…तर तुम्हालाही लागलंय इंटरनेटचे व्यसन

अनेकांना आपल्या दिवसभरातील इतर कामांइतके मोबाईलवर सर्फिंग करण्याचे काम महत्त्वाचे वाटू लागले आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

सध्या डोळ्यासमोर असलेला कॉम्प्युटर आणि मोबाईल यांचे प्रमाण किती वाढले आहे हे वेगळे सांगायला नको. घरात, ऑफीसमध्ये, प्रवासादरम्यान, सार्वजनिक ठिकाणी कुठेही गेलात तरी अनेक जण तुम्हाला मोबाईलवर दिसतातच दिसतात. अनेकांना आपल्या दिवसभरातील इतर कामांइतके मोबाईलवर सर्फिंग करण्याचे काम महत्त्वाचे वाटू लागले आहे. मोबाईल नसेल तर अनेकदा काहींना अपंग झाल्यासारखेही वाटू शकते. मोबाईलमध्ये व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यावर सर्फिंग करणे किंवा वेगवेगळे व्हिडियो पाहणे यात गैर काहीच नाही. मात्र त्या गोष्टीचे व्यसनात रुपांतर झाले तर ती नक्कीच धोक्याची घंटा ठरु शकते. आता आपल्याला मोबाईल किंवा इंटरनेटचे व्यसन आहे हे कसे समजेल? तर हे व्यसन असणाऱ्यांमध्ये काही समान लक्षणे आढळून येतात. पाहूयात ही लक्षणे नेमकी कोणती…

१. वेळेचे गणित बिघडते – जेव्हा तुम्ही इंटरनेटवर असता तेव्हा तुम्हाला वेळेचे भान राहत नाही. त्यामुळे तुमचा दिवसातील आणि रात्रीचाही वेळ कुठे जातो तुम्हालाच समजत नाही. पण यामध्ये तुमचा अतिशय महत्त्वाचा वेळ इंटरनेटवर जात असतो आणि आपल्या ते लक्षातही येत नाही.

२. सतत ऑनलाईन कृतीबाबत विचार करणे – सातत्याने सोशल मीडियावर अॅक्टीव असणाऱ्या लोकांचा आपण ऑनलाईन काय पोस्ट करायची, आपले स्टेटस काय असले पाहीजे याचाच विचार सुरु असतो. या विचारात हे लोक अनेक दैनंदिन कामे, इतर महत्त्वाच्या गोष्टीही विसरतात. त्याचा त्यांच्या क्रयशक्तीवरही परिणाम होतो. अशावेळी तुम्ही शरीराने कुठेही असलात तरी मनाने तुम्ही इंटरनेटचे अॅडीक्ट होता.

३. सामाजिक जीवन कमी राहते – जे लोक सतत मोबाईल किंवा लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर असतात ते बराच काळ त्यातच गढलेले राहतात. त्यामुळे लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य ते हरवून बसतात. त्यामुळे सतत इंटरनेटवर असणाऱ्या लोकांना सामाजिक जीवन फार कमी असते.

४. इंटरनेट नसल्यास काय – इंटरनेटचे व्यसन असणाऱ्यांना चुकून एखादवेळी इंटरनेट नसल्यास आपले काय होणार ही चिंता भेडसावत राहते. त्यामुळे हे लोक इंटरनेटच्या बाबतीत सातत्याने असुरक्षित राहतात. हे मानसिक आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते.

५. प्रत्यक्ष जीवनातील कार्यक्षमता कमी – सतत इंटरनेटवर असणाऱ्यांमध्ये विद्यार्थी, नोकरदार, लहान मुले यांसारख्या सर्वच वयोगटातील लोकांचा समावेश असतो. मात्र सतत इंटरनेटवर राहील्यास या लोकांची कार्यक्षमता कमी होते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, नोकरदारांच्या कामावर त्याचा वाईट परिणाम होतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Signs of internet addiction which show that you are addicted to the internet

ताज्या बातम्या