Symptoms And Signs of Diabetes: भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह हा जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणारा आजार आहे. दुर्दैवाने यावर कोणताही इलाज नाही. एकदा का मधुमेहाची लागण झाली की, मग तुम्हाला त्याच्यासोबतच जगावं लागतं. मधुमेह असलेल्या लोकांना विशेषत: उच्च किंवा कमी रक्तातील साखरेचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी, अयोग्य वेळा व शारीरिक कष्टाचा अभाव यांमुळे मधुमेहासारखे आजार मागे लागतात. मात्र, रक्तशर्करेवर नियंत्रण ठेवल्यास चांगले जीवन जगता येते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरात रक्तशर्करा वाढण्याच्या आधी शरीर अनेक संकेत देते; पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नंतर रक्तात वाढलेली साखर कायमस्वरूपी मधुमेहाचे रूप घेते. मधुमेह होण्यापूर्वी शरीर कोणते संकेत देते, याबाबत सल्लागार व आहारतज्ज्ञ कनिका मल्होत्रा यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ…
मधुमेह होण्यापूर्वी शरीर देते खालील संकेत
१. तहान आणि लघवी वाढणे
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रात्री वारंवार लघवीला जाणे किंवा सकाळी उठल्यावर जास्त प्रमाणात लघवी होणे हेदेखील मधुमेहाचे लक्षण आहे. असे लक्षण दिल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
२. जास्त भूक लागणे
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेवल्यानंतरही सतत भूक लागत असल्यास हे मधुमेहाच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. तुमच्या शरीराला ऊर्जेसाठी पुरेसे ग्लुकोज मिळत नसल्याचे ते लक्षण असू शकते.
३. अंधुक दृष्टी
सकाळी उठताच तुम्हाला दिसण्यात त्रास होत असल्यास अशी चिन्हे शरीरात रक्तातील साखर वाढल्यामुळे दिसू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील शर्करेची पातळी खूप जास्त होते. त्यावेळी डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाही.
४. खूप थकल्यासारखे वाटणे
जर तुम्हाला विनाकारण थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर शरीर ऊर्जेसाठी पुरेसे ग्लुकोज वापरत नसल्याचे ते लक्षण असू शकते.
५. मळमळ होणे
दररोज तुम्हाला सकाळी उठल्यावर मळमळल्यासारखे वाटत असेल, तर मात्र ते मधुमेहाचे लक्षण असण्याची शक्यता खूप जास्त असते.
६. तोंड खूप कोरडे होणे
सकाळी तुमचे तोंड खूप कोरडे होत असेल किंवा झोपेतून उठल्याबरोबर तुम्हाला खूप तहान लागत असेल, तर ही स्थिती डायबिटीजची लक्षणं दर्शवू शकते.
७. वजन कमी होणे
अचानक वजन कमी होणे हेसुध्दा मधुमेहाचे एक लक्षण आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तेव्हा वरिल सांगितलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ही मधुमेहाची लक्षणे असू शकतात. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.