Neena Guptas All Season Tomato Chutney Recipe : जेवणाची चव वाढवण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारच्या चटण्या, ठेचा बनवतात. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण असो; चटणी, ठेचा आवर्जून ताटात असते. सर्वच घरांमध्ये विविध चटण्या तयार करून ठेवतात. तर अभिनेत्री नीना गुप्ता यांनी अलीकडेच स्वादिष्ट, बनवण्यास सोपी टोमॅटो चटणीची रेसिपी शेअर केली आहे; जी वर्षभर साठवून ठेवा येईल. पण, ही चटणी वर्षभर खाणे चांगले आहे का याचबद्दल जाणून घेण्यासाठी बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…
साहित्य
- २ ताजे टोमॅटो, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, १ ते २ चमचा तेल, १ चमचा किसलेले आले, ३ ते ४ लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
कृती
- टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या नीट धुवून घ्या आणि मऊ होईपर्यंत एकत्र उकळवून घ्या.
- नंतर थोडं थंड झालं की, मग मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करून घ्या.
- मध्यम आचेवर कढईत तेल गरम करा.
- किसलेले आले आणि बारीक चिरलेला लसूण घाला आणि सोनेरी रंग व सुगंधी होईपर्यंत परतून घ्या.
- टोमॅटो-मिरची पेस्ट त्यात घाला आणि चांगले मिक्स करून घ्या.
- मीठ आणि चिरलेली कोथिंबीर त्यात घाला. मिश्रण घट्ट होईपर्यंत अधूनमधून ढवळत राहा.
- गॅस बंद करा आणि थोडे थंड होऊ द्या.
टोमॅटोची चटणी तुमच्या शरीरासाठी योग्य आहे का?
याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने क्लिनिकल आहारतज्ज्ञ खुश्मा शाह यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मते, ही चटणी वर्षभर वापरली जाऊ शकते यात शंका नाही. पण, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये त्यात थोडेफार बदल करावे लागतात. चटणीमध्ये कॅलरीज कमी असतात, पण त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. पण, उन्हाळ्यात जर तुम्हाला आम्लता किंवा उष्णतेची संवेदनशीलता असेल तर चटणी बनवताना मिरचीचे प्रमाण मर्यादित करा.
पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात ही चटणी विशेषतः फायदेशीर ठरू शकते: आले, लसूण आणि मिरच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करू शकतात. तसेच अतिरिक्त सोडियम (मीठ) किंवा मसाल्यांचा (मिरची) शरीरात जाणार नाही; यासाठी जेवताना फक्त १ ते २ चमचे खाल्ले पाहिजेत.
तुम्ही ही चटणी रोज खाऊ शकता का?
याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकते. पण, ज्यांना टोमॅटोची चटणीचा त्यांच्या रोजच्या जेवणात समावेश करायचा असेल तर पुढील स्टेप्स त्यांनी फॉलो केल्या पाहिजेत…
- रोज टोमॅटो चटणी खायची असेल तर त्यात थोडेसे मीठ घाला आणि प्रमाणात सेवन करा.
- काही लोकांना दररोज टोमॅटो आणि मिरच्या खाल्ल्यानंतर, विशेषतः रिकाम्या पोटी, आम्लपित्त (ॲसिडिटी) होऊ शकते. त्यासाठी चिमूटभर भाजलेले जिरे पावडर त्यात घाला.
- तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार मिरचीचे प्रमाण कमी-जास्त करा.
- चटणी बनवताना फक्त १-२ चमचे तेल वापरा.
- आंबट टोमॅटोऐवजी पिकलेले गोड टोमॅटो वापरा.
- चटणी फ्रिजमध्ये ठेवा आणि ती ३ ते ४ दिवसांच्या आतमध्ये संपवून टाका; म्हणजे ती ताजी आणि चवदार राहील.
