Vidyut Jammwal : “दररोज पाच मिनिटे श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करणे हे १० किलोमीटर धावण्याइतके फायदेशीर” अभिनेता विद्युत जामवालचा दावा; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतातबॉलीवूड अभिनेते व अभिनेत्री त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतात. उत्तम फिटनेसमुळे ते चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. चाहत्यांना आपला आवडता अभिनेता किंवा अभिनेत्रीविषयी आणि त्यांच्या फिटनेसविषयी जाणून घ्यायला आवडते. अलीकडेच मार्शल आर्टिस्ट व अभिनेता विद्युत जामवाल यांनी नुकताच श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. “दररोज पाच मिनिटे श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करणे म्हणजे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित स्ट्रेंथ वाढण्यासाठी १० किलोमीटर धावणे होय.”

हे खरंय का?

दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पटपरगंज येथील मॅक्स हॉस्पिटल हृदय शस्त्रक्रियेचे वरिष्ठ संचालक डॉ. वैभव मिश्रा सांगतात, “दररोज पाच मिनिटे श्वास घेणे म्हणजे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित स्ट्रेंथ वाढवण्यासाठी दररोज १० किलोमीटर धावणे, हे पूर्णपणे योग्य आणि तितके सोपे नाही. श्वासोच्छ्वासाचा व्यायाम आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी धावण्यासारख्या अॅरोबिक व्यायामाची जागा ते घेऊ शकत नाही.”

श्वासोच्छ्वासाचा व्यायाम, जसे की डायाफ्रामॅटिक श्वास घेणे (डायाफ्रामॅटिक श्वास हा श्वासोच्छ्वासाच्या व्यायामाचा एक प्रकार आहे, जो तुम्हाला तुमचा डायाफ्राम मजबूत करण्यास मदत करतो) आणि प्राणायाम हे फुफ्फुसाची क्षमता आणि ऑक्सिजनची पातळीसुद्धा सुधारतात. यामुळे तणावसुद्धा कमी होतो आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. “म्हणून, हृदयावरील ताण कमी करणे आणि ऑक्सिजनची कार्यक्षमता सुधारणे याचा अप्रत्यक्षपणे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्यास फायदा होऊ शकतो. ज्यांना निरोगी राहायचे आहे, पण उच्च-तीव्रतेचे व्यायाम करू शकत नाही, त्यांच्यासाठी ही एक चांगली सुरुवात असू शकते”, असे डॉ. मिश्रा सांगतात.

डॉ. मिश्रा पुढे सांगतात, दररोज १० किमी धावणे हा एक व्यायामाचा प्रकार आहे, ज्यासाठी शारीरिक मेहनत घेणे आवश्यक आहे. यामुळे हृदयाचे आरोग्य सुदृढ राहते तसेच अॅरोबिक क्षमता वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि जास्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते. तसेच व्यक्तीचा स्टॅमिना वाढतो, स्नायूंचे आरोग्य सुधारते व शरीर तंदुरुस्त होते. धावणे हृदयाच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देते, पण फक्त श्वासोच्छ्वासाच्या व्यायामामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्यास फायदा होणार नाही”, असे डॉ. मिश्रा सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे तुम्ही असा दावा करू शकता की, दररोज पाच मिनिटे श्वास घेणे हृदयाला निरोगी ठेवण्यास आणि तणाव दूर करण्यास मदत करू शकते, पण हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्याच्या दृष्टीने ते पुरेसे नाही. हृदयाची कार्यक्षमता उत्तम ठेवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे नियमित अॅरोबिक आणि श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करणे.