Silent Heart Attack Symptoms: हृदयविकाराचा झटका म्हणजे एकाच क्षणात आयुष्य थांबवणारा आजार. आजवर हा आजार वृद्धांच्या यादीत मोजला जायचा, पण आता काळ बदललाय. तंदुरुस्त दिसणारे तरुण, फिटनेसवर लक्ष देणारे युवक-युवतीसुद्धा अचानक कोसळताना दिसत आहेत. हे दृश्य केवळ धक्कादायकच नाही तर एक गंभीर आरोग्य संकट बनत चालले आहे.
अनेक वेळा लोकांना हृदयविकाराचा झटका येतोय हेच कळत नाही, कारण त्याला कोणतीही ठरलेली लक्षणं दिसत नाहीत आणि जेव्हा कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. याच विषयावर प्रसिद्ध हृदयविशारद डॉ. श्रीराम नेने, (बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती), यांनी “The Ranveer Show” या पॉडकास्टवर सविस्तर भाष्य केले. त्यांनी या वाढत्या ‘सायलेंट हार्ट अटॅक’च्या घटनांमागची खरी कारणं सांगितली आणि काही इशारे दिले, जे प्रत्येक तरुणाने लक्षात ठेवायलाच हवेत!
हृदयविकाराचा झटका म्हणजे नेमकं काय घडतं?
डॉ. नेने म्हणतात, “जेव्हा हृदयाकडे जाणाऱ्या तीन प्रमुख धमन्यांपैकी एखाद्या धमन्यात रक्तप्रवाह अचानक थांबतो, तेव्हा त्या भागाला ऑक्सिजन मिळेनासा होतो, त्यामुळे त्या हृदयपेशी मरायला लागतात.” या अवस्थेत छातीत जळजळ, हातात किंवा खांद्याकडे पसरलेल्या वेदना, घाम येणे, दम लागणे किंवा धडधड वाढणे अशी सामान्य लक्षणं दिसतात. पण इथेच खरी भीती आहे, सर्वांना ही लक्षणं दिसतातच असं नाही!
२० टक्के लोकांमध्ये एकही लक्षण दिसत नाही!
डॉ. नेने यांच्या म्हणण्यानुसार, जवळपास २०% रुग्णांना कोणतीही पारंपरिक लक्षणं जाणवत नाहीत. काहींना फक्त थकवा, बेशुद्धी किंवा सौम्य अस्वस्थता जाणवते. अनेक जण तर कोणताही संकेत न मिळता थेट कोसळतात. असं का होतं? कारण हृदयाचे ठोके अचानक अनियमित होतात, हृदय रक्त पंप करणं थांबवतं आणि मेंदूकडे रक्तपुरवठा बंद होतो. परिणामी काही क्षणांत बेशुद्धी, हृदयविकाराचा झटका किंवा मृत्यूही होऊ शकतो.
तरुणांमध्ये धोका का वाढतोय?
तज्ज्ञांच्या मते वाढलेला ताण, सतत बसून राहण्याची जीवनशैली, धूम्रपान, जंक फूड, झोपेचा अभाव, तसेच डायबिटीस, ब्लड प्रेशर यांसारख्या न ओळखल्या गेलेल्या आजारांमुळे तरुण पिढी अधिक धोक्यात आहे. करोना महामारीनंतर भारतात ४५ वर्षांखालील लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. अनेक जण पूर्वसूचना नसतानाच कोसळतात.
काय कराल बचावासाठी?
डॉ. नेने यांचा सल्ला स्पष्ट आहे, “हृदयविकार टाळायचा असेल तर आधी त्याची कारणं ओळखा.” नियमित आरोग्य तपासण्या, हृदयाचे स्क्रिनिंग आणि कुटुंबातील इतिहास माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताण कमी ठेवणे आणि तंबाखू टाळणे हे जीवनशैलीचे बदल जीवन वाचवू शकतात.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अकस्मात थकवा, छातीत किंवा जबड्यात जळजळ, श्वास घेण्यास त्रास, सतत दमल्यासारखं वाटणं हे सर्व “सायलेंट हार्ट अटॅक”चे इशारे असू शकतात.
लक्षात ठेवा, हृदयविकार आता फक्त वृद्धांसाठी मर्यादित नाही, तो तरुण पिढीला शांतपणे गाठतो आहे. वेळेत ओळखणं आणि सावध राहणं हाच खरा बचावाचा मार्ग आहे.
