How To Get Full Sleep In Less Time, Yoga Video: दुपारी जेवण झालं आणि चुकून एखादी पोळी किंवा चमचाभर भात जास्त खाल्ला की डोळे लगेच जड व्हायला लागतात. त्यातही जर तुम्हाला स्क्रीनसमोर बसून काम करायचं असेल तर तुमची किती चिडचिड होऊ शकते हे आम्ही समजू शकतो. कधी कधी तर अगदी असा क्षण येतो की बस झालं म्हणून आपणही लॅपटॉप बंद करायला जातो पण सेकंदातच पुढच्या टास्कची डेडलाईन डोळ्यासमोर येते आणि पुन्हा त्याच स्क्रीनकडे बघत राहावं लागतं नाही. मध्ये मध्ये डुलक्या काढत आपण नाही म्हणायला झोपेचं कर्ज उतरवू पाहतो पण त्या काही सेकंदांच्या डुलक्या पुरेश्या ठरत नाहीत हे तुम्हाला- आम्हाला चांगलंच माहितेय. अशावेळी आपण तास- दोन तास न झोपता चटकन काही मिनिटांत योग निद्रेचा सराव करून स्वतःला पुन्हा ताजेतवाने करू शकता. ही योग निद्रा म्हणजे काय? कधी करावी? कशी करावी? किती वेळ घ्यावी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया..

@wellnesswithmanisha या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये योग निद्रेविषयी सविस्तर माहिती दिली आहे. योगा अभ्यासक मनीषा यादव सांगतात की, योग निद्रा म्हणजे जाणीवपूर्वक झोपणे. सोप्या शब्दात सांगायचं तर हे झोपेचे आणि ध्यानाचे एकत्रित स्वरूप आहे ज्यामध्ये आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी आपण एका प्रकारे रिस्टार्ट करत असतो.

योग निद्रा कशी घ्यावी?

तुम्ही फक्त पाठीवर डोळे मिटून झोपा – शक्यतो योगा मॅटवर. दोन दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे लक्ष द्या: उजवा पाय, डावा पाय, उजवा गुडघा, डावा गुडघा-इत्यादी. शेवटी तुमचे लक्ष संपूर्ण शरीरावर घ्या आणि काही मिनिटे पडून राहा. नंतर हळू हळू आपल्या उजव्या बाजूला वळा
आणि उठून बसा.

योग निद्रा किती वेळ घ्यावी?

किमान २० ते जास्तीत जास्त ३० मिनिटे

योग निद्रेसाठी दुपारची सर्वोत्तम वेळ: दुपारी २ ते ३ दरम्यान

हे ही वाचा<< Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा

किमान काही दिवस जर तुम्ही हा प्रयोग करून पाहिलात तरी तुम्हाला तुमच्या शरीराला दुपारच्या वेळी सक्रिय राहण्याची सवय लागण्यास मदत होऊ शकते. ज्यामुळे मरगळ झटकून देता येईलच पण पुढील कामांमध्ये लक्ष सुद्धा नीट देता येईल.