सोहा अली खानला आरोग्यदायी आहार आवडतो. आपल्या आहाराबाबत पिंकव्हिलाला माहिती देताना ती सांगते, “जेवणाच्या बाबतीत मी कंटाळवाणी व्यक्ती आहे. मला जे लोक खरोखर ओळखतात, ते तुम्हाला सांगतील की, जेवणाच्या बाबतीत मी किती कंटाळवाणी व्यक्ती आहे. खरं तर मी दररोज नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात जवळजवळ त्याच गोष्टी खाते. म्हणून माझ्या नाश्त्याची सुरुवात मी मेथीच्या पाण्याने करते आणि मी फळ खाते. पपई, कलिंगड व सफरचंद खाते. मी चीज किंवा जामसह खरोखरच छान ग्लूुटेनमुक्त अॅव्होकॅडो टोस्टचा एक तुकडा खाते”.
आपल्या आहारामध्ये सोहा विशिष्ट संख्येने बदाम खाते, असेही तिने सांगितले. ती सांगते “मी रोज १० बदाम खाते. आपल्या वजनाच्या प्रत्येकी १० पौंडांसाठी तुम्हाला एक बदाम खावा लागतो. माझे वजन सुमारे ११० पौंड (४९.८९५२ किलो) आहे. म्हणजे सुमारे १० किंवा ११ बदाम. ते मी काटेकोरपणे पाळते”.
४६ वर्षांच्या सोहाच्या जेवणात काही भाजी, डाळ, ब्राऊन राईस आणि ती मांसाहारी असल्याने, चिकन किंवा मासे यांचा समावेश असल्याचे ती स्पष्ट करते. ती सांगते,”रात्रीचे जेवणही जवळपास सारखेच असते. पण, रात्रीच्या जेवणात काही सॅलड किंवा हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करते. तंदुरी चिकनदेखील माझ्या जेवणात असते.
सोहाने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्याच्या वजनानुसार त्याने किती बदाम खावेत याबाबत अधिक जाणून घेऊ….
आहार संतुलित करण्यासाठी बदाम खाणे फायदेशीर ठरते. त्यामधील पौष्टिक घटकांमुळे विशेषत: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करताना ते अधिक फायदेशीर ठरते.
बदामातील पोषक घटक आणि तृप्त करणारे गुणधर्म यांमुळे ते संतुलित आहारात, विशेषतः वजन व्यवस्थापनासाठी फायदेशीर ठरू शकतात. “ते तंतुमय घटक, प्रथिने व आरोग्यदायी चरबी यांनी समृद्ध असतात, त्यामुळे पोट भरल्याची भावना वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. परिणामी क्रेव्हिंग आणि जास्त खाणे टाळले जाते,” असे सल्लागार, आहार तज्ज्ञ व प्रमाणित मधुमेह शिक्षक कनिका मल्होत्रा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.
कॅलरी-प्रतिबंधित आहारात बदामांचा समावेश केल्याने वजन लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते आणि कार्डिओमेटाबॉलिक आरोग्यात सुधारणा होऊ शकते.
मल्होत्रा यांच्या मते, दररोज सुमारे ३० ग्रॅम (अंदाजे २०-२३ संपूर्ण बदाम) सेवन करणे वजन कमी करण्यासाठी, तंतुमय घटक, प्रथिने व आरोग्यदायी चरबी संतुलित करण्यासाठी प्रभावी आहे. “बदाम खाल्ल्याने तृप्तता वाढते आणि चयापचय सुधारते. त्यामुळे एकूण उष्मांकाचे सेवन कमी होण्यास मदत होते. पण, प्रत्येक व्यक्तीनुसार वैयक्तिक उष्मांकांच्या गरजा वेगवेगळ्या असतात आणि एक पात्र पोषण व्यावसायिक वैयक्तिक (qualified nutrition professional) वजन कमी करण्याच्या उद्दिष्टांसाठी आदर्श दैनिक सेवन निश्चित करण्यात मदत करू शकतो”, असे मल्होत्रा म्हणाले.
“शरीराच्या वजनाच्या प्रत्येकी १० पौंडांसाठी एक बदाम खाण्याची सामान्य शिफारस ही एक वाजवी सुरुवात आहे”. परंतु, एकूण आहाराच्या गरजा विचारात घेणे आणि योग्य सल्ल्यासाठी व्यावसायिकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
“दररोज सुमारे १० बदाम खाणे हा एक निरोगी नाश्ता पर्याय असू शकतो; परंतु संतुलित आहार राखणे आणि अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आवश्यक ते नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे”, असे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.