केसांसाठी रासायनिक उत्पादनांचा अतिवापर, प्रदूषण आणि धूळ यामुळे आपले केस निस्तेज आणि निर्जीव होतात. त्याचप्रमाणे केसांना पुरेसं पोषण आणि ओलावा न मिळाल्याने दुतोंडी केसांची समस्या उद्भवू शकते. केस ट्रिम करणे हा दुतोंडी केसांच्या समस्येवरचा एक उपाय आहे. मात्र ही समस्याच उद्भवू नये यासाठी केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. काही सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही या समस्येचा सामना करू शकता आणि आपल्या केसांची काळजी घेऊ शकता.

जेव्हा दुतोंडी केसांबद्दल बोलतो तेव्हा केस ट्रिम करूनच त्यावर उपचार करतो. दुतोंडी केसांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. दुतोंडी केसांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही प्रभावी सोप्या टिप्सचा अवलंब कसा करू शकता हे जाणून घेऊयात.

दुतोंडी केसांवर उपचार करण्यासाठी केसांची काळजी घेण्याची पद्धत खूप प्रभावी आहे.

केस धुतल्यानंतर केस वाळवण्यासाठी जुना कॉटन टी-शर्ट किंवा कॉटन टॉवेल वापरा. केस पुसण्यासाठी कॉटन टॉवेल वापरल्याने केसांवर कमी दाब पडतो.

शक्यतो ओले केस विंचरू नका. पण विंचरायचेच असतील तर रुंद दातांचा कंगवा वापरा. केस धुतल्यानंतर ब्रशने केस विंचरू नका, त्यामुळे केस खराब होऊ शकतात.

प्रत्येक वेळी केस धुताना हेअर कंडिशनर वापरा. कंडिशनर लावल्यानंतर केस फारसे तुटत नाहीत.

तुम्ही आठवड्यातून एकदा हेअर मास्क वापरू शकता. तुम्ही तुमचे केस धुवा आणि त्यावर हेअर मास्क लावा आणि १५-२० मिनिटे तसेच राहून द्या. मास्क लावून डोक्यावर शॉवर कॅप घाला. २० मिनिटांनी केस धुवा.

केसांचा ओलावा टिकवून ठेवायचा असेल तर केसांसाठी हेअर ड्रायर वापरू नका. हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनर्स सारख्या गरम यंत्रांमुळे केस खराब होतात. जर तुम्ही ते केसांवर वापरत असाल तर प्रथम केसांवर हीट प्रोटेक्टंट स्प्रे वापरा.