vitamin B12 deficiency raising heart attack risk?: हृदयाच्या समस्येशी संबंधित कोणताही रूग्ण जेव्हा रक्दाब किंवा चरबीचे थर याबाबत डॉक्टरांशी बोलतात, तेव्हा त्यांचा आहार, ताणतणाव, व्यायामाचा अभाव आणि झोपेची कमतरता हे घटक कारणीभूत मानतात. ही कारणं तर आहेतच, मात्र याबाबत आता आणखी एक गोष्ट उघड झाली आहे. काही पोषकतत्वांच्या त्यातही प्रामुख्याने बी १२च्या कमतरतेमुळे कालांतराने रक्दाब आणि हृदयविकाराचा धोका वाढत जातो.
आंतरराष्ट्रीय अकॅडमिक मेडिसीन अँड फार्मसी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जेव्हा व्हिटॅमिन बी १२चे प्रमाण घटते, तेव्हा रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे कालांतराने हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. जगभरात कोट्यवधि लोकांमध्ये बी १२ची कमतरता आढळते. त्यामुळे हा संबंध हायपरटेन्शनच्या (उच्च रक्तदाबाच्या) प्रतिबंध आणि उपचारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
व्हिटॅमिन बी १२ का महत्त्वाचे आहे?
व्हिटॅमिन बी १२ लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी, मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आणि डीएनए निर्मितीसाठी आवश्यक असते. शिवाय ते होमोसिस्टीन नावाच्या अमिनो आम्लाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करते. जेव्हा होमोसिस्टीनचे प्रमाण वाढते, तेव्हा ते उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि हार्ट अटॅक याला कारणीभूत ठरते.
व्हिटॅमिन बी १२ कमतरता आणि ह्रदयाचे आरोग्य
जेव्हा शरीरात बी १२चे प्रमाण कमी असते, तेव्हा शरीर होमोसिस्टीनला उपयुक्त संयुगांमध्ये बदलू शकत नाही. उच्च होमोसिस्टीन रक्तवाहिन्यांसाठी विषारी ठरते. होमोसिस्टीनमुळे रक्तवाहिन्या कठीण आणि कमी लवचिक बनतात. परिणामी सूज येते आणि धमन्यांच्या आतील आवरणाचे नुकसान होते. त्यामुळे अॅथेरोस्क्लेरोसिसची (धमन्यांमध्ये प्लाक साठणे)प्रक्रिया वेगाने वाढते.
उच्च होमोसिस्टीनमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ब्लॉकेज होऊन हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होऊ शकतो. व्हिटॅमिन बी १२, फॉलिक अॅसिड (फोलेट) आणि व्हिटॅमिन बी ६ हे तिघे मिळून होमोसिस्टीनचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात. यापैकी कोणत्याही एकाची कमतरता असली तरी जोखीम वाढते आणि रक्तवाहिन्यांवर ताण येतो, परिणामी रक्तदाब वाढतो.
अनेक प्रकरणांमध्ये बी १२ची कमतरता मज्जासंस्थेवर परिणाम करते. ज्यात हृदयगती आणि रक्तवाहिन्यांचा ताण नियंत्रित करणाऱ्या नसादेखील येतात. या असंतुलनामुळे रक्तदाबात चढ-उतार होऊ शकतात किंवा गंभीर परिस्थितीत उच्च रक्तदाब निर्माण होऊ शकतो. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मेगालोब्लास्टिक अॅनिमिया नावाचा आजार होतो. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. परिणामी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते आणि रक्तदाब वाढू शकतो.
आकडेवारी काय सांगते?
सामान्य व्हिटॅमिन बी १२ पातळी २०० ते ९०० पिकोग्रॅम प्रति मिलीलीटर दरम्यान असते. २००पेक्षा कमी पातळी म्हणजे कमतरता, तर २००-३०० रम्यानची पातळी सीमारेषेवर मानली जाते. बी १२ प्रामुख्याने प्राणिजन्य पदार्थांमध्ये आढळते म्हणजेच अडी, दूध, मासे, कोंबडी आणि मांस. शाकाहारी आणि व्हेगन लोकांनी फओर्टिफआइड अन्नपदार्थ घ्यावेत. ज्यांना पचनसंस्थेचे आजार किंवा वृद्ध लोक अशांना डॉक्टर गोळ्या किंवा इंजेक्शन स्वरूपात बी १२ देतात.
बी १२ची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित तपासणी आवश्यक आहे.एक साधी रक्त तपासणी बी २ आणि होमोसिस्टीन पातळी दर्शवते. त्यामुळे धोका लवकर ओळखता येतो. बी १२कमतरता अनेकदा दुर्लक्षित केली जाते. पण योग्य आहार, पूरक आणि नियमित तपासणीद्वारे ही पातळी संतुलित राखता येणे हे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी सोपे आणि प्रभावी पाऊल ठरू शकते.
( वरील सर्व माहिती डॉ. सुरंजित चॅटर्जी, सीनियर कन्सल्टंट, इंटरनल मेडिसिन, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्ली यांनी दिलेली आहे.)