Adulterated Ginger-Garlic Paste And Ghee Side Effect : देशभरात अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर सातत्याने कारवाई करण्यात येते. अलीकडेच हैदराबादमधील अनेक भागांत एफडीएने धाड टाकत ५७५ लिटर भेसळयुक्त तूप आणि सात हजार किलो भेसळयुक्त आले-लसूण पेस्ट जप्त केली. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) कोणत्याही परवानगीशिवाय या ठिकाणांवर भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे कारखाने सुरू होते. या ठिकाणी बंदी घालण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे कृत्रिम रंग, अत्यंत अस्वच्छता आढळून आली. दरम्यान, अशा खाद्यपदार्थांचे सेवन आरोग्यासाठी घातक असते. पण, याचा आपल्या शरीरावर नेमका कसा परिणाम होतो जाणून घेऊ…
भेसळयुक्त तूप, आलं लसूण पेस्ट खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होईल?
चेन्नईतील श्री बालाजी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील द क्लेफ्ट अँड क्रॅनियोफेशियल सेंटरमधील नोंदणीकृत आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, आले-लसूण पेस्टमध्ये बहुतेकदा मैदा किंवा कॉर्नफ्लोअर यांसारख्या स्टार्चचा समावेश असतो. त्यात कृत्रिम रंग आणि इतर घातक पदार्थांचाही समावेश केला जातो, जेणेकरून ते ताजे दिसतील आणि जास्त काळ टिकतील. काही वेळा खराब झालेली किंवा जुन्या आले-लसणाच्या पेस्टचे पुन्हा पॅकिंग केलीे जाते.
अशा पेस्टचे सेवन केल्यास गॅस, अॅसिडिटी किंवा डायरिया यांसारखे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यानंतर कालांतराने यकृत आणि मूत्रपिंडावर परिणाम होतो. काहींना भेसळयुक्त पदार्थांच्या सेवनाने अॅलर्जी, त्वचा आणि श्वसनाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. आले-लसूण पेस्ट भेसळयुक्त असते तेव्हा जळजळ जाणवते आणि पचनास अडथळे येतात.
तसेच तुपात वनस्पती तेल, प्राण्यांची चरबी, स्टार्च किंवा कृत्रिम चवीसाठी रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ शुद्ध तुपासारखे दिसतात; परंतु शरीरासाठी फार हानिकारक असतात. वनस्पती तेलात ट्रान्स फॅट्सचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. दरम्यान, असे भेसळयुक्त तूप पचण्यासह कठीण नियमित सेवन केल्यास शरीराचे हळूहळू नुकसान होऊ शकते.
भेसळयुक्त आले-लसूण पेस्ट कशी ओळखायची?
तुम्ही घरच्या घरीदेखील भेसळयुक्त आले-लसूण पेस्ट तपासू शकता. त्यासाठी आले-लसूण पेस्टमध्ये एका चमचाने आयोडिनचे काही थेंब घाला. जर ती पेस्ट काळी किंवा निळी झाल्यास त्यात स्टार्च आहे. तुम्ही ही पेस्ट एक ग्लास पाण्यात टाकूनदेखील भेसळयुक्त आहे की नाही ओळखू शकता. जर समजा पेस्ट पाण्यात टाकल्यानंतर तळाशी पांढरी पावडर जमा झाली, तर त्यात मैदा वापरला गेला असण्याची शक्यता आहे. तसेच पेस्टमधून आंबट किंवा विचित्र वास येत असल्यास त्यात खराब पदार्थ वापरले गेले आहेत, असे समजा, असेही दीपलक्ष्मी म्हणाल्या.
तूप भेसळयुक्त आहे की नाही हे तपासण्यासाठी ते काही तासांसाठी ते फ्रिजमध्ये ठेवा. शुद्ध तूप समान रीतीने घट्ट होईल. जर त्यात दोन वेगळे थर तयार झाले, असतील किंवा त्याचा रंग, पोत वेगळी दिसत असेल, तर त्यात भेसळ असू शकते.
वितळल्यावर शुद्ध तूप पारदर्शक दिसते. पण भेसळयुक्त तुपात गुठळ्या दिसू शकतात. त्याचा घाणेरडा वास येऊ शकतो. हे धोके टाळण्यासाठी नेहमी तुपाच्या पिशवी किंवा डब्यावरील लेबल वाचा, FSSAI मार्क आहे की नाही पाहा. विश्वासार्ह ब्रँडचे तूपच खरेदी करा.
आले-लसूण पेस्ट खरेदी करताना त्याच्या पॅकेटवर फक्त आले-लसूण आणि थोडे तेल किंवा मीठ असे लिहिले आहे का ते तपासा. योग्य पॅकेजिंगशिवाय विकले जाणारे खूप स्वस्त पदार्थ किंवा सुटे तूप खरेदी करणे टाळा. शक्य असल्यास घरी थोड्या प्रमाणात आले-लसूण पेस्ट तयार करा.
भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या सेवनाचे लगेच परिणाम दिसून येणार नाहीत; परंतु कालांतराने त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावर दिसून येऊ शकतात.