महिनाभराहून अधिक काळाच्या प्रतीक्षेनंतर भारतात दाखल झालेल्या आयफोनचे गुरुवारी मध्यरात्री जल्लोषात स्वागत झाले. मुंबई, ठाण्याच्या मॉल्समधील अ‍ॅपलच्या अधिकृत विक्रेत्यांपैकी काही दुकाने खुली ठेवण्यात आली होती. तर क्रोमाने पलॅडियम हॉटेलमध्ये रात्री १२ वाजता आयफोन ६चे अधिकृत अनावरण केले.
पाश्चात्य देशांप्रमाणे भारतातही रात्री १२ वाजता हा फोन उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस होता. त्यानुसार अनेक दुकाने आणि मॉल्स आयफोनच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. तसेच अ‍ॅपलप्रेमींनीही रात्री उशीरा ठरावीक ठिकाणी आयफोन ६ची झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेक मॉलमध्ये हिंदी सिने कलावंतांच्या उपस्थितीत केक कापून अनोख्या पद्धतीने नव्या आयफोनचे जल्लोषात स्वागत केले.  
अ‍ॅपल कंपनीच्या नव्या आयफोन -६ विषयी भारतीय बाजारपेठेत मोठी उत्सुकता होती. त्यामुळे हा नवा आयफोन गुरुवारी भारतीय बाजारपेठेत दाखल होताच पूर्व नोदंणी कलेल्या ग्राहकांनी तसेच इच्छुक ग्राहकांनी गर्दी केली होती. ठाण्यातील कोरम, विव्हीयाना या मॉल्समधील रिलायन्स डिजिटल, ३जी फोन्स या दुकानांमध्ये आयफोनच्या स्वागतासाठी ग्राहक उपस्थित होते. विवियाना मॉलमध्ये मध्यरात्री १३ आयफोनची विक्री झाली असून १० फोनची खरेदीसाठी नोंदणी झाली आहे. कोरम मॉलमध्ये ८ फोनची विक्री झाली तर शहरातील दुकानांमध्ये सरासरी ५ ते ७ फोनची विक्री अवघ्या तासाभरात झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतही अशा मोठय़ा प्रमाणात नवी नोंदणी झाल्याचे समजते. कंपनीने भारतासाठी सध्या ५५ हजार आयफोन्स उपलब्ध करून दिल्यामुळे चढाओढ असल्याचे दिसून आले.