जिओने वर्षभरापूर्वी टेलिकॉमच्या क्षेत्रात प्रवेश करत धक्का दिला होता. जिओच्या धमाकेदार ऑफर्समुळे बाजारातील इतर कंपन्यांचे धाबे दणाणले होते. काही दिवसांपूर्वी जिओने आपला फोन बाजारात दाखल करत टेलिकॉम क्षेत्रात आणखी एक धक्का दिला होता. त्यानंतर ग्राहकांना विविध ऑफर्स देत सातत्याने आकर्षिक करण्यात जिओ यशस्वी झाले आहे. आता पुन्हा एकदा जिओने आपल्या ग्राहकांसाठी एकाहून एक चांगल्या ऑफर्स आणत ग्राहकांना खूश करण्याचे ठरवले आहे. १० जीबी डेटाचे १० व्हाऊचर तसेच २४८ रुपयांच्या रिचार्जवर २५०० रुपयांचे गिफ्ट देणार असल्याचे जिओने जाहीर केले आहे.
माय जिओ अॅप मध्ये १० जीबीचे १० वाऊचर मिळणार आहेत. म्हणजेच अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना १०० जीबी डेटा मिळेल. हे वाऊचर ग्राहकांना एक वर्षांच्या आत रिडिम करता येतील. ही ऑफर १० एप्रिलपासून सुरु झाली असून नव्याने जिओचे ग्राहक होणाऱ्यांनाच ही ऑफर मिळू शकेल असे सांगण्यात आले आहे. ग्राहकांच्या खिशाला परवडतील अशा एकाहून एक उत्तम ऑफर्स देत ग्राहकांना खूश करण्याचा धमाका जिओने लावला आहे.
याशिवाय आणखी एक आकर्षक ऑफर म्हणजे २४८ रुपयांत २५०० रुपयांची भेटवस्तू मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना कमीत कमी १४९ रुपयांचा पहिला रिचार्ज करणे आणि ९९ रुपयांत जिओची प्राईम मेंबरशीप घेणे आवश्यक आहे. त्यावर ९९९ रुपयांपर्यंतचे मोफत जिओ फाय डिव्हाईस आणि १५०० रुपयांच्या किंमतीचा १०० जीबी अतिरिक्त ४ जी डेटा मिळेल. ही ऑफर गूगल होम किंवा क्रोमकास्ट डिव्हाईस (फक्त भारतीय) च्या खरेदीवर उपलब्ध असेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना रिलायन्स डिजिटल, रिलायन्स डीएक्स मिनी, जिओ स्टोअर डिवाईस खरेदी करता येईल. जिओ प्रीपेड ग्राहकही या ऑफरचा फायदा घेऊ शकतात.