वाहनांची वाढती संख्या आणि इतरही अनेक कारणांमुळे सध्या अनेक शहरांमधील प्रदूषण वाढताना दिसत आहे. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो. सध्या दिल्लीमध्ये धुरके पसरल्याने तेथील नागरिकांच्या आरोग्याविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दिल्लीमधील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचल्यानंतर आता इतर शहरांमधील प्रदूषणाबाबतही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे साहजिकच या शहरांमधील नागरिकही चिंताग्रस्त झाले आहे.
प्रदूषणाशी सामना करण्यासाठी शरीरात पुरेशी अँटी ऑक्सिडंटस असणे आवश्यक आहे. त्यासाठी आहारामध्ये काही बदल केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आता आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करावा पाहूयात…

व्हिटॅमिन सी – शरीरात जाणाऱ्या प्रदूषणाच्या कणांपासून आपले संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक असते. व्हिटॅमिन सीमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. विविध संसर्गांपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन सी अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे आहारात टोमॅटो, संत्री, ब्रोकोली, पपई, स्ट्रॉबेरी यांसारख्या फळांचा समावेश असायला हवा.

व्हिटॅमिन ई – शरीरातील पेशींचे चांगल्या पद्धतीने पोषण होण्यासाठी व्हिटॅमिन ई आवश्यक असते. बदाम, दाणे, सूर्यफुलाच्या बिया यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. याशिवाय लवंग, ओवा यांसारख्या मसाल्यातील पदार्थांमध्येही व्हिटॅमिन ई असते. याबरोबरच पालेभाज्या, धान्य, अंडी यांमध्येही व्हिटॅमिन असते. त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे.

ओमेगा ३ फॅटी अॅसिड – हृदयाच्या आरोग्यासाठी ओमेगा ३ फॅटी अॅसिड उपयुक्त असते. शरीराचे प्रदूषणापासून रक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पालेभाज्या, आक्रोड, दाणे यांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडस असतात.

बीटा -केरोटीन – हा घटक शरीरातील अँटी-ऑक्सिडंट म्हणून काम करतो. हा व्हिटॅमिनचा रिफाईंड फॉर्म आहे. पालक, गाजर मुळा या भाज्यांमध्ये हा घटक असल्याने या भाज्यांचा आहारात समावेश ठेवल्यास प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करणे सोपे होते.