How Cycling Beneficial For Mental Health : एक साधं, परवडणारं आणि अगदी स्वच्छ, पर्यावरणपूरक वाहतुकीचे साधन म्हणजे सायकल. पण, बदलत्या काळात सायकलचा वापर आता प्रवासासाठी कमी होऊ लागला आहे आणि त्याची जागा कार, बाईक यांनी घेतली आहे. त्यामुळे सायकलचा वापर आता व्यायामासाठी जास्त होऊ लागला आहे. आजकाल अनेक जण निरोगी राहण्यासाठी सायकलिंग करतात.
तर सायकलिंग वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर आहे. त्याचे मानसिक, तसेच शारीरिक आरोग्यदायी फायदे आहेत. तर आज आपण या बातमीतून सायकलिंगमुळे ताण, चिंता कमी करण्यास आणि एकंदरीत आरोग्य सुधारण्यास कशी मदत होऊ शकते याबद्दल जाणून घेऊ…
एंडोर्फिन सोडते (Releases Endorphins)
सायकलिंगमुळे एंडोर्फिन सोडण्यास मदत होते. एंडोर्फिन आनंदवृद्धीचे संप्रेरक आहे. त्यामुळे नैसर्गिक मूड सुधारतो. वेदना कमी होतात आणि ताण, चिंता यांच्याशी लढण्यास मदत मिळते.
कॉर्टिसॉल कमी करते (Reduces Cortisol)
कॉर्टिसॉल मानवाच्या शरीरातील सर्वांत महत्त्वाच्या हार्मोन्सपैकी एक आहे. त्याला ताण किंवा स्ट्रेस हार्मोन, असंही म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही नियमितपणे सायकल चालवता तेव्हा ते तुमच्या कॉर्टिसॉलची पातळी नियंत्रित करण्यास आणि कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. २० ते ३० मिनिटे सायकल चालवण्यानेदेखील तुमच्या मूडमध्ये लक्षणीय फरक निर्माण होऊ शकतो.
मेंदूची कार्यक्षमता वाढवते (Boosts Functioning of Brain)
सायकलिंग मेंदूतील रक्तपुरवठा वाढवते. तसेच त्यामुळे शरीराला ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळतात. त्यामुळे लक्ष केंद्रित होऊन, स्मरणशक्ती सुधारते. त्यामुळे मानसिक त्रास दूर होण्यास मदत होते.
झोपेची गुणवत्ता सुधारते (Improves Sleep Quality)
सायकलिंगसारख्या शारीरिक हालचालींमुळे तुम्हाला चांगली झोप येते. जे लोक नियमितपणे सायकल चालवतात, त्यांना लवकर झोप येते आणि त्यांना चांगली विश्रांती मिळते, जी चिंता कमी करण्यास आणि मूड स्थिर करण्यासाठी महत्त्वाची आहे.
सजगतेला प्रोत्साहन (Encourages Mindfulness)
माइंडफुलनेस म्हणजे सजगता. सायकलिंगकरिता विशेषतः बाहेर तुम्हाला त्या क्षणी उपस्थित राहण्याची आवश्यकता असते. सायकलिंग तुमचे लक्ष चिंतांपासून दूर करून, तुमच्या सभोवतालची परिस्थिती आणि शरीराच्या हालचालींकडे वळवते आणि सजगतेला प्रोत्साहन देते.