Drinkable Sunscreen Side Effects And Benefits : उन्हाळ्यात सनस्क्रीनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो, जे आपल्या त्वचेचे सूर्यप्रकाश आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते. आत्तापर्यंत आपल्याला सनस्क्रीन म्हणजे फक्त चेहरा आणि शरीरावर लावण्यासाठीची क्रीम किंवा स्प्रे माहीत होता. पण, आता सनस्क्रीनचा एक नवा प्रकार ट्रेंड होत आहे, ज्याला ड्रिंकेबल सनस्क्रीन (Drinkable Sunscreen) असे म्हणतात.
या सनस्क्रीनच्या मदतीने त्वचेचे बाहेरूनच नाही तर आतूनही सूर्यप्रकाशापासून संरक्षण करता येते, त्यामुळे ड्रिंकेबल सनस्क्रीन सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतंय. विशेषत: उन्हाळ्यात ते अधिक चर्चेत आलं आहे. पण, ड्रिंकेबल सनस्क्रीन आपल्या त्वचेचे खरंच सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करू शकते का? आणि ते सनस्क्रीन क्रीम आणि स्प्रेसाठी योग्य पर्याय आहे का? यावर तज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊ..
ड्रिंकेबल सनस्क्रीन म्हणजे काय?
ड्रिंकेबल सनस्क्रीन हे एक प्रकारे सप्लिमेंट ड्रिंक आहे, ज्यात काही नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स आणि औषधी वनस्पती असतात, जे त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. यामुळे स्कीन टॅनिंगसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हे पेय पावडर, कॅप्सूल किंवा द्रव स्वरूपात येते, जे तुम्ही पाण्यात मिसळून पिऊ शकता.
ड्रिंकेबल सनस्क्रीनमध्ये अँटिऑक्सिडंट्स, पॉलीपोडियम ल्युकोटोमोस तसेच अॅस्टॅक्सॅन्थिन किंवा बीटा-कॅरोटीन, ग्रीन टी अर्क, लाइकोपीन, व्हिटॅमिन सी, ई सारखे घटक असतात. हे घटक त्वचेची नैसर्गिक संरक्षण शक्ती वाढवतात. हे घटक फ्री रॅडिकल्सना प्रतिबंधित करतात आणि अतिनील किरणांमुळे होणारे टॅनिंग, पिगमेंटेशन आणि त्वचेचे नुकसान कमी करतात, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसने नवी दिल्लीतील राजौरी गार्डनमधील कॉस्मेटिक स्किन अँड होमियो क्लिनिकमधील सौंदर्यशास्त्रज्ञ आणि कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. करुणा मल्होत्रा यांनी दिली.
नियमित सनस्क्रीनपेक्षा हे कसे वेगळे आहे?
नियमित सनस्क्रीनच्या विपरीत हे पिण्यायोग्य सनस्क्रीन अतिनील किरणांपासून शरीराचे आतून संरक्षण करते, जे सिस्टमॅटिक लेव्हलवर काम करते. यामुळे त्वचेवर कोणताही भौतिक अडथळा जाणवत नाही. म्हणजे क्रीममुळे जाणवणारा चिकट, ओलसरपणा जाणवत नाही, तसेच सूर्यप्रकाशामुळे होणारे पेशींचे नुकसान कमी करून आतून त्वचेची लवचिकता वाढवण्याचे काम करते.
हे लिक्विड बेस सनस्क्रीन सामान्यतः सूर्यप्रकाशात जाण्यापूर्वी दिवसातून एकदा तोंडावाटे घेतले जाते, परंतु त्याचे शोषण आणि परिणाम व्यक्तिपरत्वे बदणारे आहेत, असेही डॉ. मल्होत्रा म्हणाल्या.
मुंबईतील डॉ. शरीफा स्किन केअर क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे यांनीही यावर संमती दर्शवत म्हटले की, हे ड्रिंकेबल सनस्क्रीनन त्वचेचे आतून संरक्षण करण्याचे काम करते, पण संरक्षणासाठी अधिक वेळ घेते. परंतु, नियमित सनस्क्रीम क्रीम, स्प्रेसाठी ड्रिंकेबल सनस्क्रीन चांगला पर्याय असू शकत नाही.
सनस्क्रीनमधील पॉलीपोडियम ल्युकोटोमोससारख्या घटकांनी सनबर्नचा धोका कमी करता येतो, यावर काही वैज्ञानिक आधार असला तरी ड्रिंकेबल सनस्क्रीन स्वतंत्र उपाय म्हणून वापरू शकत नाही, असेही डॉ. शरीफा चौसे म्हणाल्या. कारण यावर आतापर्यंत मर्यादित संशोधन झाले, तसेच त्याबाबतचे पुरावे अजूनही विकसित होत आहेत. पण, ते एसपीएफ लोशन किंवा सनब्लॉकची जागा घेऊ शकत नाही.
हे स्किनकेअर रुटीनसाठी पूरक ठरू शकते, परंतु केवळ त्यावरच अवलंबून राहिल्यास तुमची त्वचा सुरक्षित राहू शकत नाही, असे डॉ. मल्होत्रा म्हणाल्या.
ड्रिंकेबल सनस्क्रीन कोणासाठी फायदेशीर?
डॉ. मल्होत्रा म्हणाल्या की, प्रत्येक जण ड्रिंकेबल सनस्क्रीनचा वापर करू शकत नाही. हे सनस्क्रीन सामान्यतः प्रौढांसाठी सुरक्षित आहे, परंतु डॉक्टरांच्या परवानगीशिवाय ते लहान मुलं, गर्भवती माता आणि विशिष्ट वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांनी वापरू नये”, असा सल्लाही त्यांनी दिला.
ड्रिंकेबल सनस्क्रीन वापरण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
१) हे सनस्क्रीन म्हणून FDA ने मंजूर केलेले नाही.
२) कोणतेही पिण्यायोग्य सनस्क्रीन ब्रॉड-स्पेक्ट्रम SPF 30+ सनस्क्रीनची जागा घेऊ शकत नाही.
३) सूर्यप्रकाशामुळे त्रास होत असलेल्या किंवा त्वचेचे विकार असलेल्यांनी प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?
१) सनस्क्रीनचा वापर करा, सावलीतून चालण्याचा प्रयत्न करा, उन्हापासून त्वचेचे संरक्षण करणारे कपडे घाला आणि अँटीऑक्सिडंट्सचे सेवन करा.
ड्रिंकेबल सनस्क्रीन त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते, परंतु त्याने संपूर्ण त्वचेचे संरक्षण होऊ शकत नाही, ते त्वचेच्या आतील अँटिऑक्सिडंट बूस्ट म्हणून काम करू शकते, पण बाहेरून ढाल म्हणून नाही. तुम्ही यापूर्वी वापरत असलेले सनस्क्रीन क्रीम, स्प्रे अजूनही तुमच्या त्वचेच्या संरक्षणासाठी पूर्ण फायदेशीर आहे. ड्रिंकेबल सनस्क्रीन त्वचेचे आतून संरक्षण करत असले तरी ते थेट सूर्यप्रकाशाच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे तितके संरक्षण करू शकत नाही, असे डॉ. मल्होत्रा म्हणाल्या.
डॉ. चाऊस यांनी नमूद केले की, ब्रॉड-स्पेक्ट्रम एसपीएफ क्रीम, हॅट्स या उन्हापासून त्वचेचे चांगल्याप्रकारे संरक्षण करू शकतात. पण, ड्रिंकेबल सनस्क्रीन केवळ एक संभाव्य पूरक पर्याय म्हणून वापरू शकता. तो नियमित सनस्क्रीनची जागा घेऊ शकत नाही, त्यामुळे ड्रिंकेबल सनस्क्रीन सोशल मीडियावर ट्रेंड होतयं म्हणून त्यावर आंधाळेपणाने विश्वास ठेवून त्याचा वापर करू नका, कोणतेही सनस्क्रीन प्रोडक्ट वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असे डॉ. चाऊस म्हणाल्या.