मुंबई : हृदयाचे रक्षण करणारे डॉक्टरच आता हृदयविकाराला बळी पडत आहेत, अशा वेदनादायी वास्तवाची जाणीव पुन्हा एकदा झाली आहे. अलकडेच चेन्नईतील नामांकित हृदय शल्यचिकित्सकांचा वयाच्या अवघ्या ३९ वर्षी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेची लाट पसरली आहे. गेल्या दोन दशकात रुग्णांना जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांमध्येच ह्रदयविकाराच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे.

भारतात डॉक्टरांवर वाढलेल्या कामाचा ताणतणाव, १८ तासाहून अधिक काळ करावे लागणारे काम, झोपेची कमतरता, अनियमित आहारपद्धती, आणि व्यायामाचा अभाव ही गंभीर कारणे ठरत असल्याचे सीएमसी वेल्लोरमधील वरिष्ठ हृदयविकारतज्ज्ञांनी सांगितले. देशभरात डॉक्टरांना ह्रदयविकाराचा झटका आल्याच्या घटना वेगाने वाढत आहेत. दोन दशकांपूर्वी मुंबईतील ख्यातकिर्त ह्रदयशल्यविशारद डॉ नीतू मांडके यांचाही ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला होता.

तरुण वयात डॉक्टर, आयटी व्यावसायिक आणि शहरांतील कामकाजाच्या ताणाखाली असलेली मंडळी अचानक हृदयविकाराने कोसळत असल्याच्या घटना चिंताजनक वेगाने वाढत आहेत. चेन्नईतील तरूण ह्रदयशल्यचिकित्सक डॉटरांच्या मृत्यूने हा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला आहे. याबाबत “आपण समाजाचे जीव वाचवतो, पण आपले आरोग्य सांभाळायला वेळ देत नाही” असे मनोगत अनेक डॉक्टरांनी बोलून दाखवले आहे.

नॅशनल मेडिकल जर्नल ऑफ इंडिया २०२२ च्या अभ्यासानुसार ४५ टक्के भारतीय डॉक्टर “बर्नआउट सिंड्रोम” च्या छायेखाली आहेत. सततची ड्युटी, रुग्णांची संख्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे मानसिक ताण वाढतो. हा ताण थेट हृदयविकाराचा धोका वाढवतो. परिणामी डॉक्टरांनीही आपल्या प्रकृतीची योग्य प्रकारे काळजी घेण्याची गरज असून दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम, किमान सात तासांची झोप ,धूम्रपान, मद्यपान व जंक फूड टाळणे ,दरवर्षी हृदयविकार तपासणी करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचेच म्हणणे आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र शाखेच्या २०२३ च्या सर्वेक्षणानुसार ७८ टक्के डॉक्टर्सना दररोज १२ तासांहून अधिक काम करावे लागते. ६५ टक्के डॉक्टर्सना पुरेशी झोप मिळत नाही. परिणामी डॉक्टर्सना ह्रदयविकाराचा धोका वाढत असल्याचे दिसून येते. आयसीएमआर व जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कामाचा ताण, दीर्घकाळ मानसिक ताणामुळे हृदयावरील वाढणारा ताण,अनियमित जीवनशैली,झोपेचा अभाव,आहारातील अनियमित, वाढता स्थुलपणा तसेच धूम्रपान व मद्यपानाच्या चुकच्या सवयी कारणीभूत आहेत.

आयसीएमआर २०२३ च्या अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे २८ टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होतात. यात ३५ ते ५० वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण गेल्या दहा वर्षांत दुप्पट झाले आहे. महाराष्ट्रात सुमारे २७ टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होतात. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरी भागांत तरुण वयामध्ये ह्रदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वेगाने वाढत असून यामागे बदलती जीवनशैली, वाढते ताणतणाव, चुकीच्या सवयी, जंक फूड आदी विविध कारणे असल्याचे मुंबईतील प्रसिद्ध हर्दयविकारतज्ज्ञ डॉ गजानन रत्नपारखी यांनी सांगितले.

महत्त्वाचे म्हणजे करोनानंतरच्या काळात डॉक्टर, आयटी क्षेत्रातील लोकांसह बहुतेकांमध्ये ह्रदयविकाराच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत असून याबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे डॉ रत्नपारखी म्हणाले. यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप घेणे तसेच योग, ध्यान व व्यायाम यावर डॉक्टरानी तसेच अन्य लोकांनीही भर देणे आवश्यक आहे. जीवनशैलीत योग्य ते बदल केल्यास ह्रदयविकारासह अनेक आजारांना आपण दूर ठेवू शकतो असे डॉ रत्नपारखी म्हणाले.