दैनंदिन घरकामामुळे महिलांना पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्याशी संबंधित तक्रारी होणं ही आज एक सामान्य बाब झाली आहे. विशेषतः गृहिणींच्या बाबतीत हे प्रमाण अधिक दिसून येतं, कारण त्या वजन उचलणं, वाकणं, उभं राहणं यासारखी कामं नियमितपणे करत असतात. वाढतं वय, व्यायामाचा अभाव, अतिश्रम, स्नायूंची झीज आणि हाडांची झीज, चुकीच्या हालचालींची सवय, आणि शरीर रचनेत होणारे सूक्ष्म बदल असे अनेक घटक यासाठी कारणीभूत ठरतात. मात्र योग्य व्यायाम केला, हाडांच्या आणि स्नायूंच्या आरोग्याची काळजी घेतली, घरातील काम योग्य पद्धतीने केलं तर कंबरदुखी, मानदुखी यावर परिणामकारक उपाय मिळू शकतो.

मणक्यावर येणारा ताण

आपला पाठीचा कणा हा शरीराचा प्रमुख आधारस्तंभ आहे. याच्या भोवती असणारे स्नायू आणि लिगामेंट्स त्याला स्थिरता आणि हालचाली दोन्ही देतात. जेव्हा या स्नायूंवर अतिरिक्त आणि असमान भार सतत येत राहतो , तेव्हा त्यांचं कार्य कमी होतं आणि वेदना सुरू होतात. सुरुवातीला स्नायूंपर्यंत मर्यादित असलेला त्रास हळूहळू दोन मणक्यांमधल्या गादीवर येऊ लागतो. घरकाम करताना गृहिणी काही क्रिया वारंवार करतात, त्या बऱ्याच वेळा योग्य पद्धतीने होत नाहीत जसं, वारंवार खाली वाकणं, एकाच हाताने वजन उचलणं, दीर्घकाळ एकाच स्थितीत उभं राहणं किंवा वाकलेलं राहणं, विश्रांती न घेता सतत काम करणं.
या सांगितलेल्या कामाच्या पद्धतीमुळे मणक्याच्या खालच्या भागावर म्हणजेच कंबरेवर (लंबार स्पाइन) सर्वाधिक ताण येतो. हा ताण सतत आणि दीर्घकाळ येत राहिला तर स्नायू थकतात, स्नायूंचं संतुलन बिघडतं, आणि मणक्याची झीज होण्याची शक्यता वाढते. सतत वाकलेल्या स्थितीत काम केल्याने कंबरेच्या मणक्यांमधील गादीवर अतिरिक्त प्रमाणात दाब येतो, यामुळे वयानुसार गादीमध्ये होणारे बदल अजूनच झपाट्याने होऊ लागतात. यातून डिस्क प्रोलेप्स सारख्या आजाराची शक्यता वाढते. विशिष्ट क्रिया पुन्हा पुन्हा करणे आणि चुकीच्या पद्धतीने वाकून वस्तू उचलणे ही गृहिणींमधील कंबरदुखीची प्रमुख कारण आहेत. सतत मान वाकवून काम केल्याने मानेच्या स्नायूंवर आणि मणक्यांवर अतिरिक्त ताण येतो ज्यामुळे मानेच्या मणक्यांमधील गादीची झीज होते आणि मानदुखी चा त्रास सुरु होतो. याशिवाय एकंदर तब्येतीकडे होणारं दुर्लक्ष, जीवनसत्त्वांची कमतरता, पुरेसं पाणी न पिणे, सकाळपासून दुपारपर्यंत उपाशीपोटी काम करणे, अनियमित जेवणाच्या वेळा यासारख्या सवयी सुद्धा गृहिणींच्या एकंदरीत आरोग्यावर परिणाम करतात. कंबरदुखी आणि मानदुखी पाठोपाठ अनेक गृहिणी या वेरीकोज व्हेन्सनेदेखील त्रस्त असतात.

फिजिओथेरेपी उपाय

प्रत्येक गृहिणीच्या गरजेनुसार, वयानुसार, वेदनेच्या प्रकारानुसार आणि कामाचं स्वरूप लक्षात घेऊन व्यायाम सांगितले जातात. हे प्रत्येक गृहिणीनुसार वेगवेगळे असतात.

फिजिओथेरेपी उपचारांचं प्रमुख लक्ष्य

पॉशचरल अवेअरनेस : घरकाम करताना योग्य पोस्चर राखणे, हा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. बहुतेक गृहिणींना यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. यामध्ये कामाच्या दरम्यान कितीदा ब्रेक घ्यावा, ब्रेकमध्ये सोपे कोणते सोपे व्यायाम करावेत याचंही मार्गदर्शन केलं जातं.
कोअर स्टेबिलिटी एक्सरसाइजेस : पाठीचा मणका सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक स्नायू बळकट करणे, यामुळे खाली वाकून काम करताना, किंवा वजन उचलताना कंबरेच्या मणक्याना स्नायूंचा भक्कम आधार मिळतो आणि मणक्यावर येणारा ताण कमी होतो.
फ्लेक्सिबिलिटी इम्प्रूवमेंट : कंबरेच्या आणि विशेषतः पायाच्या स्नायूंचा लवचिकपणा वाढवणे, जेणेकरून कंबरदुखी आणि वेरीकोज व्हेन्स असे दोन्ही त्रास कमी होतात. हालचाली सुलभ होतात, सांधे आखडून जाण्याचं प्रमाण कमी होतं.
याव्यतिरिक्त घरात काही सोपे उपाय देखील करता येतात (अर्थातच तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच हे करायचे आहेत)
१.शक्यतो लांब हँडल असलेले झाडू-पोछा वापरणं
२. एकाच स्थितीत ३० मिनिटांपेक्षा जास्त न राहणं
३. हलक्या स्वरूपाचे स्नायू ताणणारे व्यायाम
४. वजन उचलताना दोन्ही हात वापरणं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपला पाठीचा कणा हा शरीराचा प्रमुख आधारस्तंभ आहे. गृहिणींमध्ये मणक्याशी संबंधित तक्रारी वाढण्यामागे केवळ घरकामच नव्हे, तर ते घरकाम करण्याची पद्धत, सवयी आणि इतर आरोग्याशी संबंधित घटकांचाही समावेश आहे. फिजिओथेरेपी डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनाने आणि कृतीशील सुधारणांनी, कंबरदुखी आणि मानदुखी तर निश्चितच कमी होते पण त्यासोबत कार्यक्षमतेतही वाढ होते.