आजकाल आपण अनेकदा अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या ऐकतो. मात्र ह्रदय कधीच अचानक बिघडत नाही. हॉर्ट अटॅक येण्याआधी आपलं शरीर आपल्याला काही इशारे देत असतं. नेमकी ही अडचण ही आहे की, आपण अनेकदा हे इशारे ओळखण्यात अपयशी ठरतो. तसंच या लक्षणांना आपण कामामुळे आलेला थकवा, गॅस, अपचन आणि ताण आहे असं समजतो. त्यामुळे गंभीर धोका उद्भवतो. ह्रदयरोग हा केवळ वृद्धांसाठीच गंभीर धोका नाही, तर तरूणांसाठीही वाढत जाणारा धोका आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, दरवर्षी जगभरात १.७९ कोटी लोकांचा ह्रदयरोगाने मृत्यू होतो. अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, दर पाचपैकी चार मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्यांमुळे होतात. ह्रदयविकाराचा झटका अचानक आणि अचानक येऊ शकतो. मात्र, शरीर अनेकदा ते होण्यापूर्वी काही इशारे देते. हे वेळीच ओळखल्याने जीव वाचू शकतो.

छातीत अस्वस्थता किंवा दाब

ह्रदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य आणि ओळखता येणारे लक्षण म्हणजे छातीत दाब, जळजळ किंवा घट्टपणा जाणवणे. काही लोकांना छातीवर दगड ठेवल्याप्रमाणे वाटते, तर काहींना सुई टोचल्यासारखे वाटते. या वेदना काही सेकंदांपर्यंत टिकू शकतात आणि नंतर वाढतात. लोक अनेकदा या त्रासाला गॅस किंवा अपचन आहे असं समजतात. मात्र याकडे दुर्लक्ष करू नये. कारण ते ह्रदयविकाराचे पहिले लक्षण असू शकते.

श्वसनाचा त्रास

जर तुम्हाला थोडे चालल्यानंतर, पायऱ्या चढल्यानंतर किंवा अगदी बसल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ते तुमचे ह्रदय योग्यरित्या पंपिंग करत नसल्याचे लक्षण असू शकते. याचा अर्थ तुमच्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नाही आणि तुम्हाला अचानक अशक्तपणा, चक्कर येणे किंवा घाम येणे जाणवू शकते. ही एक सामान्य समस्या आहे, जी प्रामुख्याने महिलांमध्ये दिसते. मात्र, ही एक गंभीर इशारादेखील असू शकते.

पचनाच्या तक्रारी आणि उलट्या

पचन आणि ह्रदयरोग यांच्यातील संबंधांबाबत बरेच लोक गोंधळलेले असतात. मात्र, महिलांमध्ये ह्रदयरोगाची लक्षणे नेहमीच पारंपरिक पद्धतीने ओळखली जात नाहीत. आपण अनेकदा उलट्या, ढेकर येणे, पोट फुगणे किंवा छातीत जळजळ होणे या समस्या गॅस आहे म्हणून दुर्लक्ष करतो. प्रत्यक्षात ही ह्रदयरोगाची सौम्य पण गंभीर लक्षणं आहेत.

शरीराच्या इतर भागात वेदना किंवा सुन्नपणा

ह्रदयाचे दुखणे फक्त छातीपुरते मर्यादित नसते. ते बऱ्याचदा डाव्या खांद्यावर, हातावर, पाठीवर, मानेत किंवा जबड्यात पसरते. कधीकधी ते हातात सुन्नपणा किंवा मुंग्या येणे असेदेखील जाणवू शकते. यालाच रेफरल वेदना म्हणतात. म्हणजेच मूळ समस्या ह्रदयात असते, मात्र वेदना इतरत्र जाणवते. लोक अनेकदा याकडे दुर्लक्ष करतात आणि अधिक धोकादायक ठरते.