Samosa and Jalebi Health Effects: समोसा आणि जिलेबी म्हटलं की, तोंडाला पाणी सुटतं. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे स्वादिष्ट अन् चटपटीत असलेले पदार्थ तुमच्या शरीरात नेमके काय आंतरिक बदल घडवतात? त्या एका तुकड्यात लपलेलं हे अन्न किती स्वाद देतं आणि किती बाधा आणतं हे जाणून घेतल्यावर तुम्ही पुढच्या वेळी त्याच्या सेवनापूर्वी नक्की दोनदा विचार कराल. रोजच्या नाश्त्यासोबत जर तुम्हीही समोसा-जिलेबी खाण्याचे शौकीन असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. समोसा आणि जिलेबीसारख्या पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांमध्ये असते खूप मोठ्या प्रमाणात तेल, साखर आणि ट्रान्स फॅट्स. त्यामुळे हे घटक शरीरावर नेमका काय परिणाम करतात, हे समजून घेणं अत्यावश्यक आहे.
भारत सरकारनंही आता स्वतः ‘ऑयल अँड शुगर बोर्ड’ लावण्याचे आदेश दिले आहेत. शाळा, कार्यालयं आणि सार्वजनिक ठिकाणी असे बोर्ड लावण्यात येणार आहेत. त्यावर दररोज खाल्ल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांत साखर व तेल किती आहे, याची माहिती असेल. कारण- देशातील बरेच लोक आजही समोसा-जिलेबीसारखे जड आणि तळलेले खाद्यपदार्थ दररोज खात आहेत.
जिलेबी-समोसा सलग १५ दिवस खाण्याच्या सवयीमुळे काय होईल?
बेंगळुरूतील स्पर्श हॉस्पिटलचे यकृत तज्ज्ञ डॉ. गौतम कुमार म्हणतात, “जर एखादी व्यक्ती १५ दिवस सलग समोसा आणि जिलेबी खात असेल, तर लगेच काही फार मोठा धोका नसतो. पण, ही सवय महिनोन महिने, वर्षानुवर्षे राहिली, तर शरीरावर घातक परिणाम होतो.”
ते पुढे सांगतात की, “समोशातील अनारोग्यकारक फॅट्समुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि त्यामुळे हृदयात ब्लॉकेज होण्याचा, उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. जास्त फॅट्समुळे शरीर इन्सुलिन रेजिस्टंट बनते आणि हळूहळू डायबेटीज होण्याची शक्यता निर्माण होते. झोप येणे, थकवा, स्मृती कमजोर होणे व मूड स्विंग ही लक्षणंही दिसू लागतात.”
हृदयावर होतो थेट परिणाम
दिल्लीच्या श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. अमर सिंघल सांगतात की, “समोसा-जिलेबीसारख्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स खूप मोठ्या प्रमाणात असतात, जे वाईट (LDL) कोलेस्ट्रॉल वाढवण्यास आणि चांगलं (HDL) कोलेस्ट्रॉल कमी करण्यास कारणीभूत ठरतं. हे दोन्ही घटक हृदयासाठी घातक ठरतात.”
त्यांच्या मते, १५ दिवस सलग समोसा-जिलेबी खाल्ल्यास वजन वाढतं, कोलेस्ट्रॉलही वाढतं आणि त्यामुळे हृदयाच्या कार्यावर थेट परिणाम होतो. दीर्घकाळ हेच चालू राहिल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोकसारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.
तर मग खावं की नाही?
महिन्यातून एखाद्या वेळी आणि तेही घरच्या घरी आरोग्यदायी पद्धतीनं बनवलेला समोसा किंवा जिलेबी खाणं चालू शकतं. एअर फ्रायरचा वापर करून तळणं टाळता येतं. मात्र, दररोज बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाणं शरीरासाठी दीर्घकालीन घातक ठरू शकतं, असं तज्ज्ञांचं स्पष्ट मत आहे.
१५ दिवस सलग समोसा-जिलेबी खाल्ल्यास सुरुवातीला त्रास जाणवणार नाही; पण आतून शरीरावर हळूहळू विपरीत परिणाम होत जातात. त्यामुळे सावध व्हा आणि आपल्या आरोग्याचा विचार करा. कारण-खाण्याचा आनंद काही मिनिटांचा; पण दुष्परिणाम कायमचे…