“जेव्हा तुम्ही शांत खोलीत असता तेव्हा कधी तुमच्या पोटातून गुरगुरल्यासारखा आवाज आला आहे का? असे घडणे काहींसाठी लाजिरवाणे असू शकते; पण अशा परिस्थितीचा सामना करणारे तुम्ही एकटेच नाही आहात. तो आवाज म्हणजे तुम्हाला कसला तरी त्रास आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. पोटातून गुरगुरल्यासारखा आवाज येणे ही अत्यंत सामान्य म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक बाब आहे. ही तुमच्या शरीराची प्रणाली आहे, जी तुम्हाला आठवण करून देते की, तुम्हाला भूक लागली आहे”, असे डॉ. नरंदर सिंगला यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. ते दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिनचे प्रमुख सल्लागार आहेत.

“गुरगुरण्याचा किंवा गुडगुडण्याचा आवाज म्हणजे तुमचे पोट रिकामे असल्याचे संकेत देण्याचा पचनसंस्थेचा तो एक मार्ग आहे,” असे डॉ. सिंगला सांगतात. जेव्हा बराच वेळ आपण अन्न खात नाही तेव्हा आपल्या पचनसंस्थेत कोणतेही अन्न नसते तेव्हा आतड्यात राहिलेले अन्नाचे कण, वायू किंवा हवा काढण्यासाठी आतड्याचे स्नायू आकुंचन पावतात आणि त्या हालचालीमुळे हा आवाज निर्माण होतो.”

तुमच्या पोटात नक्की काय घडते?

“या प्रक्रियेला तांत्रिक संज्ञा पेरिस्टॅलिसिस (peristalsis) आहे. पेरिस्टॅलिसिस हा शब्द तुमच्या पचनसंस्थेतील स्नायूंच्या लहरींसारख्या हालचालींसाठी वापरला जातो. हे स्नायू पोटातील अन्न, हवा व द्रवपदार्थ हलविण्यास मदत करतात. जेव्हा तुमचे पोट रिकामे असते, तेव्हा त्या हालचालींमुळे आवाज करतात. कारण- त्या अन्नाऐवजी हवा आणि द्रवपदार्थ हलवत असतात.”, असे डॉ. सिंगला सांगतात.

पण हे फक्त शारीरिक आकुंचनांबद्दल नाही. हार्मोन्सदेखील यात भूमिका बजावतात. “जेवणापूर्वी भुकेचे संप्रेरक (हार्मोन्स) घ्रेलिन वाढते आणि अधिक तीव्र आकुंचन निर्माण करते,” असे डॉ. सिंगला स्पष्ट करतात. “हे तुमच्या पोटातील आवाजांना तीव्र करते. विशेषतः जर तुम्ही शेवटचे अन्न खाल्यानंतर काही तास झाले असतील तर.”

पोटातून येणाऱ्या आवाजावर उपाय का?

मनोरंजक बाब म्हणजे यावर उपाय सोपा आहे : जेवण करा. एकदा अन्न तुमच्या पोटात गेले की, पोटातून येणारा हा आवाज कमी होतो आणि स्नायूंच्या हालचालीदेखील कमी होतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अन्न पोटात जाताच स्नायूंचे आकुंचन कमी होते आणि घ्रेलिनची पातळी कमी होते, ज्यामुळे पचनसंस्था शांत होते, “म्हणूनच अन्न सेवनाने पोटातील आवाज येणे थांबते.”, असे डॉ. सिंगला स्पष्ट करतात.
म्हणून पुढच्या वेळी मीटिंगमध्ये किंवा चित्रपटात पाहताना जेव्हा तुमच्या पोटातून आवाज येईल तेव्हा चिंता करू नका. तुमचे शरीर फक्त त्याचे काम करीत आहे.