Cucumber in Summer : सध्या उन्हाळ्याची चाहूल लागू लागली असून, काही प्रदेशांत उन्हाचा तडाखा जाणवत आहे. अशात उष्णतेपासून स्वत:ला वाचविण्यासाठी आहारात थंड भाज्या किंवा फळे खाणे गरजेचे आहे. थंड भाज्यांमध्ये सर्वोत्तम म्हणजे काकडी. काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. काकडी ही शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असून, त्यातील अँटिऑक्सिडंट्समुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. त्याशिवाय काकडी खाल्ल्याने शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही आणि त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी काकडी हा चांगला पर्याय आहे. काकडी खाण्याचे आणखी काही फायदे जाणून घेऊ. द इंडियन एक्स्प्रेसने आहारतज्ज्ञ डॉ. अर्चना बत्रा यांच्या हवाल्याने याविषयी माहिती सांगितली. त्या सांगतात, "काकडीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असल्यामुळे काकडी खाल्ल्याने उन्हाळ्यामध्ये शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही. हायड्रेशन - शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. पोषक घटक - काकडीमध्ये कॅलरीज कमी असतात. त्याशिवाय काकडीमध्ये आवश्यक पोषक घटक आहेत. डॉ. बत्रा सांगतात, "काकडी व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम व मॅग्नेशियम यांचा चांगला स्रोत आहे. आरोग्य चांगले ठेवण्यास काकडी महत्त्वाची भूमिका बजावते." पचनक्रिया सुधारते - काकडीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते; जे पचनासाठी अतिशय फायदेशीर आहे. काकडीच्या सेवनाने तुम्ही बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करू शकता. हेही वाचा : झोपेत असताना तुमच्या घशातून वारंवार आवाज येतो का? ही लक्षणे दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला अँटिऑक्सिडंट्स - काकडीमध्ये बीटा-कॅरोटीन आणि फ्लेव्होनॉइड्स यांसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात; जे शरीरातील हानिकारक रॅडिकल्सला निरुपयोगी बनवतात. शरीरातील पेशी खराब होऊ नयेत आणि आजारांचा धोका कमी व्हावा, यासाठी काकडी अधिक फायदेशीर आहे. वजन नियंत्रण - काकडीमध्ये पाण्याची अधिक मात्रा आणि फायबरचे भरपूर प्रमाण असते. अशा काकडीचा जेव्हा आपण आहारात समावेश करतो तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या वजन नियंत्रणावर होतो. आपल्यापैकी अनेक जण काकडीचा नाश्त्यामध्ये वापर करीत असतील किंवा जेवताना काकडी खात असतील. तुम्ही हे लक्षात घ्या की, काकडीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत; ती तुमचा आहार अधिक पौष्टिक बनविण्यास मदत करते. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही भाजी खरेदी करायला जाल, तेव्हा काकडी आवर्जून खरेदी करा.