Seeds For Good Gut Health : आतड्यांचे आरोग्य अलीकडच्या काळात चर्चेत विषय ठरत आहे. आतड्यांचे आरोग्य बिघडल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे अन्न तुमच्या आतड्याचे आरोग्य सुधारू शकते आणि रोग होण्यापासून तुमचा बचाव करू शकते. एम्स, हार्वर्ड व स्टॅनफोर्ड या विद्यापीठांमध्ये प्रशिक्षण घेतलेले कंटेंट क्रिएटर व गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ सेठी यांनी अलीकडेच इन्स्टाग्रामवर याबद्दलची माहिती शेअर केली. काही बिया तुमच्या आतड्यांची काळजी घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे त्यांनी सांगितले. त्यामध्ये चिया, अंबाडी व डाळिंबाच्या बियांचा समावेश असतो.
तर या तिन्ही बियांचे कशा प्रकारे सेवन केल्यावर आतड्यांचे आरोग्य कसे सुधारू शकते हे समजून घेण्यासाठी दी इंडियन एस्क्प्रेसने आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधला.
अळशी किंवा जवसाच्या बिया
भुवनेश्वर येथील केअर हॉस्पिटल्समधील वरिष्ठ आहारतज्ज्ञ गुरु प्रसाद दास यांनी सांगितले की, या बिया ओमेगा-३ चा स्रोत आहेत. त्यामुळे शरीरात तयार होत नसलेले एक आवश्यक फॅटी ॲसिड तयार होते. म्हणूनच या बियांचे दररोज आहारातून सेवन करणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, या अदभुत बियांमध्ये फायटोएस्ट्रोजेनदेखील भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे हार्मोनल संतुलन वाढविण्यास मदत होते. त्यामुळे केवळ PCOS मध्येच मदत होत नाही, तर त्यात फायटोस्टेरॉलदेखील असतात, जे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल सुधारण्यास आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
या बिया शरीराला पचवणे कठीण जाते. त्यामुळे त्यांचे पचन न होताच त्या बाहेर पडू शकतात. त्यामुळे सेवन करण्यापूर्वी पहिल्यांदा त्या बारीक करा. नंतर त्यांची पावडर केल्यास शरीराला त्यातून पोषक तत्त्वे अधिक कार्यक्षमतेने शोषणे शक्य होते. तुम्ही बिया बारीक करण्यासाठी कॉफी ग्राइंडर, ब्लेंडर किंवा फूड प्रोसेसर वापरू शकता. तसेच तुम्ही दुकानातून दळलेले जवसाचे पीठदेखील खरेदी करू शकता आणि ते खराब होऊ नये म्हणून रेफ्रिजरेटर किंवा फ्रिजरमध्ये हवाबंद डब्यात साठवून देऊ शकता, असे आहारतज्ज्ञ गुरु प्रसाद दास यांनी सांगितले आहे.
चिया सीड्स
चिया सीड्स लहान असतात; पण त्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे असतात. म्हणूनच बरेच लोक दैनंदिन आहारात त्याचा समावेश करतात. त्यामध्ये खूप फायबर असते, ज्यामुळे पोटाचे चांगले राहण्यास मदत मिळते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर दररोज चिया सीड्स खाल्ल्याने तुमच्या आतड्यांसंबंधीच्या हालचाली नियंत्रित होण्यास मदत होते. पण, जर तुम्ही पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन केले नाही, तर तुम्हाला पोटफुगीचा त्रास होऊ शकतो, अशी माहितीही आहारतज्ज्ञ गुरु प्रसाद दास यांनी दिली आहे.
चिया सीड्स आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेतच. पण, त्याचबरोबर त्यात ओमेगा-३ फॅटी ॲसिडदेखील विपुल असते, जे हृदयासाठी चांगले असते. चिया सीड्सच्या नियमित सेवनाने वाईट कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
डाळिंबाच्या बिया
जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुषमा पी. एस. यांनी सांगितले की, डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल व अँथ्रोसायनिन्स या संयुगांचा मोठा साठा असतात. ही संयुगे शरीरातील मुक्त रॅडिकल्सना निष्क्रिय करण्यास मदत करतात, ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ कमी होते.
डाळिंब व्हिटॅमिन सी, पोटॅशियम व फायबर या आवश्यक पोषक तत्त्वांचा चांगला स्रोत आहे. डाळिंबामध्ये आहारातील फायबर असते, जे नियमित आतड्यांच्या हालचालींना समर्थन देऊन आणि बद्धकोष्ठता रोखून पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत करतात. पुढे सुषमा यांनी नमूद केले की, डाळिंबामध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराला येणारी सूज कमी होऊ शकते. सांधेदुखी (arthritis) आणि अशा इतर दाहाशी संबंधित आजारांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
डाळिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असलेले संयुगे असतात, जे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास, संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात. डाळिंबात कॅलरीज तुलनेने कमी असतात आणि त्यामुळे हा एक बेस्ट नाश्ता असू शकतो; ज्यामुळे वजन नियंत्रित करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक योग्य पर्याय ठरतो.
पण, जर तुम्हाला आधीच आरोग्य समस्या असतील तर. जास्त प्रमाणात सीड्सचे सेवन न करता, त्यांच्या संपूर्ण आरोग्यदायी फायद्यांचा आनंद घेण्यासाठी तुमच्या आहारात मीठ न लावलेले, कच्चे किंवा हलके भाजलेले किंवा कुस्करलेल्या बिया समाविष्ट करण्याची शिफारस आहारतज्ज्ञ करीत आहेत.