Joe Biden diagnosed with prostate cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले आहे. तो विकार आता त्यांच्या हाडांपर्यंत पसरला आहे. बायडेन यांच्या कार्यालयाने रविवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. ८२ वर्षीय बायडेन यांना गेल्या आठवड्यात लघवी करण्यास त्रास होत असताना त्यांनी डॉक्टरांना भेट दिली. तपासणीनंतर गेल्या शुक्रवारी त्यांना हा आजार झाल्याचे निदान झाले.

प्रोस्टेट कर्करोग म्हणजे काय?

प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीमध्ये होणारा कॅन्सर आहे. ही ग्रंथी मूत्राशयाच्या खाली आणि मलाशयासमोर असते आणि ती वीर्यनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते. कॅन्सर झाल्यावर या ग्रंथीतील पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि सुरुवातीला कोणतीही लक्षणे नसली तरी नंतर लघवी करताना त्रास, रक्त, वेदना किंवा लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो. अमेरिकेत पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग हा सर्वांत सामान्य कॅन्सरपैकी एक आहे. एका आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी सुमारे १.४ दशलक्ष लोक प्रोस्टेट कर्करोगाला बळी पडतात. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मते, फुप्फुस आणि तोंडाच्या कर्करोगानंतर, पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाचा सर्वाधिक धोका असतो. ५० वर्षांच्या वयानंतर हा धोका वाढतो. अनेक प्रकरणांमध्ये, यापेक्षा कमी वयाचे रुग्णदेखील समोर आले आहेत. अशी अनेक प्रकरणे आहेत, जिथे तो आढळून येतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो. प्रोस्टेट कर्करोग आत वाढतो आणि मूत्राशय, यकृत, फुप्फुसे व पोट यांसारख्या अवयवांमध्ये पसरतो. कर्करोगाच्या पेशी रक्तासह हाडांपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे हाडांमध्ये प्रचंड वेदना होतात आणि ती तुटू लागतात.

२०२३ मध्ये बायडेन यांच्या त्वचा कर्करोगावर उपचार

२०२३ च्या सुरुवातीला जो बायडेन यांना त्वचेचा कर्करोग झाला होता. व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी सांगितले की, बेसल सेल कार्सिनोमा हा त्वचेच्या कर्करोगाचा एक सामान्य प्रकार, त्यांच्या छातीवर तो आढळून आला होता. फेब्रुवारीमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान हा भाग काढून टाकण्यात आला. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, अमेरिकेत प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमध्ये सर्वांत सामान्य कर्करोग आहे आणि कर्करोगाच्या मृत्यूचे ते दुसरे प्रमुख कारण आहे.

प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे

सुरुवातीच्या टप्प्यात प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे लक्षात येण्यासारखी नसतात. हा आजार जसजसा वाढत जातो, तसतशी त्याची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात:

  • लघवी करण्यास त्रास होणे किंवा लघवीचा प्रवाह मंदावणे
  • वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्री
  • वेदनादायक लघवी किंवा जळजळ होणे
  • लघवी किंवा वीर्यामध्ये रक्त येणे
  • पाठ, कंबर किंवा ओटीपोटात वेदना
  • वजन कमी होणे आणि थकवा.

बचावासाठी कोणते उपाय करावेत?

नियमित व्यायाम करा

व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि प्रतिकारशक्तीही वाढते. आठवड्यातून किमान पाच दिवस कार्यरत राहिल्यास कॅन्सरपासून संरक्षण मिळू शकते.

वजन नियंत्रणात ठेवणे

लठ्ठपणामुळे हार्मोनल असंतुलन होते आणि कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे दररोज किमान २०-३० मिनिटे चालणे किंवा योगासने केल्याने वजन नियंत्रणात राहते.

योग्य आहार घ्या

आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य आहार गरजेचा आहे. त्यामुळे फळे, भाज्या, धान्ये आणि अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थाचे सेवन करा. फॅट्सवाले आणि प्रोसेस्ड फूड टाळल्यास प्रोस्टेटवर ताण येत नाही.

व्हिटॅमिन डी व ई असणे आवश्यक

व्हिटॅमिन डी व ई या व्हिटॅमिन्समुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती बळकट होते. त्यामुळे या जीवनसत्त्वांची आपल्या शरीराला गरज आहे. पण लक्षात घ्या की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे कोणतेही सप्लिमेंट घेणे टाळा.

धूम्रपान व मद्यपान टाळा

तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्य या कॅन्सरजन्य घटकांचे सेवन धोकादायक ठरते. हे पदार्थ प्रोस्टेट ग्रंथीच्या पेशींना नुकसान पोहोचवतात.

प्रोस्टेट कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी पुरुषांनी ‘हे’ ६ पदार्थ न चुकता खाल्ले पाहिजेत

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. झिंक हा घटक प्रोस्टेटच्या कार्यासाठी अत्यावश्यक असून, पुरुष प्रजनन क्षमतेसाठीही तो उपयुक्त आहे. त्यामुळे दररोजच्या आहारात भोपळ्याच्या बिया समाविष्ट कराव्यात.

अंडी

वय वाढल्यावर स्नायूंची ताकद कमी होते. अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. त्यात व्हिटॅमिन डी, ओमेगा-३ व कोलीन यांसारखी पोषणद्रव्ये असतात. कोलीन हे जनुकीय स्तरावर चरबीसंचय कमी करण्याचे कार्य करते.

बीट

बीटामध्ये नैसर्गिक नायट्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. हे घटक रक्तदाब नियंत्रित करण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि शरीराची सहनशक्ती वाढविण्यास मदत करतात. त्यामध्ये पोटॅशियमसुद्धा भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील अतिरिक्त क्षार बाहेर टाकण्यास मदत करते.

मासे

माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स असतात. हे घटक शरीरातील सूज किंवा जळजळ कमी करण्यासाठी आणि प्रोस्टेटचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात.

सोया उत्पादने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोयामध्ये आढळणाऱ्या आयसोफ्लेव्होन्स या घटकांचा सौम्य एस्ट्रोजेनिक प्रभाव असतो. त्यांचा अँटीऑक्सिडंट गुणधर्म आणि पेशींमध्ये होणाऱ्या अनावश्यक वाढीवर (एपोप्टोसिस) नियंत्रण ठेवण्याचे कार्य प्रोस्टेट कर्करोग टाळण्यासाठी मदत करते.