तनुगुला म्हणाले की, आंब्यात इतर फळांच्या तुलनेत साखर जास्त असू शकते, यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचे मर्यादित सेवन केले पाहिजे.

१०० ग्रॅम आंब्यात सर्व्हिंग कॅलरीज तुलनेने कमी असतात (सुमारे 60). यामुळे त्याचा संतुलित आहारात समावेश करू शकता. यात दाहकविरोधी, कर्करोगविरोधी आणि हृदय संरक्षणात्मक प्रभावांसह विविध फायदेशीर फायटोकेमिकल्सदेखील असतात.

आंब्याचा आस्वाद घेण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या

आंबा खाण्याच्या सर्वोत्तम वेळेबाबत वेगवेगळी मतं आहेत. परंतु, ते नाश्त्यामध्ये खाणे फायदेशीर ठरू शकते; कारण यामुळे आपण त्यातील अतिरिक्त साखर जाळून टाकू शकतो, असे डॉ. तनुगुला यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमच्या रोजच्या आहारात आंब्याचा समावेश करणे, विशेषत: नाश्त्यामध्ये आंबा खाल्ल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरते. यावर डॉ. तनुगुला यांनी सल्ला दिला की, आंब्याचे मर्यादेत सेवन करणे आवश्यक आहे, विशेषतः ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी आंब्याचे प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. पण, या फळाचा आनंद घेताना त्याचे फायदे तोटे जाणून घ्या.