रक्तातील साखरेची पातळी तपासताना लोक अनेकदा काही चुका वारंवार करतात, ज्यामुळे चुकीची माहिती मिळू शकते आणि मधुमेह नियंत्रण करण्यात अडथळा येऊ शकतो. “रक्तातील साखरेच्या पातळीचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे,” असे परळ, मुंबई येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिनच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

चुकीच्या वेळी चाचणी(Testing at the wrong Time):जेवणानंतर लगेच चाचणी केल्यास रक्तातील साखरेची पातळी जास्त असू शकते. अचूक निकालांसाठी जेवणानंतर दोन तासांनी चाचणी करणे चांगले आहे. “नियमित दिनचर्या न पाळता जेवणानंतर लगेच चाचणी केल्याने गोंधळात टाकणारे आणि अनुचित परिणामदेखील निर्माण होऊ शकतात,” असे डॉ. अग्रवाल सांगतात.

बोटाच्या टोकाला टोचणे(Pricking the fingertip): बोटाच्या टोकाला जास्त मज्जातंतू असतात, ज्यामुळे ते वेदनादायक ठरते. त्याऐवजी कमी अस्वस्थतेसाठी बोटांच्या बाजूंना टोचून घ्या.

लॅन्सेट न बदलणे (Not changing lancets): लॅन्सेटचा पुनर्वापर केल्याने वेदना आणि संसर्ग होऊ शकतो. चाचणी सुरळीत होण्यासाठी लॅन्सेट नियमितपणे बदला.

एक्सपायर्ड किंवा योग्य पद्धतीने न ठेवलेले स्ट्रिप्स वापरणे : एक्सपायर्ड किंवा योग्य पद्धतीने न ठेवलेले स्ट्रिप्स वापरल्यास रक्तचाचणीचा परिणाम चुकीचा येऊ शकतो, त्यामुळे नेहमी स्ट्रिपची एक्सपायरी डेट तपासा आणि स्ट्रिप योग्य पद्धतीने ठेवा. जुन्या किंवा खराब झालेल्या स्ट्रिप चाचणीसाठी वापरणे ही आणखी एक समस्या आहे, कारण बाद झालेल्या स्ट्रिप्स चुकीचा परिणाम दर्शवू शकतात. काही लोक स्ट्रिप नीट ठेवत नाहीत, उष्णता आणि ओलव्याच्या संपर्कात स्ट्रिप येतात, ज्यामुळे त्या चुकीचा परिणाम दर्शवू शकतात, असे डॉ. अग्रवाल सांगतात.

हात न धुणे (Not washing hands) : चाचणीपूर्वी हात न धुतल्यास ते दूषित होऊ शकते. चाचणीपूर्वी साबण आणि पाण्याने हात धुवा, असे दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन विभागाचे प्रमुख सल्लागार डॉ. नरंदर सिंगला सांगतात.

मद्ययुक्त सॅनिटायझर्स बोट साफ करण्यासाठी वापरणे : मद्ययुक्त सॅनिटायझर्स वापरल्यास त्वचा कोरडी पडते त्यामुळे साबण किंवा पाणी वापरून बोट स्वच्छ करा, असे डॉ. सिंगला सांगतात.

नियमित तपासणी न करणे : रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासणी न करणे मधुमेह नियंत्रण करण्यात अडथळा आणू शकते, त्यामुळे नियमित तपासणी करा, असे डॉ. सिंगला सांगतात.

ग्लुकोज मीटर कसा काम करतो माहित नसणे (Not understanding the glucose meter): डॉ. सिंगला यांच्या मते, जर ग्लुकोज मीटर कसे वापरावे माहीत नसेल तर चाचणी करताना चुका होऊ शकतात. त्यासाठी ग्लुकोज मीटरबरोबर दिलेले मॅन्युअल वाचा आणि गरज असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या चाचणीच्या परिणामांची व्यवस्थित नोंद न ठेवल्यास डॉक्टरांना सल्ला देणे अवघड होते.

जेवण न करणे (Skipping meals) : जेवण न केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. कमी प्रमाणात आणि काही अंतराने सातत्याने खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहू शकते, असे डॉ. सिंगला सांगतात.

एकाच बोटावर चाचणी करणे(Not rotating test sites): एकाच बोटाची वारंवार चाचणी केल्याने अस्वस्थता येऊ शकते. “वेदना आणि कॅलस (callus) जमा होण्यापासून रोखण्यासाठी चाचणीसाठी इतर बोटांचा वापर करावा”, असे डॉ. सिंगला सांगतात.

योग्य पद्धतीने रक्त चाचणी केल्यास लोकांना रक्तातील साखरेच्या पातळीचा अचूक अंदाज मिळू शकतो आणि आरोग्याची काळजी घेण्यास मदत होऊ शकते. गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असेही ते सांगतात.