कोणत्या ना कोणत्या व्हिटॅमिनची कमतरता असलेले बरेच जण असतात. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे ते एक ना अनेक समस्यांशी झुंजत असतात. बहुतेक लोकांना तर हे माहीतच नसते की त्यांना कोणत्या व्हिटॅमिनची कमतरता आहे आणि त्यामुळे नेमके कोणते आजार उद्भवतात. या लेखात अशाच एका व्हिटॅमिनबाबत सांगणार आहोत ज्याच्या कमतरतेमुळे भारतातील प्रत्येक दुसरी व्यक्ती त्रस्त आहे. प्रामुख्याने शाकाहारी लोकांमध्ये या समस्या जास्त प्रमाणात आढळून आल्या आहेत.
व्हिटॅमिन बी १२
मांस , मासे, अंडी आणि डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजेच दूध, दही आणि पनीरमध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमिन बी १२ची कमतरता भारतातल्या अनेक लोकांमध्ये आहे. जे लोक मांसाहारी पदार्थ खात नाहीत, त्यांच्या शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता जास्त प्रमाणात आढळते. अनेक रिसर्चमध्ये असे आढळले आहे की, भारतातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे त्रस्त आहे. याचं मोठं कारण आहे ते आहार. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि पोटासंबंधी तक्रारी अॅसिडिटी, गॅस्ट्राइटिस किंवा आतड्यांमध्ये इन्फेक्शन. अशा लोकांच्या शरीरात हळूहळू याचा स्तर कमी होत जातो.
अॅनिमिया
डॉक्टरांनुसार, व्हिटॅमिन बी १२ शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्याचं काम करतात. या व्हिटॅमिनची कमतरता झाल्यास रक्ताची कमतरताही जाणवते आणि परिणामी अॅनिमियाची समस्या उद्भवतो. अनेक लोकांमध्ये या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे थकवा, झोप न लागणे आणि कमकुवतपणा अशा अनेक समस्या उद्भवतात. जर लोकांमध्ये दीर्घकाळापासून या व्हिटॅमिनची कमतरता असेल तर विसरण्याची समस्या किंवा नर्व्हस सिस्टिमसंदर्भातील समस्याही उद्भवतात.
ब्लड क्लॉट
व्हिटॅमिन बी १२चा हृदयाशीदेखील खोलवर संबंध आहे. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी१२ ची पातळी घसरते, तेव्हा होमोसिस्टीन नावाचं अमिनो अॅसिड तोडता येत नाही, त्यामुळे रक्त घट्ट होते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे ह्रदयात अडथळा किंवा ह्रदयविकाराचा धोका वाढतो. बी १२ची कमतरता उच्च रक्तदाबात देखील योगदान देऊ शकते असे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे.
मज्जासंस्था (Nervous system)
व्हिटॅमिन बी १२ हे मज्जासंस्था राखण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. त्याच्या कमतरतेमुळे मुंग्या येणे, हातपाय सुन्न होणे आणि स्नायू कमकुवत होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ही कमतरता महिलांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी खूप धोकादायक ठरू शकते. गर्भवती महिलांमध्ये व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे बाळाच्या जन्माच्या वेळी मेंदूशी संबंधित विकार होऊ शकतात. मुलांमध्ये, त्याचा त्यांच्या मेंदूच्या विकासावर आणि शिक्षणावर परिणाम होतो.
डॉक्टरांचा सल्ला
जर तुम्हाला वारंवार थकवा, अशक्तपणा किंवा एकाग्रतेचा अभाव जाणवत असेल तर ते हलके घेऊ नका. हे व्हिटॅमिन बी१२च्या कमतरतेचे लक्षण असू शकते. तुमच्या आहारात दूध, दही, चीज, अंडी, मासे आणि फोर्टिफाइड तृणधान्ये यासारखे पदार्थ समाविष्ट करा. गरज पडल्यास तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक आहारदेखील घेता येतो.
