मुंबई : भारतातील ५ ते ९ वयोगटातील एक तृतीयांशहून अधिक मुलांमध्ये ‘ट्रायग्लिसराईड्स’ या रक्तातील चरबीचे प्रमाण जास्त असल्याचा धक्कादायक माहिती उघड झाली आहे. केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘चिल्ड्रेन इन इंडिया २०२५’ या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

याबाबत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार पश्चिम बंगालमधील ६७ टक्क्यांहून अधिक मुले, सिक्कीममधील ६४ टक्के, आसाममधील ५७ टक्के, नागालँडमधील ५५ टक्के आणि जम्मू-काश्मीरमधील ५० टक्के मुले उच्च ट्रायग्लिसराईड्स पातळीने ग्रस्त आहेत. केरळ १६.६ टक्के आणि महाराष्ट्र १९.१ टक्के ही राज्ये सर्वात कमी प्रमाण असलेल्या राज्यांमध्ये आहेत. याबाबतची सखोल कारणमिमांसाही या अहवालात करण्यात आली असून उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत.

ट्रायग्लिसराइड हा चरबीचा (फॅटचा) एक प्रकार आहे जो आपल्या शरीरात आणि रक्तामध्ये आढळतो. सोप्या भाषेत समजावयाचे झाल्यास ट्रायग्लिसराइड्स हे ग्लिसरॉल अधिक तीन फॅटी अॅसिड्स यांच्या संयोगाने तयार झालेले रेणू असतात. म्हणून त्यांना ‘ट्राय’ (तीन) अधिक ग्लिसराइड असे नाव आहे.आपले शरीर जेव्हा अतिरिक्त कॅलरीज (विशेषत: कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स) घेते, त्या उर्जेला ते ट्रायग्लिसराइड्सच्या स्वरूपात चरबीच्या पेशींमध्ये साठवते. शरीराला उर्जा हवी असते तेव्हा ही साठवलेली चरबी फॅटी अॅसिड्समध्ये तुटते आणि उर्जेसाठी वापरली जाते.

रक्तातील ट्रायग्लिसराइड्सचे महत्त्व ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण जास्त असेल तर हृदयरोग, स्ट्रोक, टाईप-२ मधुमेह यांचा धोका वाढतो. सामान्यत: उपाशीपोटी लिपिड प्रोफाईल चाचणी करून ट्रायग्लिसराइड्स मोजले जातात. संतुलित व कमी तेलकट/तळलेले आहार,साखर व रिफाइंड कार्बोहायड्रेट कमी करणे,नियमित व्यायाम व वजन नियंत्रणामुळे ट्रायल्गिसराईड नियंत्रणात ठेवता येतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या अहवालात नवजात बालकांच्या मृत्यूंची कारोही नमूद केली आहेत.अकाली जन्म व जन्मावेळी कमी वजन हे नवजात बालकांच्या पहिल्या २९ दिवसांतील मृत्यूचे सर्वात प्रमुख कारण असल्याचे अहवालात नमूद केले आहे. या कारणाचा राष्ट्रीय प्रसार ४८ टक्के असून, जन्मावेळी ऑक्सिजन न मिळणे (बर्थ अॅस्फिक्सिया) व प्रसूतीदरम्यान झालेली दुखापत १६ टक्के आणि न्यूमोनियामुळे ९ टक्के बाळांचा मृत्यू होतो. याशिवाय किशोरवयीन मुलांमध्ये उच्च रक्तदाब दिसून येत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार देशातील सुमारे ५ टक्के किशोरवयीन मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचा (हायपरटेन्शन) त्रास आहे. दिल्ली १० टक्के हा सर्वाधिक प्रसार असलेला प्रदेश असून, उत्तर प्रदेश ८.६ टक्के, मणिपूर ८.३ टक्के व छत्तीसगड ७ टक्के या राज्यांचा त्यानंतर क्रम लागतो. भारतातील १६ टक्क्यांहून अधिक किशोरवयीन मुलांमध्येही उच्च ट्रायग्लिसराईड्सचे प्रमाण असल्याचा अंदाज आहे.

शिक्षणातील स्थितीबाबात ‘चिल्ड्रेन इन इंडिया २०२५’ अहवालानुसार देशातील ६३.१ टक्के मुले व किशोरवयीन साक्षर आहेत, तर सात वर्षे व त्यापुढील वयोगटातील ७३.१ टक्के साक्षरता दर आहे. ७-९ वयोगटातील ८० टक्क्यांहून अधिक मुले, १०-१४ वयोगटातील ९२ टक्के आणि १५-१९ वयोगटातील ९१ टक्के मुले साक्षर आहेत. मुलींच्या बाबतीत ७-९ वयोगटात ८१.२ टक्के तर, १०-१४ वयोगटात ९० टक्के आणि १५-१९ वयोगटात ८६.२ टक्के मुली साक्षर आहेत.२५ सप्टेंबर रोजी चंदीगड येथे झालेल्या केंद्रीय व राज्य सांख्यिकी संघटनांच्या २९व्या ‘कोकस्सो’ परिषदेच्या वेळी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. मंत्रालयाने हा अहवाल देशातील मुलांच्या कल्याणाचे सर्वसमावेशक व सविस्तर विश्लेषण करतो असे नमूद केले.